चक्रव्यूहात धर्मराज!

By admin | Published: July 13, 2015 12:20 AM2015-07-13T00:20:26+5:302015-07-13T00:20:26+5:30

पुण्यनगरीतील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली गजेंद्र चौहान यांची नेमणूक रद्द व्हावी, या मागणीसाठी सदर संस्थेतील

Chakravyavrat Dharmaraj! | चक्रव्यूहात धर्मराज!

चक्रव्यूहात धर्मराज!

Next

पुण्यनगरीतील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली गजेंद्र चौहान यांची नेमणूक रद्द व्हावी, या मागणीसाठी सदर संस्थेतील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या संपाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. खासगी चित्रवाहिनीवरील केवळ एका महामालिकेतील युधिष्ठिराच्या भूमिकेमुळे कलेच्या क्षेत्रात आपली थोडीफार ओळख निर्माण करूशकलेले चौहान देशातील या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेची सूत्रे धारण करण्यास योग्य नाहीत, हा संबंधित विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. चौहान यांच्या कलेच्या क्षेत्रातील वावरापेक्षा राजधानी दिल्लीतील सत्ताधारी भाजप आणि परिवाराच्या अंगणातील वावरानेच त्यांना इतकी मोठी जबाबदारी प्राप्त झाली, हेही आता जवळजवळ उघड झाले आहे. त्यांच्या संघ वा भाजपतील वावरावर घेतला जाणारा आक्षेप राजकीय हेतूने प्रेरित असूही शकेल; पण खरा आक्षेप त्यांच्या वकुबावर आहे. तसे असताना संबंधित खात्याचे मंत्री अरुण जेटली अजूनही त्यांचीच पाठराखण करीत आहेत; पण ती आता अधिक काळ करता येणार नाही असे वातावरण तयार होऊ लागले आहे. संपकरी विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पल्लवी जोशीने याआधीच राजीनामा देऊन टाकला आहे. आणखीही काही राजीनामे आले आहेत. भाजपच्या खासदार किरण खेर यांचे पती आणि विख्यात चरित्र अभिनेते अनुपम खेर यांनी, तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष व ख्यातकीर्त निर्माते अदूर गोपालकृष्ण यांनीही गजेंद्र यांनी आता आपणहून राजीनामा देऊन बाहेर पडावे असे जाहीर आवाहन केले आहे. ऋषी कपूर यांनीदेखील या दोहोंच्या सुरात आपला सूर मिसळला आहे; पण विशेष म्हणजे खुद्द भाजपतील एक बडे प्रस्थ आणि याच संस्थेत अभिनयाचे धडे घेऊन बाहेर पडलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी तर अचानक संपकरी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मध्यस्थीची तयारी दाखविली आहे. सिन्हा यांचा कलेच्या क्षेत्रातील वकूब लक्षात घेता त्यांनाच आता गजेंद्र चौहान यांच्या जागी नेमून टाकावे, असा आग्रह भाजपतीलच काही मंडळी म्हणे धरू लागली आहेत. याचा अर्थ चक्रव्यूहात सापडलेल्या युधिष्ठिराची सुटका शत्रुघ्नाने करावी अशी ही योजना. त्यामागे बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा जी लुडबूड करू शकतात, त्यापासून पक्षाला वाचविण्याचा हेतू असू शकतो. अर्थात तो सिन्हांच्या लक्षात येणार नाही, असे नाही. त्यामुळेच बहुधा ते फक्त मध्यस्थीचीच भाषा करीत आहेत.

Web Title: Chakravyavrat Dharmaraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.