वाचनीय लेख : कॅनडाचा पाकिस्तान होऊ नये, एवढेच!

By विजय दर्डा | Published: September 25, 2023 07:24 AM2023-09-25T07:24:05+5:302023-09-25T07:25:51+5:30

जस्टीन ट्रुडो हे त्यांच्या वडिलांनी केलेल्या चुकाच पुन्हा करत आहेत. दहशतवाद्यांना जावई बनवून डोक्यावर चढवू नका!

Canada should not become Pakistan, that's all! crises between india and canada | वाचनीय लेख : कॅनडाचा पाकिस्तान होऊ नये, एवढेच!

वाचनीय लेख : कॅनडाचा पाकिस्तान होऊ नये, एवढेच!

googlenewsNext

विजय दर्डा

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतावर करत आहेत; ते ऐकून मला त्यांचे वडील पियरे ट्रुडो यांचा हटवादीपणा, मतपेढ्यांचे राजकारण आणि भयावह मूर्खपणा आठवला. पियरे ट्रुडो यांनी जे केले तेच जस्टिन करत आहेत. १९६८ पासून १९७९ पर्यंत आणि पुन्हा १९८० ते १९८४ पर्यंत पियरे कॅनडाचे पंतप्रधान होते. खलिस्तानचे हिंसक आंदोलन पेटले होते. बब्बर खालसाचा प्रमुख तलविंदर सिंह परमार ऊर्फ हरदेव सिंह परमार भारताविरुद्धदहशतवादी षडयंत्र रचत होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी परमारला ताब्यात घेण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले, पियरे ट्रुडो यांना पुष्कळ समजावले; परंतु ट्रुडो यांनी परमारला भारताच्या ताब्यात दिले नाही.

१९८५ मध्ये याच परमारने एअर इंडियाच्या कनिष्क विमानात बॉम्ब ठेवण्याचे षडयंत्र रचले. कनिष्कने कॅनडाच्या मॉन्ट्रियल विमानतळावरून लंडनमार्गे दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले; परंतु ३१ हजार फूट उंचावर या विमानात स्फोट झाला आणि ३२९ निरपराध लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी जगातली ती सर्वांत भयंकर दहशतवादी घटना होती. कॅनडाच्या सरकारने या स्फोटाशी संबंध असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. बब्बर खालसाशी संबंधित इंद्रजीत सिंह रेयात, रिपुदमनसिंग मलिक, अजायब सिंह बागडी आणि हरदयालसिंह बागडी या कटात सामील होते. भारतात सीबीआयने गुप्तपणे या सर्व लोकांच्या विरुद्ध दहशतवादी कारवायांशी संबंधित पुरावे गोळा करायला सुरुवात केली. कॅनडाच्या न्यायालयात हे पुरावे सादर करता यावेत हा हेतू त्यामागे होता; परंतु ती वेळ आलीच नाही. कॅनडाच्या तपास यंत्रणांनी खेळ केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय जर कोणाचे बोलणे रेकॉर्ड केले गेले तर ते ग्राह्य न धरण्याची तरतूद तेथील कायद्यात आहे. कॅनडाच्या तपास यंत्रणांनी देखाव्यासाठी काही प्रकरणांत न्यायालयाची परवानगी घेतली; परंतु बहुतेक प्रकरणांत जाणूनबुजून परवानगी घेण्याचे टाळले. दहशतवाद्यांना त्याचा फायदा मिळाला.
याचवर्षी १८ जूनला  खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली. भारतीय सुरक्षा यंत्रणा या हत्येला जबाबदार आहेत, असा ट्रुडो यांचा आरोप! थोडी परिपक्वता असती तर त्यांनी समिती स्थापन करून चौकशीचा अहवाल येण्याची वाट पाहिली असती. कूटनीतीच्या पातळीवर प्रश्न उपस्थित करता आला असता; परंतु त्यांनी आश्चर्यकारकरीत्या संसदेत भारतावर निराधार आरोप ठोकून दिला. वास्तवात या वक्तव्याने प्रकाशझोतात येण्याची त्यांची मनीषा होती. निज्जर यांच्या हत्येनंतर निदर्शने झाली. भारतीय वकिलातीतील अधिकाऱ्यांचे फोटो चौकात लावून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या गोष्टी झाल्या. हे सगळे ट्रुडो सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय शक्य नव्हते. खलिस्तान मिळविण्याचे मनसुबे रचणाऱ्या न्यू डेमोक्रेटिक पार्टीचे प्रमुख जगमीत सिंह यांच्या हातचे ट्रुडो हे खेळणे झाले आहेत. कॅनडातील संसदेत २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ट्रुडो यांची ‘लिबरल पार्टी ऑफ कॅनडा’ सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून तर आली; परंतु त्या पक्षाला बहुमतासाठी १० जागा कमी पडल्या. जगमीत सिंह यांच्या पक्षाकडे २५ खासदार असून, त्यांनी जस्टिन ट्रुडो यांना पंतप्रधान केले. पुन्हा सत्तेवर यायचे तर जगमीत सिंह यांची साथ गरजेची असल्याचे ट्रुडो यांना ठाऊक आहे. 
कॅनडाच्या एकूण लोकसंख्येत २.१ टक्के शीख असून राजकारण, व्यापार व्यवसायापासून कॅनडातील सैन्यापर्यंत शिखांचा प्रभाव आहे. तिथल्या भारतीय वंशाच्या खासदारांना मी भेटलो आहे. तेथे स्थायिक झालेले शीख बांधवही भारतीय शिखांप्रमाणे शांतिप्रिय, कायद्याचे पालन करणारे आणि जिंदादिल लोक आहेत.  शीख हे देशभक्ती आणि शौर्यासाठी ओळखले जातात. देशासाठी प्राण पणाला लावणारे हे लोक आहेत. मात्र काही मूठभर लोक आपले राजकारण खेळण्यासाठी खलिस्तानचा झेंडा मिरवतात. 

कॅनडात राहणाऱ्या सामान्य शीख समाजाला खलिस्तानच्या उपद्रवाशी काही घेणे-देणे नाही. मात्र ट्रुडो उघडपणे खलिस्तानचे समर्थन करतात आणि त्याला विचारस्वातंत्र्याचा मुलामा देतात. भारताविरुद्ध षड्यंत्र रचणाऱ्या सुमारे २५ लोकांची नावे पुराव्यासह कॅनडाला देऊन भारताने त्यांचा ताबा मागितला; परंतु ट्रुडो यांनी या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या कार्यकाळात खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात जावयासारखी वागणूक दिली जात आहे. भारताविरुद्ध जनमत संघटित करण्याला मूक सहमती देऊन ट्रुडो  आपली सत्ता वाचवण्यासाठी ते देशाचा बळी देऊ पाहत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या भारताच्या इच्छेला ग्रहण लागेल इतके या देशाला बदनाम करावे, अशी त्यांची इच्छा दिसते. दहशतवाद्यांना आश्रय देऊन ते भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करत आहेत.  भारत आणि कॅनडात मोठे व्यापारी संबंध असून तेथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांत सुमारे ४० टक्के विद्यार्थी भारतीय आहेत.

अशा  परिस्थितीत एक प्रश्न पडतो- कॅनडाचे काय होईल? हा देशही पाकिस्तानच्या रस्त्याने जाईल का? भारताविरुद्ध पाकिस्तानने दहशतवादी गट निर्माण केले, त्यांना संरक्षण दिले, देशात धार्मिक विद्वेष पसरवला. आज दहशतवादाने पाकिस्तानला पुरते नेस्तनाबूत केले आहे. खलिस्तानी दहशतवादी शेवटी कॅनडालाच उद्ध्वस्त करतील, हे ट्रुडो यांना समजत कसे नाही? भारतात तर खलिस्तानची निर्मिती अशक्य आहे. कॅनडातच खलिस्तान निर्माण करण्याची मागणी एखाद्या दिवशी झाली तर? श्रीयुत ट्रुडो, जरा काळजी घ्या. आपली खुर्ची वाचवण्यासाठी कॅनडाचा बळी देऊ नका, नाहीतर आपल्या कॅनडाचा पाकिस्तान होईल!

(लेखक एडिटोरियल बोर्ड व लोकमत समूहाचे चेअरमन आहेत)

Web Title: Canada should not become Pakistan, that's all! crises between india and canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.