किल्ले रामशेज

By Admin | Published: April 2, 2017 01:15 AM2017-04-02T01:15:09+5:302017-04-02T01:15:09+5:30

रामशेज म्हणजे रामाची शय्या. आख्यायिकेनुसार श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला ‘रामशेज’ हे नाव मिळाले

Castle ramshege | किल्ले रामशेज

किल्ले रामशेज

googlenewsNext

- गौरव भांदिर्गे
रामशेज म्हणजे रामाची शय्या. आख्यायिकेनुसार श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला ‘रामशेज’ हे नाव मिळाले.
किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा :-
पेठ मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’कडे जाणारी एसटी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात जावे. गावातून समोरच किल्ला दिसतो. किल्ला डाव्या बाजूला ठेवून वळसा घालून जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाते. या वाटेने गड गाठण्यास १ तास लागतो, तर संपूर्ण किल्ला बघायला दोन तास लागतात.

गडदर्शन :-
1रामशेज किल्ल्याची उंची समुद्र्रसपाटीपासून ९८५ मी. आहे. गावातील हनुमान मंदिराच्या शेजारून किल्ल्यावर जाणारी वाट जाते. गडावर शिरताना गुहा लागते. गुहेत रामाचे मंदिर आहे, तर एका बाजूला शिलालेख कोरलेला असून खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या आपल्याला थेट गडावर घेऊन जातात. गडमाथ्यावर समोरच भग्न अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. येथून वर जाणारी वाट गडाच्या दुसऱ्या टोकापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते. थोडे पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वळून कड्यापाशी येऊन थांबते. येथेच खाली गडाचा मुख्य दरवाजा आहे. आज दरवाजा भग्न अवस्थेत आहे.
2मुख्य वाटेवर थोडे वर चढल्यावर पाण्याची दोन टाके आणि एक मोठा तलाव पाहायला मिळतो. थोडे आणखी वर चढून गेल्यावर भगवती मातेच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या मागच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर चोर दरवाजा दिसतो. मंदिराच्या समोरून पुढे जाणारी वाट गडाच्या दुसऱ्या टोकापाशी जाते. या टोकाशी दोन पाण्याचे टाके व घरांचे पडके अवशेष आढळतात. हा सर्व परिसर पाहून मुख्य दरवाजापाशी परतायचे. येथून डावीकडे जाणारी वाट समोरच्या पठारावर जाते. पठाराच्या शेवटी एक ध्वजस्तंभ आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याच्या पिछाडीस पाण्याचे टाके, शिवलिंग व नंदी आहे. किल्ल्यावरून भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला, चांभार लेणी दिसतात.

किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली. त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल पळत सुटले. या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जाताना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरूज जाळून टाकला.

इतिहास :-
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. अशा वेळी रामसेज घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर हल्ला चढवला, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला. त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग शहाबुद्दीनने आजूबाजूचे जंगल तोडून लाकडी बुरूज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. या योजनेनुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहित्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा. त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसऱ्या गटाने विरुद्ध बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही बाजूंना सैन्य विभागून मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.

Web Title: Castle ramshege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.