‘इसिस’चे आव्हान
By Admin | Published: July 4, 2016 05:35 AM2016-07-04T05:35:11+5:302016-07-04T05:35:11+5:30
बांगलादेशाची राजधानी ढाका या पाठोपाठ इराकची राजधानी बगदादच्या मध्यवर्ती भागात शनिवार-रविवारी जे दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट घडविण्यात आले
अमेरिकेतील आॅरलँडो, तुर्कस्थानमधील इस्तंबूल, बांगलादेशाची राजधानी ढाका या पाठोपाठ इराकची राजधानी बगदादच्या मध्यवर्ती भागात शनिवार-रविवारी जे दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट घडविण्यात आले, त्यात ८० नागरिक ठार झाले तर १६० हून अधिक जण जखमी झाले. गेल्याच आठवड्यात तुर्कस्थानच्या इस्तंबूल शहरातील विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी ४१ जणांचा बळी घेतला होता. या चारही दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारीही ‘इसिस’ने घेतली आहे. सीरिया व इराक या पश्चिम आशियातील दोन देशांचा जो काही भाग ‘इसिस’च्या ताब्यात आहे, तेथे मोठ्या प्रमाणावर अमेरिका व रशियाकडून बॉम्बहल्ले होत आहेत. काही गावेही ‘इसिस’ला सोडून द्यावी लागली आहेत. इराकमधील फालूजा हे मोठे शहर ‘इसिस’ने पहिल्या झटक्यातच काबीज केले होते. पण गेल्या पंधरवड्यात इराकी फौजांनी ते परत घेतले. थोडक्यात सांगायचे झाले, तर ‘इसिस’वर लष्करी दबाव वाढत आहे आणि त्यातून सुटका करवून घेण्यासाठी इतर देशांत असे दहशतवादी हल्ले करण्यावर या संघटनेचा भर वाढत असण्याची शक्यता नाहे. अर्थात कारण काहीही असो, या दहशतवादी संघटनेकडून समाज माध्यमांतून जो विखारी प्रचार होत आहे, त्यापासून प्रेरणा घेऊन इराक व सीरिया किंवा पश्चिम आशियापासून दूरवर असलेल्या देशांतही होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत गेले आहे. ढाक्यातील हल्ल्याने बांगलादेशातील ‘इसिस’च्या कारवायांनी पुढचा टप्पा गाठला असल्याचे अनुमान काढता येऊ शकते. या आधी त्या देशातील अल्पसंख्य हिंदू किंवा जिहादी दहशतवादाच्या विरोधात लिखाण व प्रचार करणारे यांना ‘इसिस’ लक्ष्य करीत आली होती. अनेक ‘ब्लॉगर्स’ची निर्घृणपणे गेल्या वर्षभरात हत्त्या करण्यात आली. मात्र अशा रितीने संघटितरीत्या प्रथमच ‘इसिस’ने हल्ला केला आहे. बांगलादेशातील अवामी लीग पक्षाच्या सरकारपुढील हे मोठे बिकट आव्हान आहे. पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी जहाल इस्लामवाद्यांच्या विरोधात आघाडीच उघडली आहे. बांगलादेश मुक्तीच्या लढ्याच्या वेळी ढाका येथे जो मोठा नरसंहार जमात-ए-इस्लामीने घडवून आणला होता, त्यातील अनेक नेते व कार्यकर्ते यांच्यावर खटले चालवून त्यांना फाशीपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा सुनावल्या जात आहेत. त्यामुळे बांगलादेशातील जहाल इस्लामवादी शेख हसिना यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. ढाक्यात हल्ला झाला, त्याच्या तीनच दिवस आधी भारताच्या ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ‘इसिस’पासून प्रेरणा घेऊन आणि या दहशतवादी संघटनेच्या मदतीने देशात घातपात घडवून आणण्याचा कट आखणाऱ्या ११ तरूणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर बांगलादेशात प्रथमच ‘इसिस’ने संघटितरीत्या असा हल्ला घडवून आणावा, हा योगायोग नाही. भारताच्या दरवाजापर्यंत ‘इसिस’चे संकट येऊन ठेपल्याचे आतापर्यंत मानले जात होते. पण हैदराबाद येथील अटकसत्राने हे संकट आता देशात येऊन पोचल्याचे दाखवून दिले आहे. ‘इसिस’च्या आव्हानास तोंड देण्यासाठी सुरक्षा दलांच्या पराकोटीच्या जागरूकतेची जशी गरज आहे, तशीच आवश्यकता आहे, ती ‘दहशतवाद’ व ‘मुस्लीम’ या दोन्ही मुद्यांचा सत्तेच्या राजकारणासाठी वापर करण्यात येणार नाही, यावर किमान सहमती देशात घडवून आणण्याची. जम्मू व काश्मीरमधील पाम्पोर येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय सुरक्षा दलाचे आठ जवान शहीद होण्याची जी घटना घडली, ती या दृष्टीने अतिशय बोलकी आहे. ठरवून दिलेली कार्यपद्धती न वापरल्यामुळे हा हल्ल्ला करण्याची संधी दहशतवाद्यांना मिळाली असण्याची शक्यता संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच बोलून दाखवली आहे. त्यातही या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान कोणी घातले, यावरून लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यातच जुंपली आहे. शिस्त व जागरूकता यांचा स्तर जर इतका घसरला असेल, तर दहशतवाद्यांना हल्ले करण्याची संधी मिळाल्याविना कशी राहील?. दुसऱ्या बाजूला ‘बांगलादेशी’ हा आसामातील निवडणुकांच्या आधी व आता तेथे भाजपा-आसाम गण परिषद यांचे आघाडीचे सरकार आल्यावर राजकारणातील भावनिक मुद्दा बनवण्यात आला आहे. त्याचे पडसाद अपरिहार्यपणे बांगलादेशातील अंतर्गत राजकारणात उमटणार आहेत. त्यामुळे जहाल इस्लामवाद्यांच्या विरोधात पाय रोवून उभ्या असलेल्या शेख हसिना वाजेद यांच्या अडचणीत भर पडत जाईल. त्याने तोटा होणार आहे, तो भारताचाच. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आता समान नागरी कायद्याचा मुद्दा पुन्हा उगाळण्यात येऊ लागला आहे. धर्म कोणताही असो, त्यातील जहालांचाच अशा सामाजिक ध्रुवीकरणाच्या डावपेचाने फायदा होत असतो. सौहार्द व सामंजस्याऐवजी विसंवाद व विद्वेष हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनत असेल, तर ‘इसिस’ असो वा ‘इंडियन मुजाहिदीन, जहालवाद्यांना सुरक्षा दलांच्या बळावर रोखणे नुसते कठीणच नव्हे, तर अशक्यही बनेल, याची उमज आपल्या देशातील राजकीय नेत्यांना पडेल, तो सुदिनच म्हणावा लागेल!