असे निर्लेप आयुष्य आपल्याला जगता येईल?
By गजानन जानभोर | Published: August 9, 2018 03:55 AM2018-08-09T03:55:38+5:302018-08-09T03:55:47+5:30
आपले सामान्यपण अस्तंगत होऊ न देता असे निर्लेप आयुष्य ऋषी-मुनींनाही जगता येत नाही. ‘आयुष्य सत्कारणी लागले आता देहही असाच उपयोगात यावा’ दुर्गादासजींनी लिहून ठेवले.
आपले सामान्यपण अस्तंगत होऊ न देता असे निर्लेप आयुष्य ऋषी-मुनींनाही जगता येत नाही. ‘आयुष्य सत्कारणी लागले आता देहही असाच उपयोगात यावा’ दुर्गादासजींनी लिहून ठेवले.
दुर्गादास रक्षक तप:पूत जीवन जगले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते अनुयायी. त्यांच्याच प्रेरणेने त्यांनी छोटेसे किराणा दुकान सुरू केले. नागपुरात श्री गुरुदेव सुपर बाजार ही व्यावसायिक प्रतिष्ठानांची साखळी दिसते. ते दुर्गादासजींचेच कर्तृत्व. व्यवसाय करायचा की गुरुदेवाची सेवा? हा प्रश्न त्यांना सारखा छळायचा. मुले थोडी मोठी झाली आणि त्यांनी निवृत्ती स्वीकारली. नागपूरजवळच्या येरला येथील मानव मंदिराच्या कामात त्यांनी वाहून घेतले. काही माणसांना आपल्या साध्या जगण्याचा अहंकार असतो. त्यातून त्यांच्या वागण्यात एक विक्षिप्तपण येत असते. अशी माणसे आपल्या अवतीभवती असतात खरी पण ती समाजाला नकोशी असतात अन् कुणाच्या उपयोगाचीही ती नसतात. दुर्गादासांनी आपले साधे जगणे कुठे मिरवले नाही. ते पुरस्कारप्राप्त व्हावे यासाठीही ते धडपडले नाहीत. त्यांना प्रपंचाचे भान होते पण तो आपला वाटणार नाही, हे त्रयस्थपणही त्यात होते.
घरात दारिद्र्य, तिसरीत असतानाच दुर्गादासजी कळमेश्वरच्या शाळेत चपराशी म्हणून काम करू लागले. महिन्याकाठी मिळायचे, तीन रुपये. १९४२ च्या आंदोलनात कुणालाही न सांगता ते घरातून निघून गेले. नागपुरातील संत्रा मार्केटमध्ये दिवसभर मजुरी आणि रात्री कुठल्यातरी मंदिरात निवारा शोधायचा. काही दिवस हॉटेलात कपबशा धुतल्या. पण परिस्थिती पालटत नव्हती. ‘आत्महत्या करून एकदाचे आयुष्य संपवून टाकावे’, दुर्गादास रात्रभर तळमळत होते. सकाळी उठले, मंदिराच्या दारातील प्रसाद घेतला. लगतच्या विहिरीत उडी घेणार, तेवढ्यात एका म्हाताऱ्याने त्यांना थांबवले. ‘ काळजी करू नकोस.’ म्हातारा निघून गेला. त्याचक्षणी राष्ट्रसंतांच्या भजनाचे स्वर त्यांच्या कानावर आले. सतरंजीपुºयात कार्यक्रम सुरू होता. ‘कोण दिवस येईल कसा, कोण जाणतो.’ हे त्या दिवशीचे राष्टÑसंतांचे भजन. ‘खचून जायचे नाही, उलट लढायचे’, दुर्गादासांनी ठरवले. एका किराणा दुकानात काम मिळाले. सोबत मालकाच्या घरातील स्वयंपाकाची जबाबदारीही. मालकाच्या कुटुंबाला दुर्गादासजींचा स्वयंपाक रुचायचा. घरातील सर्वांची जेवणं झाल्यानंतर त्यांना मात्र कागदावर जेवण मिळायचे. दुर्गादासांनी वापरलेले भांडे गोमूत्र शिंपडून शुद्ध केले जायचे. गरिबीच्या चटक्यांपेक्षा अस्पृश्यतेचे हे व्रण कधीही न मिटणारे...एक दिवस मालकाने दुकान कायमचे बंद केले. दुर्गादासांजवळ ११० रुपये होते. त्यांनी स्वत:चे किराणा व भाजीपाल्याचे दुकान सुरू केले. श्री गुरुदेव सेवा मंडळाची नागपुरातील हीच पहिली शाखा. दुकान व्यवस्थित चालू लागले. काही वर्षानंतर विश्वकर्मानगरातील स्मशानालगतची जागा विकत घेतली. इथे दुकान सुरू करायला साºयांचाच विरोध, फक्त सोबत होती राष्ट्रसंतांची. ते म्हणाले, ‘दुर्गादास तुझ्या प्रगतीची सुरुवात इथूनच होणार आहे.’
व्यवसायात जम बसला परंतु दुर्गादासजींच्या मनातील कार्यकर्ता अस्वस्थ असायचा. कळमेश्वरजवळच्या येरला या खेड्यात त्यांनी मानव मंदिराची स्थापना केली. इथे आता धर्मार्थ दवाखाना चालवला जातो. गरिबांच्या मुलांची लग्नही होतात. हा गुरुदेवभक्त परिसरातील गावांमध्ये जायचा आणि ग्रामस्वराज्यासाठी तरुणांना एकत्र करायचा. हा लोकप्रपंच आता त्यांच्या पुढच्या आयुष्याची वाट होती. स्वत:चा प्रपंच त्यांनी असा अलगद सोडून दिला पण साधुत्व आपल्या अंगी चिकटू दिले नाही. आपले सामान्यपण अस्तंगत होऊ न देता असे निर्लेप आयुष्य ऋषी-मुनींनाही जगता येत नाही. ‘आयुष्य सत्कारणी लागले आता देहही असाच उपयोगात यावा’ दुर्गादासजींनी लिहून ठेवले. परवा ते गेले, रुग्णालयात कुटुंबीयांनी देह दिला, जन्म आणि मृत्यू या प्रवासातील एक नि:संग वर्तुळ खºया अर्थाने पूर्ण झाले...