मुलांना सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:32 AM2017-10-10T00:32:48+5:302017-10-10T00:40:35+5:30

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही.

 Care for the kids | मुलांना सांभाळा

मुलांना सांभाळा

googlenewsNext

देशातील वाढत्या मानसिक प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कशी निर्माण झाली तेच कळत नाही. या मानसिक प्रदूषणामुळे लेकरांना मोकळेपणाने खेळणेबागडणेही अशक्य होऊन बसले असून जगण्याची सहजताच आम्ही गमावून बसलो आहोत. मुलांसाठी आईच्या कुशीनंतर सर्वाधिक सुरक्षित मानली जाणारी शाळासुद्धा आता असुरक्षित वाटायला लागली आहे. लहान मुलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न पडतो. अशा या गढूळ वातावरणात आपल्या मुलांना जपणे अत्याधिक आवश्यक झाले असून शिक्षकांसोबतच पालकांनीही त्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. मंडळाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली अधिक कठोर करतानाच विद्यार्थी आणि पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शाळांना विद्यार्थ्यांना ‘कोमल’ हा चित्रपट दाखविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शातील अंतर कळावे हा यामागील उद्देश आहे. पालकांनीही हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण मुलांना या प्रदूषणाची झळ बसू नये यासाठी पालकांची सजगता महत्त्वाची आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया नामक स्वयंसेवी संघटनेने दोनतीन महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली ती अतिशय धक्कादायक तसेच या देशातील बालपण किती धोक्यात आहे, याचे वास्तव उघड करणारी आहे. या सर्वेक्षणानुसार येथील प्रत्येक दुसरा मुलगा लैंगिक शोषणाचा शिकार ठरतो आहे. दुर्दैव हे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषणाच्या घटना घडत असतानाही समाजात याविषयी पाहिजे तेवढी जागरूकता आणि संवेदनशीलता जाणवत नाही, आणि याचे प्रमुख कारण आहे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याकडे बघण्याचा आपला उदासीन दृष्टिकोन. आपल्या कुटुंबांमध्ये अजूनही लैंगिक शिक्षणावर मोकळी चर्चा होत नाही. बरेचदा तर हा विषय काढणेसुद्धा गैर समजले जाते. परंतु बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत या विषयावर मोकळेपणाने बोलणे, संवाद साधणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून मुलं त्यांना होणारा त्रास अथवा समस्यांबद्दल न संकोचता बोलू शकतील, आणि अशा विकृत मानसिकतेपासून वेळीच आपला बचाव त्यांना करता येईल. पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी जसे विविध उपक्रम राबविले जातात तशीच चळवळ आता हे मानसिक प्रदूषण थोपविण्यासाठीही हाती घ्यावी लागणार आहे.

Web Title:  Care for the kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.