उमेदवार तयार, पक्षांच्या जागा वाटपाकडे लक्ष !

By किरण अग्रवाल | Published: July 14, 2024 12:10 PM2024-07-14T12:10:07+5:302024-07-14T12:10:31+5:30

Assembly Election : सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी, विधानसभेसाठी उमेदवारी मिळविण्यातच कस लागणार.

Candidates ready, pay attention to the allocation of seats for the parties! | उमेदवार तयार, पक्षांच्या जागा वाटपाकडे लक्ष !

उमेदवार तयार, पक्षांच्या जागा वाटपाकडे लक्ष !

- किरण अग्रवाल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी इच्छुक कामाला लागले आहेत. जागा वाटपाचे चित्र स्पष्ट व्हायचे असल्याने व सर्वच पक्षांमधील इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने यंदा प्रत्यक्ष आचारसंहितेपूर्व हालचाली अधिक औत्सुक्याच्या ठरल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील निकाल पाहता, विधानसभेसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढून गेली असली तरी जोपर्यंत महायुती व महाघाडीचे आपापसातील जागा वाटप निश्चित होत नाही तोपर्यंत संभ्रमाचीच स्थिती राहणार आहे. एकदा का ते झाले, की पक्षांतरांचे सोहळे बघावयास मिळण्याची चिन्हे आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सारेच पक्ष लागले आहेत. बैठका, मेळाव्यांचा सपाटा सुरू झाला आहे. पक्ष स्तरावरील ही सक्रियता वाढून गेली असली तरी महाआघाडी व महायुती अंतर्गत कोणत्या जागा कुणास सुटतील हे अद्याप निश्चित नसल्याने काहीसा संभ्रम आहे खरा, पण ज्यांना लढायचेच आहे ते मात्र वैयक्तिकरीत्या कामाला लागले आहेत. कुणाचे वारी हनुमानला मेळावे होत आहेत, तर कुणी समर्थकांना पुढे करून बैठका घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत शांत असणारे अनेक जण आता अचानक इतके सक्रिय कसे झाले, असा प्रश्न पडावा अशी सक्रियता सर्वांमध्ये आली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तही रस्ते अडवून ठेवणारे बोर्ड, बॅनर्स झळकत आहेत तर जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने शुभेच्छा व अभिवादनाचे संदेश भरभरून वाहू लागले आहेत.

 

अकोल्यात स्व. गोवर्धन शर्मा तथा लालाजींच्या जागेवर कोण लढणार याची उत्सुकता आहे. त्याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यावर त्यांच्यासमोर विरोधी पक्षातून कोण रणांगणात उतरणार याचे आडाखे बांधले जात आहेत. सहानुभूतीचा विचार करून कुटुंबातीलच व्यक्तीला पुढे केले गेले तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील स्व. राजेंद्र पाटणी यांच्या जागेवरही तोच विचार होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे. अर्थात, या जागांसाठी इतर मातब्बरांनीही कसलेली कंबर पाहता येथील निर्णयासाठी पक्षाचीच कसोटी लागणार आहे. शिवाय काही प्रमुख पक्षांचे उमेदवारांबाबतचे सर्व्हे सुरू झाल्याच्या वार्ता पाहता संबंधित पक्षांची तयारीही दृष्टिपथात येऊन गेली आहे.

बुलढाण्यात अधिकृत पक्षांनी तयारी सुरू केली आहेच, पण लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करूनही तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले व सुमारे अडीच लाख मते मिळवलेल्या रविकांत तुपकर यांनी स्वतंत्रपणे सहाही जागा लढवण्याची घोषणा केल्याने धुरळा उडून गेला आहे. वाशिमच्या कारंजामध्ये तर स्थानिक उमेदवार देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक पार पडली आहे. काँग्रेसने बाहेरचा उमेदवार लादल्यास पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचे काम करणार नाहीत, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. या सर्व घडामोडींवरून विधानसभा निवडणुकीचे पडघम स्पष्ट व्हावेत.

महत्त्वाचे म्हणजे, जागा वाटपाचा निर्णय होईल तेव्हा होईल; तोपर्यंत मिळेल ती संधी घेऊन लोकांसमोर जाण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. नुकताच राज्याचा जो अर्थसंकल्प सादर केला गेला व त्यात लाडकी बहीण योजना घोषित केली गेली. त्यावर भाजपा व अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. जनतेच्याच करातून व कर्जबाजारीपणातून आकारास येणाऱ्या योजनांची वाजंत्री वाजविली जात आहे. दुसरीकडे पहिल्याच पावसात उडालेली तारांबळ पाहता अकोल्यात काँग्रेस व ‘वंचित’कडून आयुक्तांना निवेदने दिली गेली आहेत. मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठीही निवेदन देताना इलेक्ट्रिक डीपी पूजनाचे आंदोलनही काँग्रेसकडून केले गेले. उद्धव सेनेकडूनही नागरी प्रश्नांवर आंदोलने सुरू झाली आहेत. ओबीसी बहुजन पार्टी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार असल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी अकोल्यात पत्र परिषदेत दिली आहे. त्यांनी त्यांची अमरावती विभागीय बैठक येथे घेतली. अर्थात, ही तरी झाली येथल्या विषयांवरची सक्रियता, अकोल्यातील ‘बसपा’ने तर तामिळनाडूतील त्यांच्या पक्ष पदाधिकारीच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी येथून केली. स्थानिक विषयांकडे लक्ष वेधायला अन्य पक्ष आहेत, म्हणूनही असे झाले असेल कदाचित; पण विषयांची वानवा नाही कुणाला, इतकेच यातून लक्षात घ्यायचे.

सारांशात, ‘अभी नही तो कभी नही’ या मानसिकतेतून सर्वच पक्षांतील नेते विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असल्याने यंदा उमेदवारांची गर्दी होणे निश्चित आहे. लोकांच्या प्रश्नांवर अनेकांची जी तळमळ अलीकडे दिसून येते आहे त्यामागे यासंबंधीची ''दूरदृष्टी'' असेल तर काय सांगावे? अशा स्थितीत उमेदवार निवडण्यात पक्षांचाच कस लागणार आहे हे मात्र नक्की.

Web Title: Candidates ready, pay attention to the allocation of seats for the parties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.