मधुमेहाचे आव्हान
By admin | Published: March 31, 2016 03:34 AM2016-03-31T03:34:27+5:302016-03-31T03:34:27+5:30
मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला
मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात ज्या गतीने मधुमेहींच्या संख्येत वाढ होत आहे, ती बघू जाता हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरकरणी अत्यंत साधा वाटणारा हा आजार अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण करू शकतो आणि त्यामुळे जीवघेणाही ठरू शकतो. दुर्दैवाने आजच्या घडीला तरी मधुमेहाचे निर्दालन करणारे औषध उपलब्ध नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देता, सामान्य पातळीच्या शक्य तेवढे जवळ राखण्याचे आणि त्याच वेळी ते सामान्य पातळीच्या खाली न जाऊ देण्याचे व्यवस्थापन करणे, एवढेच डॉक्टर आणि रुग्णाच्या हातात असते. सकस आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि सोबतीला आवश्यक ती औषधे नियमितपणे घेणे, एवढे केले तरी मधुमेही अनेक वर्षे आरोग्यदायी जीवन जगू शकतो. वर्षानुवर्षे असे जीवन जगण्यासाठी शिस्त, नियमितपणा आणि सातत्य या गुणांची अत्यंत आवश्यकता असते. दुर्दैवाने भारतीयांमध्ये हे गुण अभावानेच आढळतात. शिवाय देशात अजूनही अगदी उच्च शिक्षित वर्गातही आरोग्यविषयक जागृतीचा अभाव दिसून येतो. याला जोड लाभली आहे, ती झपाट्याने बदलत असलेल्या जीवनशैलीची! बदलत चाललेली खाद्य संस्कृती, भोजनात निकस, पोटभरू पदार्थांचा समावेश, मद्यपान, रात्रीची जागरणे, वाढत्या स्पर्धेमुळे व ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्या कारणांचा परिपाक म्हणून मधुमेह भारतात झपाट्याने हातपाय पसरत आहे. २०१५ मध्ये एकूण प्रौढ नागरिकांपैकी (वय २० ते ७९) ८.७ टक्के नागरिक मधुमेहग्रस्त होते. हेच प्रमाण २०१० मध्ये ७.२ टक्के एवढे होते. मधुमेहाची झपाट्याने होणारी वाढ यातून लक्षात येते. हा आजार प्रामुख्याने विकसित देशांमधला मानला जात असला तरी भारताने याबाबत ब्रिटनसारख्या विकसित देशाला कधीच मागे टाकले असून, येत्या काही वर्षात अमेरिकेलाही मागे टाकेल, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेहाने महामारीचे स्वरुप घेण्यापूर्वीच, भारत सरकार आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.