लेखकांसमोर समाजाला तिमिराकडून तेजाकडे नेण्याचे आव्हान!

By admin | Published: August 9, 2015 01:25 AM2015-08-09T01:25:57+5:302015-08-09T01:25:57+5:30

वाङ्मय केवळ स्वायत्त गोष्ट नाही. तिचा संबंध समाज व संस्कृती ह्यांच्याशी अपरिहार्यपणे असतोच़ त्यामुळे वाङ्मयातील क्रांतीचा संबंधही समाज आणि संस्कृती ह्यांच्यातील अपेक्षित विकासोन्मुख

The challenge before the authors to take Tejira to Teja | लेखकांसमोर समाजाला तिमिराकडून तेजाकडे नेण्याचे आव्हान!

लेखकांसमोर समाजाला तिमिराकडून तेजाकडे नेण्याचे आव्हान!

Next

- डॉ. अक्षयकुमार काळे

वाङ्मय केवळ स्वायत्त गोष्ट नाही. तिचा संबंध समाज व संस्कृती ह्यांच्याशी अपरिहार्यपणे असतोच़ त्यामुळे वाङ्मयातील क्रांतीचा संबंधही समाज आणि संस्कृती ह्यांच्यातील अपेक्षित विकासोन्मुख ध्येयशील परिवर्तनाशी असतो. हे परिवर्तन एखाद्या लेखकाच्या अचाट प्रयत्नांच्या आणि प्रतिभेच्या जोरावर अतिशय वेगाने होते, तेव्हा त्याला आपण वाङ्मयातील क्रांती असे म्हणू शकतो.
वाङ्मय क्षेत्रात निर्मितीला साचलेपणाची कळा येते. तोच तो विकासविन्मुख आशय साहित्यातून पुन:पुन्हा प्रगट होऊ लागतो. स्वकाळाशी समरस न होता, सभोवतालची जीवनविषयक आव्हाने न स्वीकारता, समकालीन परिस्थितीतून येणाऱ्या अनुभूतीतून आपल्या रचनेचे घाट न शोधता जेव्हा लेखक पौराणिक, ऐतिहासिक, त्याच त्या रंजक घटनांत, पूर्वसुरींनी दळलेल्या दळणात आपल्या प्रेरणा शोधतात आणि सातत्याने अनुकरणजीवी नि:सत्व निर्मिती करू लागतात. इतकेच नव्हे तर उथळ रंजनद्रव्ये वापरून सामान्य रसिकांना भुलवतात, खोट्या आणि बेगड्या रसिकतेला उत्तेजन देऊन आपला वाङ्मयीन कचरा आकर्षकपणे डबाबंद करून जाहिरातीच्या आधारावर हातोहात खपवतात, तेव्हा वाङ्मयीन अराजक निर्माण होते. ‘जल सडले ते निभ्रान्त। तरि धूर्त त्यास तीर्थत्व। देउनि नाडती भोळे।’ अशी स्थिती निर्माण होते तेव्हा त्याविरुद्ध उठावाची गरज निर्माण होते. वाङ्मय प्रांतातील मिळमिळीतपण अवघेच टाकून उत्कट भव्य वास्तव्याकडे मार्गक्रमण करण्याची, तिमिराकडून तेजाकडे संपूर्ण समाजाला घेऊन जाण्याची जबाबदारी क्रांतिकारी लेखकावर येत असते.
मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातदेखील असे अराजक वेळोवेळी निर्माण झाले आणि त्या त्या काळात समर्थ लेखकांनी त्याविरुद्ध करावयाच्या बंडाचे आव्हान पेलल्याचे दिसते. त्यांनाच आपण क्रांतिकारी लेखक म्हणतो. त्यात पहिले नाव ज्ञानेश्वरांचे. कवी बी यांनी ‘पहिला बंडवाला’ म्हणून त्यांचा सार्थ गौरव केला आहे. संस्कृत भाषेवर असामान्य प्रभुत्व असतानादेखील त्या भाषेत निर्मिती न करता किंवा त्यातील शृंगारप्रवण कथानकाची आळवणी मराठीत वेगळ्या पद्धतीने न करता आपल्या सभोवतालचा बहुजन समाज अध्यात्मप्रवण, कर्तव्यनिष्ठ कसा होईल हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असे करताना ‘वेदु किरू होए आपणाठायी। परि कृपणु ऐसा आन नाही। जो कानी लागला तिहि। वर्णांच्याचि।’ असे म्हणून बहुजनांप्रति कंजूष असणाऱ्या वेदांचे वाभाडे काढले. वाङ्मयीन क्रांती अशाच मन:प्रवृत्तीतून होते. कोणत्याही वाङ्मयीन क्रांतीच्या मूलगर्भात मानवतेच्या प्रेमाचा उत्कट लाव्हा ओसंडून बाहेर येण्यासाठी उत्सुक झालेला असतो. तुकारामांनाही आपल्या क्रांतिकार्यासाठी त्याचा आधार मिळतो. अर्वाचीन काळात अशीच क्रांती महात्मा फुले यांच्या आणि केशवसुतांच्या लेखनाने झाली. फुले तर महाराष्ट्रातल्या सामाजिक क्रांतीचे जनकच होते.
नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे।
अशी क्रांतिकारी वीरनायकाची प्रतिमा
फुले यांच्या आणि आगरकरांच्या प्रणमनशील व्यक्तिमत्त्वांशी झालेल्या सात्मीकरणातूनच केशवसुतांना साकार करता आली आणि ‘तुतारी’, ‘स्फूर्ती’, ‘नवा शिपाई’ यांसारख्या मराठी काव्यात संपूर्णपणे क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कविता लिहिता आल्या.
पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे
टेकुनि ती जनताशीर्षावरि जग उलथुनिया देऊ कसे!
बंडाचा तो झेंडा उभवुनि धामधूम जिकडे तिकडे
उडवुनि देउनि, जुलुमाचे या करू पहा तुकडे तुकडे
असे वाङ्मयातल्या क्रांतीसाठी आवश्यक असणारे बंडाचे निशाण उभारता आले. अनिल - मुक्तिबोधांना या निशाणाखाली आपल्या वाङ्मयीन क्रांतिकार्याची दिशा ठरवता आली. मर्ढेकरांच्या नवकाव्याने साधलेल्या वाङ्मयीन क्रांतीमागे केशवसुतांच्या प्रगमनशील धगधगत्या व्यक्तिमत्त्वापासून दूर सरकलेल्या आत्मनिष्ठाशून्य वाङ्मयामुळे निर्माण झालेला प्रक्षोभच होता. साम्यवादी सुर्व्यांना आणि आंबेडकरांच्या तेजस्वी आणि झुंजार व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या दलित लेखकांना आलेल्या आत्मभानामुळे, त्यांनी खोलवर चालवलेल्या आत्मशोधामुळे, प्रचलित व्यवस्थेला दिलेल्या दृढ नकारामुळे आणि स्वीकारलेल्या सर्वंकष विद्रोहाच्या भूमिकेमुळे मराठी साहित्यात क्रांतिसन्मुख परिवर्तनाची लाट उसळली. आदिवासी साहित्य ही या नाण्याची दुसरी बाजू होय. वाङ्मयीन क्रांतीच्या या ऊर्जस्वल पार्श्वभूमीवर आजच्या अगदी समकालीन वाङ्मयाचे चित्र निराशाजनक आहे.

कोणत्या अन् कशा वाङ्मयीन क्रांतीचे स्वप्न बघायचे ?
मूळचा सधन, मध्यम वर्ग, बहुजन आणि दलित ह्यातून शिकून निर्माण झालेला मध्यम वर्ग या सर्वांनीच चढाओढीने इंग्रजीच्या पायावर लोळण घेऊन आपल्या मातृभाषेला आणि अस्मितेला कमालीचे दुय्यम महत्त्व द्यावयाचे ठरविले असताना कोणत्या आणि कशा वाङ्मयीन क्रांतीचे स्वप्न बघायचे, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे.

या क्रांतिदिनी आमचे उदयोन्मुख लेखक निर्मिती वृत्ताची दिव्य दाहकता समजून घेऊन क्रांतिकारी लेखकांच्या आत्म्यांचा शोध करून प्रकाशाच्या वाटा उजळतील तर मराठी साहित्य नव्या वाङ्मयीन क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू लागेल. एरवी क्रांतीचा तवंग असणारी जात-जमातनिहाय वाङ्मयीन डबकी जागोजागी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.

(लेखक हे मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक आहेत.)

Web Title: The challenge before the authors to take Tejira to Teja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.