सावध! तो पुन्हा आलाय...बाधितांची संख्या हजारच्या पुढे!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:32 AM2022-06-06T08:32:28+5:302022-06-06T08:32:55+5:30
coronavirus : देशाच्या अन्य काही भागातही अशीच वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पुन्हा सतर्क केले आहे. मास्क वापरण्याची सक्ती करावी की नाही यावर चर्चा झडू लागल्या आहेत.
जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा महाराष्ट्रातील रोजची कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पुढे गेली आहे. देशात हा आकडा तीन-चार हजारांच्या घरात आहे. रोज जाणारे बळीही पुन्हा वाढले आहेत. मुंबईमध्ये तर जूनच्या पहिल्या चार दिवसांत संपूर्ण मार्चमधील संख्येच्या दुप्पट रुग्ण निष्पन्न झाले आहेत. देशाच्या अन्य काही भागातही अशीच वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पुन्हा सतर्क केले आहे. मास्क वापरण्याची सक्ती करावी की नाही यावर चर्चा झडू लागल्या आहेत.
पुन्हा सेलिब्रिटींना लागण झाल्याच्या बातम्या टीव्ही, वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे झळकू लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांची कन्या प्रियांका यांच्यापासून ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शाहरुख खान, कतरिना कैफ वगैरे सिनेमातील तारे-तारका यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊनवेळी असे दिसून आले की सिनेमासारख्या झगमगीत क्षेत्रातील नामवंत लोक पुरेशी काळजी घेत नाहीत. पार्ट्या वगैरे प्रकार पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. त्यातून कोरोनाचा विस्फोट होतो आणि त्या सगळ्याचे दुष्परिणाम अंतिमत: हातावर पोट असलेल्या सामान्यांना भोगावे लागतात.
सरकारने किंवा प्रशासनाने कोरोना संक्रमणाचे संकट पूर्ण दूर होईपर्यंत या बड्या मंडळींच्या या कृत्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आताचे हे केवळ भारतातच नाही तर अन्य देशांमध्येही घडू लागले आहे. जिथून हा विषाणू जगभर पसरला त्या चीनमध्ये एक लाट अलीकडेच येऊन गेली. शांघायसारख्या मोठ्या शहरामध्ये लॉकडाऊन लावावे लागले. अमेरिकेला यंदाच्या उन्हाळ्यात आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल, अशी भीती आहे. भारताचा विचार करता ही चौथी की पाचवी लाट हे महत्त्वाचे नाही, तर नव्या लाटेची सुरुवात आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
तिसरी लाट कधी आली व गेली ते कळाले नाही. किंबहुना तिची झळ तितकीशी बसली नाही. याचाच अर्थ असा की, कोविड विषाणूचे नवे अवतार येत राहतील आणि दरवेळी त्या लाटांचे संक्रमण होत राहील, ही अगदी सुरुवातीची म्हणजे मार्च २०२० मधील भाकिते खरी ठरू लागली आहेत. खरेतर याबद्दल कोणाला शंका नव्हती; पण कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर लोक बेफिकीर झाले. अनेकांनी तर दुसरा डोसदेखील वेळेत घेतला नाही. संक्रमणापासून दूर राहायचे असेल तर केवळ एकदाच ते दोन डोस नव्हे तर कदाचित दरवर्षी ते घेतच राहावे लागेल.
ज्येष्ठ नागरिक अथवा मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे सहव्याधी असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींनी वेळेत बूस्टर डोसही घ्यायला हवा. तथापि, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता सरकारी व्यवस्थेत, तसेच बाजारात एकापेक्षा अधिक लसी उपलब्ध आहेत. नवा बूस्टर डोस म्हणून घ्यायच्या नव्या लसीलाही औषध नियामकांनी मान्यता दिली आहे. याच आठवड्यात भारत दोन अब्ज डोस देणारा देश बनेल. शनिवारी १९४ कोटींचा आकडा देशाने पार केला आहे. तरीदेखील हे पुरेसे नाही. लोक लसींकडे कानाडोळा करू लागले आहेत. आधी उल्लेख केलेल्या तिसऱ्या लाटेचा फटका न बसण्यातही लस हेच कारण होते.
लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याने संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले नाही. आताची स्थिती तशी नाही. परिणामी, बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. केवळ सामान्य नागरिकच बेफिकीर झाले असे नाही. राज्य सरकार व महानगरपालिका, नगरपालिकांचे प्रशासनही याबाबतीत ढेपाळले आहे. प्रत्येक रुग्णाला विषाणूची बाधा नेमकी कशी झाले हे तपासण्याकडे, रोज भरपूर चाचण्या घेण्याकडे आणि त्या माध्यमातून अधिकाधिक लाेक निर्धोक राहतील, हे पाहण्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसते आहे.
ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा विसर पडला आहे. त्याचमुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या नागरीकरण अधिक असलेल्या पट्ट्यात रुग्ण वाढताना दिसत आहेत. तूर्त ही वाढ त्या भागापुरती असली तरी काळजी घेतली नाही, सतर्कता बाळगली नाही तर राज्याच्या अन्य भागातही रुग्णसंख्या वाढेल. मास्क वापरण्याची सक्ती, घराबाहेर पडण्यावर निर्बंध किंवा लॉकडाऊन यासारख्या उपाययोजना राबवाव्या लागतील. तेव्हा, शक्य तितका मास्कचा वापर, पूर्वीप्रमाणेच वारंवार हात धुणे आणि सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून पुरेसे अंतर ही काळजी घ्यायला हवी.