आज भारत पुन्हा चंद्राच्या दिशेने झेप घेतो आहे, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:17 AM2023-07-14T11:17:21+5:302023-07-14T11:18:12+5:30
या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचणं, तिथं वैज्ञानिक उपकरणं काही काळ सुसज्ज ठेवणं आणि तिथं काही वैज्ञानिक प्रयोग करणं; ही आहेत.
माणसाला पूर्वीपासूनच पृथ्वीपलीकडच्या जगाविषयी विलक्षण कुतूहल आहे. चंद्राविषयी आपल्या सगळ्यांनाच खूप आकर्षण असतं. विज्ञान-तंत्रज्ञान या अंगांनीसुद्धा चंद्राविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. काव्यात्मक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनांमधून चंद्र महत्त्वाचा! या पार्श्वभूमीवर चंद्रयान-३ या भारताच्या नव्या चंद्र मोहिमेविषयी जाणून घेणं गरजेचं आहे.
चंद्रयान मोहिमेचं महत्त्व काय?
चंद्राच्या पृष्ठभागावर अपघात होऊ न देता यशस्वीपणे यान उतरवण्याची अवघड कामगिरी आजवर फक्त सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच करून दाखवलेली आहे. ही कामगिरी करून दाखवणारा चौथा देश म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची भारताची धडपड सुरू आहे. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होऊन भारताच्या पदरी अपयश आलं. यामुळे नाऊमेद न होता नव्यानं प्रयत्न केला जात आहे. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान चंद्राभोवतीच्या कक्षेच्या दोन किलोमीटरपर्यंत तेव्हाचं यान पोहोचलं होतं; पण त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचा मार्ग बदलला आणि चंद्रावर अलगदपणे न उतरता ते तिथे जोराने आदळलं. मोहीम अपयशी ठरली. चंद्रयान-३ साठी आज, १४ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमाराला यान चंद्राकडे झेपावणार आहे. यासाठी मध्यम क्षमतेच्या एलव्हीएम-थ्री रॉकेटची मदत घेतली जाणार आहे. हे काम अर्थातच इस्रोकडून केलं जाणार आहे.
१९६९ मध्ये इस्रोची स्थापना होण्यापूर्वीच १९६३ मध्ये भारतानं चंद्रासंबंधीची मोहीम हाती घेतली होती. गेल्याच महिन्यामध्ये भारतानं नासाबरोबर अंतराळ संशोधनासंबंधीचा शांतता करार केलेला आहे. म्हणजेच या संशोधनाचा उपयोग फक्त उपकारक कामांसाठीच केला जाईल. चंद्रयान-३ मुळे भारताला चंद्रासंबंधीच्या अनेक गोष्टी समजतील; तसंच पुढच्या चंद्र मोहिमांसाठीसुद्धा याची बरीच मदत होईल. या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचणं, तिथे वैज्ञानिक उपकरणं काही काळ सुसज्ज ठेवणं आणि तिथे काही वैज्ञानिक प्रयोग करणं; ही आहेत. चंद्राच्या पृष्ठभागाच्या साधारण १०० किलोमीटर परिसरात पोहोचल्यानंतर चंद्रयानामधले दोन भाग सुटे होतील आणि चंद्रावरच राहणारा भाग चंद्रावर अलगदपणे उतरण्यासाठी सज्ज होईल. इस्रोच्या म्हणण्यानुसार यासाठी अत्यंत आधुनिक प्रकारचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. यामध्ये चंद्रावर अलगदपणे उतरण्याची व्यवस्था आहे. तसंच वाटेत येणारे अडथळे टाळणं आणि त्यापासून आपल्याला इजा होऊ न देणं अशी व्यवस्था या यानामध्ये असेल. चंद्रावर नेमकी कशी परिस्थिती असेल यासाठीच्या अनेक चाचण्या इस्रोनं घेतल्या आहेत.
उदाहरणार्थ चंद्रावरच्या अति शीतल वातावरणासारखं वातावरण कृत्रिमरीत्या निर्माण करणं; तसंच चंद्राच्या पृष्ठभागासारख्या पृष्ठभागावर यान उतरवल्यानंतर नेमकं काय होईल; यासंबंधीचे प्रयोग अशा गोष्टी इस्रोनं तपासल्या आहेत. चंद्रयान-३ यंत्रणेचे तीन मुख्य भाग आहेत. पहिला रोव्हर, दुसरा लँडर आणि तिसरा प्रपोल्शन इंजिन. रोव्हर यंत्रणा चंद्राच्या पृष्ठभागाचा अंदाज घेणं, त्याची वैज्ञानिक मोजमापं करणं, पृष्ठभाग तपासणं अशा सगळ्या गोष्टी करेल. पृथ्वीकडे ही माहिती पाठवण्यासाठी लँडरचा वापर होईल. प्रपोल्शन इंजिन अर्थातच यानाला गती देण्यासाठी वापरलं जाईल. चंद्रावर बर्फ आढळतो हे शोधून काढणं हे चंद्रयान-१ मोहिमेचं सगळ्यात मोठं यश मानलं जातं. त्यानंतर २०१९ मध्ये चंद्रयान-२ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान आलेल्या अपयशातून शिकलेले धडे चंद्रयान-३ मोहिमेत कामाला येतील; असं या मोहिमेशी संबंधित असलेले तज्ज्ञ म्हणतात. याचं एक ठळक उदाहरण म्हणजे चंद्रयान-३ मोहिमेमध्ये ऑर्बिटर ही यंत्रणाच नाही. ती आधी वापरली जात असे.
दुसरं म्हणजे चंद्रयान-२ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागाच्या परीक्षणासाठी तब्बल नऊ वेगवेगळी वैज्ञानिक उपकरणं बसवण्यात आली होती; पण चंद्रयान-३ मध्ये मात्र यासाठी केवळ एकच उपकरण आहे. यामुळे चंद्रयान-३ मधली तांत्रिक क्लिष्टता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. चंद्रयान-२ च्या मानानं चंद्रयान-३ मध्ये आपल्या मार्गात येत असलेले संभाव्य अडथळे हुडकणं आणि त्यांच्यावर तातडीनं मार्ग काढणं यासाठीची यंत्रणाही अद्ययावत आहे. भारताच्या वैज्ञानिक तसंच अवकाशासंबंधीच्या प्रगतीसाठी चंद्रयान-३ मोहिमचं महत्त्व म्हणूनच खूप जास्त आहे. साहजिकच या मोहिमेकडे आपल्या सगळ्यांचंच नव्हे तर अख्ख्या जगाचं लक्ष लागून राहणं स्वाभाविकच आहे!
अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक akahate@gmail.com