मुंबई विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:00 AM2018-05-14T00:00:04+5:302018-05-14T00:00:04+5:30

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य 

Challenge to get the University of Mumbai a great future! | मुंबई विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान!

मुंबई विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान!

googlenewsNext

योगेश बिडवई

यू कॅन विन; कार्यक्षम कारभाराची कुलगुरू सुहास पेडणेकरांकडून अपेक्षा

डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नियुक्तीचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. संशोधक व उत्तम प्रशासक असलेल्या डॉ. पेडणेकर यांच्याकडून सर्वांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे. परीक्षा विभाग टिकेचे लक्ष्य ठरला आहे. निकाल वेळेवर लागण्यासाठी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी चुकीच्या नियुक्त्या त्यांना रद्द कराव्या लागणार आहेत.

डॉ. पेडणेकर आणि रुईया महाविद्यालय हे अनेक वर्षांचे समीकरण होते. प्राचार्यपदाच्या कारकीर्दीत त्यांनी महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली. ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे यश, १३ नवे अभ्यासक्रम सुरू करणे आदींतून त्यांच्या उत्तम प्रशासनाची झलक दाखविली. १६१ वर्षांची ज्ञानदानाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. मुंबई व कोकणातील ७४९ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

डॉ. पेडणेकर यांनी विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी पहिल्याच आठवड्यात सर्वांकडून सूचना मागविण्यास सुरुवात करून त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. नव्या कुलगुरू परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. निकालाचा अभूतपूर्व गोंधळ झाल्याने डॉ. संजय देशमुख यांची राज्यपालांनी गच्छंती केली. अनेक महाविद्यालये परीक्षा विभागाला सहकार्य करत नाहीत. प्राध्यापक पेपर तपासत नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे हाच उपाय आहे, अन्यथा निकाल वेळेवर लावणे पुन्हा अशक्य होईल. विधी विभागातील पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षेत प्रश्नपत्रिका सदोष होती. पेपर सेटर डॉ. स्वाती रौतेला यांनी चुकांची कबुली दिली.

त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांना शिक्षेऐवजी अभ्यास मंडळावर अंतरिम नियुक्ती केली. निकाल गोंधळामुळे विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा उजळण्यासाठी डॉ. पेडणेकरांना दोषी लोकांवर आधी कारवाई करावी लागणार आहे. जबाबदारीच्या पदावर कार्यक्षम व अनुभवी प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. अन्यथा डॉ. पेडणेकर यांची कारभार सुधारण्याची भाषा ‘केवळ तोल मोल के बोल’ ठरेल.
परीक्षा विभागात नियंत्रकांची पूर्ण वेळ पदे रिक्त आहेत. केवळ त्याची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्षमतेने काम होत नाही. प्रवेश प्रक्रियासुद्धा आॅनलाईन होण्याची गरज आहे. त्यामुळे कोटा व्यवस्थित भरला जाईल. अर्थशास्त्र विभागात वाङमय चौर्याचे प्रकरण गाजले. राज्यपालांच्या निर्देशानुसार समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल दिला. मात्र विद्यापीठाने हा अहवाल दडपल्याची स्थिती आहे. हा अहवाल सर्वांसमोर ठेवण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याचे धाडस कुलगुरूंना दाखवावे लागणार आहे. कुलगुरू पहिल्या महिन्यात कोणते निर्णय घेतात, त्यावरच त्यांची वाटचाल स्पष्ट होईल.

विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मुंबईची प्रतिष्ठा कायम राहणार आहे. विद्यापीठात संशोधनाचे काम जवळपास ठप्प झाले आहेत. डॉ. पेडणेकर हे स्वत: रसायनशास्त्र आहेत. ते संशोधनाला चालना देतील, अशी अपेक्षा आहे.
विद्यापीठात अनेक प्राध्यापक निवृत्तीनंतरही पदाला चिकटून आहेत. त्यांच्याऐवजी नव्या दमाच्या प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच विद्यापीठाअंतर्गत अनेक स्वायत्त संस्थांवर अनुभव नसलेल्या व्यक्तींची वर्णी लागली आहे, त्याचा कुलगुरूंना विचार करावा लागेल.

विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी उमासा व मुक्ता संघटना काम करत आहेत. मूलभूत सेवाहक्क, वेळेवर बढती, सेवार्थ प्रणालीची अंमलबजावणी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कुलगुरूंनी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. संजय देशमुख यांनी दोन अधिकाऱ्यांवर विश्वास ठेऊन त्यांच्यावर बरेचसे निर्णय सोपविले होते. त्याचा
त्यांना फटका बसला. नव्या कुलगुरूंना ‘अशा’ अधिकाºयांपासून दूर राहण्याची कसरत करावी लागणार आहे. कुलगुरूंनी राजकीय नियुक्त्या टाळून कारभार केल्यास विद्यापीठाला ते नक्कीच नावलौकिक मिळवून देतील.

Web Title: Challenge to get the University of Mumbai a great future!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.