...दुसऱ्याचं ते कार्ट !

By admin | Published: March 17, 2016 03:58 AM2016-03-17T03:58:30+5:302016-03-17T03:58:30+5:30

‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हणच आहे मुळात. तिचा प्रत्यय समस्त राजकारणी सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार या विषयावर बोलताना अगदी आवर्जून आणून देत

... the cart of another! | ...दुसऱ्याचं ते कार्ट !

...दुसऱ्याचं ते कार्ट !

Next

‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हणच आहे मुळात. तिचा प्रत्यय समस्त राजकारणी सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार या विषयावर बोलताना अगदी आवर्जून आणून देत असतात. भ्रष्टाचार म्हटलं की ज्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते असे सांगतात त्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे तब्बल अकरा आमदार एका बनावट कंपनीला उपकृत करण्यासाठी लाच स्वीकारीत असल्याची एक चित्रफीत नुकतीच उजेडात आली. भाजपाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण मागे असेच चित्रबद्ध झाले होते. ममतांच्या आमदारांचे हे शौर्य उघडकीस आल्यानंतर संसदेत गदारोळ माजणे अगदी स्वाभाविक होते. पण ममता बॅनर्जी यांनी संबंधित चित्रफीत मुळातच बनावट आहे आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ती उजेडात आणून तृणमूलला बदनाम करण्याचा तो खटाटोप आहे असे अगदी ठासून सांगितले. हा खटाटोप किंवा कट डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपा यांनी मिळून रचला असून येणाऱ्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष पराभूत होणार असल्याने हताशेपोटी त्यांनी हे केल्याचा प्रत्त्यारोप पक्षाचे सौगत राय अणि डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. कोणत्याही कारणाने का होईना डावे-काँग्रेस-भाजपा युती होणार असेल तर मोठी धमालच होणार आहे. ममतांचा त्यांच्या आमदारांवर इतका दृढ विश्वास आहे की त्यांच्याकडून साधा खुलासा मागविण्याची मागणीदेखील त्यांनी उडवून लावली आहे. अर्थात हे काही नवे नाही. प्रत्येक पक्ष आपले लोकप्रतिनिधी साव तर परपक्षाचे लोकप्रतिनिधी चोर आहेत असेच जाहीरपणे सांगत असतो. त्यापायीच मग जेव्हां त्यांच्याच पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हां मात्र असे आरोप तथ्यहीन असतात, ते एक कुभांड असते आणि या कुभांडास राजकीय विद्वेषाने प्रेरीत केलेले असते. पण तरीही ममता बॅनर्जी म्हणजे छगन भुजबळांची पाठराखण करणाऱ्या शरद पवार नव्हेत! त्यांच्या मनात सार्वजनिक जीवनातील अस्वच्छतेबाबत कमालीची चीड आहे. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआच्या केन्द्रीय मंत्रिमंडळात त्या रेल्वे मंत्री असताना त्यांचेच तत्कालीन सहकारी जॉर्ज फर्नांडीस यांच्या समता पार्टीच्या अध्यक्ष जया जेटली यांचे नाव एका भ्रष्टाचार प्रकरणात समोर आले तेव्हां ममतांनी जॉर्ज यांचा तत्काळ राजीनामा मागितला होता व तो येईना तेव्हां आधी मंत्रिपद भिरकावले होते व नंतर वाजपेयी सरकारला असलेला पाठिंबा मागे घेऊन ते गडगडवले होते. याचा अर्थ इतकाच की त्या काळात त्या सत्तेच्या राजकारणात अंमळ अपरिपक्व होत्या. आता त्या परिपक्वही झाल्या आहेत आणि तरबेजही!

Web Title: ... the cart of another!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.