दहशतीला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:21 AM2018-03-22T05:21:12+5:302018-03-22T05:28:16+5:30
दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त करून शांती व विकासाची गुढी उभारणा-या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा गावातील नागरिकांच्या धाडसाला सलामच करायला हवा.
दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त करून शांती व विकासाची गुढी उभारणा-या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा गावातील नागरिकांच्या धाडसाला सलामच करायला हवा. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण बळी पडलो, त्यांच्यामुळेच आपला विकास झाला नाही, ही बाब आता नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना कळून चुकली आहे. म्हणून की काय, आठ दिवसांपूर्वी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावाच्या हद्दीत असलेले नक्षल स्मारक तोडण्याचा निर्णय घेत नक्षल चळवळीलाच खुले आव्हान देण्यात आले. गुढीपाडव्याची तारीख यासाठी ठरविण्यात आली आणि एकाच दिवशी चार नक्षल स्मारके खुलेआम तोडल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. उलट नक्षल हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांचे स्मारक उभारण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील तीन ते चार गावात सुरू झाले आहे. कालपर्यंत ज्या गावातील माणसं नक्षल्यांना आपली वाटायची ती आता त्यांच्या मनसुब्यांना ओळखून दुरावू लागली आहेत. त्यामुळे नक्षल्यांचे मनोबल खचू लागले आहे. भरकटलेल्या युवक-युवतींना नक्षलवादी चळवळीपासून दूर नेऊन आत्मसमर्पणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारालाही आता यश मिळू लागले आहे. ठिकठिकाणी जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींना त्यात सहभागी करून घेण्यात येत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. पोलीस चौक्यांचे जाळे पसरू लागले आहे. गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गावकºयांच्या विविध पातळीवरील समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्यांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांकडे नुसता पाठपुरावाच केला जात नाही तर त्या सुटत असल्याने आदिवासींचा लोकतंत्रावरील विश्वास आणखी घट्ट होऊ पाहत आहे. नुकताच ‘गांधी विचार व अहिंसा’ या पुस्तकातील उतारा एकाच वेळी ७०४१ जणांना ऐकवून गडचिरोलीवासीयांनी शांतीचा संदेश देत तुर्कस्तानचा विक्रम मोडला. गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््सच्या चमूने या ऐतिहासिक कार्यक्रमाची घेतलेली दखल नक्षलवादाविरोधी पुकारण्यात आलेल्या लढ्याची सुरुवात असून नक्षल चळवळीला ओहोटी लागत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.