शून्यातून विश्व निर्मिणाऱ्या संघर्षयात्री जवाहरलाल दर्डा यांची शताब्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 09:33 AM2023-07-02T09:33:13+5:302023-07-02T09:34:07+5:30

प्रत्येक सत्तापदाचा वापर महाराष्ट्राच्या कल्याणार्थ व्हावा म्हणून कसोशीने, तळमळीने निभावलेला मंत्रिपदांचा प्रदीर्घ कार्यकाळ आणि सत्तेच्या मोहमयी आखाड्यात सदैव लखलखलेली अढळ पक्षानिष्ठा...

Centenary of Jawaharlal Darda, a struggler who created the world from nothing | शून्यातून विश्व निर्मिणाऱ्या संघर्षयात्री जवाहरलाल दर्डा यांची शताब्दी

शून्यातून विश्व निर्मिणाऱ्या संघर्षयात्री जवाहरलाल दर्डा यांची शताब्दी

googlenewsNext

स्वातंत्र्य लढ्यातल्या सत्याग्रहाचे, तुरुंगवासाचे तेजस्वी पर्व, देशउभारणीच्या स्पनासाठी वेचलेले कर्तृत्ववान तारुण्य...दिल्ली- मुंबईच्या सत्ता दरबारात सामान्यांचा आवाज पोचावा म्हणून गावखेड्यातल्या सळसळत्या तारुण्याला हाताशी घेऊन केलेली लोकमतची पायाभरणी आणि सत्तेच्या खुर्चीवर असतानाही निर्लेप राखलेली निःस्पृह पत्रकारिता...

प्रत्येक सत्तापदाचा वापर महाराष्ट्राच्या कल्याणार्थ व्हावा म्हणून कसोशीने, तळमळीने निभावलेला मंत्रिपदांचा प्रदीर्घ कार्यकाळ आणि सत्तेच्या मोहमयी आखाड्यात सदैव लखलखलेली अढळ पक्षानिष्ठा...

राजकारण-समाजकारणाच्या अखंड धकाधकीत सांभाळलेली सौजन्यशील रसिकता आणि जिवाला जीव देणाऱ्या स्नेही-सोबत्यांचा, सहकाऱ्यांचा, मुले-सुना-नातवंडांचा, प्रेमाने रुजवलेल्या झाडापेडांचा श्रीमंत गोतावळा!

विचार व तत्त्व प्रेरणा देतील

लोकमतचे संस्थापक-संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्री जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी कट्टर गांधीवादी आणि समाजाच्या विकासाकरिता आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील अत्याचारग्रस्त व मूलभूत हक्कांपासून वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता परिश्रम घेतले. त्यांनी लोकमतच्या माध्यमातून विकासाभिमुख व लोकाभिमुख पत्रकारितेचा पाया बळकट केला. महाराष्ट्र व संपूर्ण देशाच्या विकासाकरिता दिलेल्या योगदानाचे सदैव स्मरण केले जाईल. त्यांचे विचार व तत्त्व भावी पिढीलाही प्रभावित करीत राहतील.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

मार्गदर्शन व प्रेरणेची संधी

जवाहरलालजी दर्डा यांनी अंतिम श्वासापर्यंत महात्मा गांधी यांचे तत्त्व जपले. देशव्यापी स्वच्छ भारत अभियान, शाश्वत विकासात भारताचे जागतिक नेतृत्व, ग्रामविकासाचे कार्यक्रम, खादीची लोकप्रियता, अशा रुपाने आज देश विविध क्षेत्रांमध्ये महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करीत आहे. आज जवाहरलालजी हयात असते तर, त्यांना हा नवीन भारत पाहून निश्चितच अभिमान वाटला असता. त्यांची जन्मशताब्दी ही त्यांच्या चरित्रापासून मार्गदर्शन व प्रेरणा घेण्याची आणि त्यातून उत्साही, सर्वसमावेशक व एकसंध समाज घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची संधी आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संस्थांची उभारणी,तत्त्वांची मांडणी

स्व. श्री जवाहरलाल दर्डा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन. राष्ट्र उभारणीत, विशेषतः स्वातंत्र्यानंतरच्या रचनात्मक वर्षांमध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. ते निर्भीड पत्रकारितेचे दीपस्तंभ आहेत. सामाजिक न्याय आणि भारताच्या सुरक्षिततेची कल्पना याबाबत त्यांची वचनबद्धता महत्त्वपूर्ण होती. त्यांचे जीवन म्हणजे संस्थांची उभारणी आणि तत्त्वांची मांडणी यांचे प्रतीक आहे.
-राहुल गांधी, काँग्रेस नेते

देशाकरिता आदर्श

जवाहरलालजी दर्डा यांनी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलन व आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन धाडस व देशाप्रति असलेल्या कटिबद्धतेचे प्रदर्शन केले. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात साम्राज्यवादी शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी व स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकमत वृत्तपत्र सुरु केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकमत राष्ट्रीय आंदोलनाचा पाठीराखा व साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारचे विरोधक होते. स्वातंत्र्यानंतर जवाहरलालजींनी लोकमतला नवसंजीवनी दिली, बहुमुखी वृत्तपत्राचे स्वरूप दिले. स्वातंत्र्यप्राप्ती, नवीन राज्यघटना, सार्वत्रिक निवडणूक, भाषावार प्रांतरचना अशा ऐतिहासिक घटनांवर लोकमतने टाकलेला प्रकाश नव्या पिढीसाठी ऐतिहासिक दस्तऐवज असून, ही कामगिरी पत्रकारांकरिता आदर्श आहे. जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीचा ऐतिहासिक क्षण व्यापक स्वरुपात देशपातळीवर साजरा करण्याचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने १०० रुपयांचे नाणे जारी केले आहे. मी जवाहरलालजी दर्डा यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
- अमित शाह, केंद्रीय गृह व सहकार मंत्री

जनहिताचे नवे मानदंड

जवाहरलालजी दर्डा यांनी राजकारण व पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. राजकारणात व (समाजकारणात नेहमी सुसंस्कृतपणा जोपासला. अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. आज पत्रकारिता व जनहिताचे नवे मानदंड लोकमत निर्माण करीत आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सामाजिक दृष्टी, समर्पित वृत्ती

बाबूजींसारखे मोजके नेते असतात, जे आपल्या हयातीत त्यांच्या कर्तृत्वाने छाप सोडतातच, शिवाय नंतरही अनेक वर्षे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहतो. राज्याच्या विकासावर दूरगामी परिणाम करणाऱ्या अनेक धोरणात्मक निर्णयांचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी दिलेली सामाजिक दृष्टी, समर्पित वृत्ती आणि समाजातील शेवटच्या माणसाच्या भल्याचा दिलेला विचार पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

दूरदर्शी लोकांच्या पिढीचे प्रतिनिधी

धगधगत्या देशभक्तांच्या एका पिढीची तीव्र इच्छा, स्पष्ट दृष्टी आणि महान बलिदानांनी भारत राष्ट्राची निर्मिती झाली. श्री जवाहरलालजी दर्डा हे दूरदर्शी लोकांच्या या पिढीतील आहेत. एक अशी व्यक्ती जी जबाबदार पत्रकारिता सुधारणा आणि शिक्षणाच्या रूपात एका महान राष्ट्राचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध राहिली. गौरवशाली भारत घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. हा वारसा असाच सुरु राहावा, हीच इच्छा.
- सद्गुरू जग्गी वासुदेवजी

Web Title: Centenary of Jawaharlal Darda, a struggler who created the world from nothing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.