सीताफळाचा कसपटे पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 11:37 PM2016-12-22T23:37:19+5:302016-12-22T23:37:19+5:30
दुष्काळी जिल्हा हे दुर्दैवी बिरुद पुसून टाकण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याने केले आहे. राज्यात सर्वाधिक साखर
दुष्काळी जिल्हा हे दुर्दैवी बिरुद पुसून टाकण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याने केले आहे. राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला व देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूरचा नावलौकिक झाला आहे. त्यात फलोत्पादन क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याचे काम डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी केले. त्यात सांगोला आणि मंगळवेढ्यासारखे तालुके नेहमीच आघाडीवर राहिले. फायद्याची शेती हा शेतकऱ्यांपुढील नेहमीच जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी फलोत्पादनाचा एक मार्ग धुंडाळण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील शेतकरी करताना दिसतो.
हमखास उत्पन्न देणाऱ्या ऊसाला पर्याय अथवा जोड देण्यासाठी सीताफळ या फलोत्पादनाची निवड करायची ओढ लावण्याचे काम बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील प्रयोगशील आणि जिद्दी शेतकरी नानासाहेब उर्फ नवनाथ मल्हारी कसपटे यांनी केले आहे. मातीवर आणि पिकांवर जिवापाड प्रेम करणे हा बळीराजाचा स्थायीभाव असतो. असाच एखादा शेतकरी एखाद्या पिकावर विश्वास ठेवून परिश्रम घेऊ लागला तर काय घडते, याचे उदाहरण म्हणून नानासाहेब कसपटे यांच्याकडे पाहता येईल.
तब्बल तीस वर्षे त्यांनी सातत्यपूर्ण तपश्चर्या केली. द्राक्ष बागायती क्षेत्रात सुरुवातीला पाऊल टाकले. त्यात कष्टाने विक्रमी उत्पन्न घेतले. रोगराई, निसर्गाचा लहरीपणा आणि अस्थैर्य यामुळे त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यातूनच त्यांनी सीताफळाच्या उत्पादनास सुरुवात केली. केवळ पारंपरिक जाती आणि पारंपरिक पद्धतीवर विसंबून न राहता त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली.
‘आमराई’ किंवा ‘आंब्यांची बाग’ हा पिढ्यान्पिढ्या चालत आलेला परवलीचा शब्द! आंब्यांच्या बागेची लागवड एका पिढीने केली की त्याची फळे पुढे अनेक पिढ्यांनी चाखायची. हेच सूत्र सीताफळाच्या बाबतीत यशस्वी करण्यासाठी काय केले पाहिजे, याचा ध्यास कसपटे यांनी घेतला. शेतातील जमिनीची प्रतवार उच्च, मध्यम वा सामान्य असो, कोणत्याही जमिनीत फुलू शकणारी सीताफळाची बाग आणि तिचा प्रसार करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. लागवडीनंतर दोन वर्षांतच सीताफळाचे उत्पादन आणि उत्पन्न सुरू होते. त्या बागेचे आयुष्यही किमान ४० वर्षांचे असते.
पाणी हा शेतकऱ्यांपुढील नेहमीचा प्रश्न असतो. नेमक्या उन्हाळ्यातच सीताफळाला पाण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते हिताचे ठरते. अशा अनेक अनुकूल मुद्द्यांचा विचार कसपटे यांनी केला आणि संशोधनास सुरुवात केली. बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावी ३५ एकर क्षेत्रात सीताफळावरील विविध प्रयोगास प्रारंभ केला. २००१ साली एनएमके-१ या जातीचा शोध लावला. त्यांचे त्या जातीवरील संशोधन पूर्ण झाले तरी ती जात मात्र त्यांनी सार्वजनिकरीत्या खुली केली नाही. त्याच जातीवर ते संशोधन आणि प्रयोग करीत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून चांगले आणि दर्जेदार पीक त्यांना मिळाले. अखेर २०११ साली त्यांनी फलोत्पादन क्षेत्रात ती जात अधिकृतरीत्या खुली केली. प्रयोगशीलतेच्या बळावर त्यांनी नंतर एनएमके-१ (गोल्डन), एनएमके-२, एनएमके-३ आणि फिंगरप्रिंट या जाती संशोधित केल्या आणि त्या फलोत्पादन क्षेत्रात लोकप्रियही झाल्या. हे करत असताना सीताफळाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी राज्यभर कार्यशाळाही घेतल्या.
राज्यात २८ हजार हेक्टर्स एवढ्याच क्षेत्रावर असणारे सीताफळाचे पीक आज ६० हजार हेक्टर्सवर पोहोचवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांचे हेच कार्य आता ‘कसपटे पॅटर्न’ म्हणून उदयास आले आहे. त्यांनी संशोधित केलेल्या विविध जातींवर कृषी क्षेत्रातील विद्यार्थी पीएच. डी. करू लागले आहेत. एनएमके-१ (गोल्डन) ही जात तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. या जातीसाठी केंद्र सरकारने कसपटे यांना ‘पेटंट’ बहाल केले आहे. प्रक्रियायुक्त पदार्थांबरोबरच अनेक औषधी उपयोगांची नैसर्गिक देणगी लाभलेल्या सीताफळाला मान्यता प्राप्त करून देण्यासाठी ‘कसपटे पॅटर्न’ मोलाचे कार्य करीत आहे, हे नक्की!
- राजा माने