शोभायात्रेने फेडले पारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:00 PM2019-04-06T22:00:36+5:302019-04-06T22:01:31+5:30

सिन्नर : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीच्या ठेक्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घरा-घरांतून होणारी पुष्पवृष्टी अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणारी शोभायात्रा येथे उत्साहात पार पडली.

Celebration | शोभायात्रेने फेडले पारणे

सिन्नर येथे शोभायात्रेत सहभागी झालेल्या शहरातील विविध मंडळांच्या महिला.

googlenewsNext
ठळक मुद्देसिन्नरला परंपरेची गुढी : सांस्कृतिक मंडळाच्या उपक्रमास सिन्नरकरांचा उदंड प्रतिसाद

सिन्नर : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीच्या ठेक्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घरा-घरांतून होणारी पुष्पवृष्टी अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणारी शोभायात्रा येथे उत्साहात पार पडली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी बाणा व संस्कृती टिकविण्यासाठी येथील सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित शोभायात्रा कार्यक्रमास सिन्नरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी शिवाजी चौकात वंदे मातरम् संघटनेची सुमारे २१ फूट उंच गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने पाडव्याचा सण व मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हिंदू नववर्षाची सुरुवात मंगलमय सुरावटींच्या ताला-सुरात व्हावी व एकमेकांना शुभेच्छा देऊन मराठी संस्कृतीची जपणूक करण्यात यावी या उद्देशाने सांस्कृतिक मंडळाने सुरू केलेल्या शोभायात्रेने गुढीपाडव्याचा उत्साह द्विगुणित झाला.
मराठीचा गोडवा टिकवावा, सण-संस्कृतीने आपापसातील दुरावा कमी होऊन सर्वांनी एकोप्याने राहावे, जाती धर्मातील तेढ कमी व्हावी व नव्या पिढीला जुन्या संस्कृतीचे दर्शन व्हावे तसेच त्यांनाही त्यात सहभागी होऊन पाडव्याच्या सांस्कृतिक गोडव्याची अनुभूती यावी या उद्देशाने सुरू केलेल्या पाडव्याच्या शोभायात्रेने सिन्नरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या शोभायात्रेने नागरिकांची मने जिंकली.
शनिवारी सकाळी ६.४५ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सिन्नर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत, प्रकाश नवसे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक विजय जाधव, श्रीकांत जाधव यांच्यासह शहरातील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून गुढी उभारण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पालखीचे पूजन करण्यात आले. शहरातील सर्व मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, प्रकाश नवसे, प्रा. राजाराम मुंगसे, प्रा. जावेद शेख, शंतनू कोरडे, राजेंद्र देशपांडे आदींसह विविध शाळांच्या शिक्षकांनी शोभायात्रेत सहभाग घेत नियोजन केले. शोभायात्रेत वंदेमातरम्चे संस्थापक जितेंद्र कोथमिरे, मनोज भंडारी, डॉ. महावीर खिंवसरा, पराग शहा, सुधीर वाईकर आदींसह माहेश्वरी युवक मंडळाचे सुरेश नावंदर, सुशील जाजू, किरण गवळी यांच्यासह असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला. शिवाजी चौकात तीन ढोल पथकांचा समावेश होता. शोभायात्रेच्या मार्गावर गुढ्या, तोरणे उभारून नागरिक यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज होते. प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढून यात्रेचे स्वागत होताच सामील होणाऱ्या नागरिकांमुळे शोभायात्रेची संख्या वाढत होती. अनेक कलाकारांनी ढोलकी, ताशा, संबळ, सनईच्या सुरावटींनी आणखीच स्फूर्ती वाढविली आणि अनेकांचे पाय थिरकू लागल्याने आबालवृद्धांनी तालासुरात ठेका धरत नाचायला प्रारंभ केला अन् वातावरणात उत्साहाचे भरते आले.मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने जिंकली मने सिन्नर येथे लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकाने सिन्नरकांची मने जिंकली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मल्लखांब ठेवण्यात आला होता. त्यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून वाहवा मिळवली. शोभायात्रेत वाजे विद्यालय, चांडक कन्या, भिकुसा व महात्मा फुले विद्यालयाची लेजीम पथके सहभागी झाली होती. संबळ-पिपाणीच्या तालावर ज्येष्ठ नागरिकांचा ठेकाशोभायात्रेतील विविध वेशभूषा नागरिकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी ठरली. मंजूळ स्वरांतील विविध पारंपरिक वाद्यांच्या सुरावटींनी नागरिक हरपून गेले होते. डिजिटलच्या जमान्यात अद्यापही आपले अस्तित्व टिकून असलेल्या पारंपरिक संबळ-पिपाणीच्या तालावर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरत नाचायला सुरुवात केली. महिलांनी फुगड्या खेळल्या. चित्ररथ, संबळ व पिपाणी पथक, डफ, हलगी, तुणतुणे, ढोल पथक, लेजीम पथकाने उत्साहाला भरते आले होते. महिला-पुरुषांच्या सहभागाने सुरू झालेल्या शोभायात्रेत असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Web Title: Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.