शंभरीतील दगडी बँक
By admin | Published: May 28, 2016 04:03 AM2016-05-28T04:03:55+5:302016-05-28T04:03:55+5:30
दगडी इमारतीतील सहकारी क्षेत्रातील जळगाव जिल्हा बँकेने शंभर वर्षांच्या वाटचालीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी फुलविली आहे.
- मिलिंद कुलकर्णी
दगडी इमारतीतील सहकारी क्षेत्रातील जळगाव जिल्हा बँकेने शंभर वर्षांच्या वाटचालीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी फुलविली आहे.
सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्था अखंडपणे १०० वर्षे कार्यरत राहाणे हे संस्थापकांच्या दूरदृष्टी आणि या काळातील संचालकांच्या कुशल व्यवस्थापनाचा सुयोग्य परिपाक म्हणावा लागेल. जळगाव जिल्हा बँक हे त्याचे ठळक उदाहरण आहे. योग्य व्यक्तींच्या हाती संस्था राहावी आणि कारभाऱ्यांनी व्यवस्थित काम करावे याकडे जागरुक सभासदांनी कायम लक्ष ठेवल्याने बँकेला सोनियाचे दिवस आले आहेत.
ब्रिटीश काळात खान्देशचे पूर्व व पश्चिम खान्देश असे दोन जिल्हे होते. पूर्व म्हणजे जळगाव तर पश्चिम म्हणजे धुळे-नंदुरबार असे त्याचे स्वरुप होते. पहिल्या महायुध्दानंतर ब्रिटीशकालीन भारतात आर्थिक संकट ओढवले. काही बँका डबघाईला गेल्या. यावेळी पाचोरा येथे एका कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रतिष्ठित नागरीक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि तेथे बँक स्थापनेचा विचार करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी जॉन हेर्ने सॅडर्स आणि प्रतिष्ठीत वकील दत्तात्रय गोविंद जुवेकर यांनी पुढाकार घेऊन आठ जणांची समिती गठीत केली. ठिकठिकाणी बैठका झाल्या. भागभांडवल गोळा करण्यास सुरुवात झाली. परंतु डबघाईला आलेल्या बँकांची स्थिती नजरेसमोर असताना नागरीक नव्या बँकेचे भाग घ्यायला पुढे येईनात. अखेर वकील जुवेकर यांनी स्वत: दहा भाग खरेदी करुन सुरुवात केली आणि मग हळूहळू सभासद वाढू लागले, असा बँक स्थापनेचा रंजक इतिहास आहे.
दगडी बँक म्हणूनही या बँकेला ओळखले जाते, ते दोन अर्थाने. जळगावच्या नवीपेठेत १९३० मध्ये संपूर्ण दगडी बांधकामात बँकेची इमारत बांधण्यात आली. भक्कम वास्तू या अर्थाने दगडी बँक म्हणून जिल्हावासीयांच्या ती कौतुकाचा विषय आहे, आजही ही वास्तू सुस्थितीत आहे. जरी मुख्यालय रिंगरोडवरील सुसज्ज वास्तूत स्थलांतरीत झाले असले तरी. बँकेची भक्कम आर्थिक स्थिती या अर्थानेही ती शेतकरी, सहकारी संस्था यांना ‘दगडी बँक’ म्हणून आधारवड ठरली आहे. आर्थिक स्थैर्य, कुशल व्यवस्थापन, शाखा विस्तार यामुळे आशिया खंडातील अग्रणी बँक असा या बँकेचा नावलौकीक होता.
वकील दत्तात्रय गोविंद जुवेकर हे पहिले चेअरमन होते. त्यानंतर बी.व्ही.देशमुख, जे.एस.पाटील आणि प्रल्हादराव पाटील या चेअरमन झालेल्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने बँकेला वैभवाच्या शिखरापर्यंत नेले. यातील प्रल्हादराव पाटील हे तर पुढे राज्य सहकारी बँकेचे चेअरमनदेखील झाले.
के.एम.पाटील, सुरेशदादा जैन, डॉ.सतीश पाटील यांनी चेअरमनपद यशस्वी सांभाळल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातही आपल्या कामाचा ठसा उमटविला. महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खेवलकर आता चेअरमन आहेत.
बँकेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत उनसावलीचे प्रसंगदेखील आले. आशिया खंडात नावलौकीक मिळविणाऱ्या या बँकेवर परवाना रद्दचा काळा दिवसदेखील पाहावा लागला. परंतु बँकेचा पाया भक्कम असल्याने हे दिवसही गेले आणि बँक पुन्हा प्रगतीपथावर घोडदौड करु लागली.
तब्बल २७७ शाखांद्वारे जिल्हा बँकेने वित्तीय सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. सावकाराच्या जाळ्यात जाण्यापासून शेतकऱ्याला वाचविले ही खऱ्या अर्थाने बँकेची मोठी उपलब्धी आहे. सभासद आणि शेतकऱ्यांनी बँकेच्या उपकाराची परतफेड नेहमी विश्वासाने केली आहे. बँक आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांनी ठेवी काढल्या नाहीत आणि आता दुष्काळी स्थिती असतानाही यंदा ठेवींमध्ये २१३ कोटींची वाढ झाली आहे. हे बँकेवरील विश्वासाचे प्रतीक आहे. सहकारी क्षेत्रात निवडणुकांच्या माध्यमातून गैरकारभार करणाऱ्या संचालकांना सभासदांनी खड्यासारखे दूर ठेवले. चांगल्या व्यक्तींकडे वारंवार बँकेची धुरा सोपवली. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची बिकट अवस्था असताना जिल्हा बँक दमदार वाटचाल करीत आहे.