एकाधिकाराला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:31 AM2019-08-31T05:31:53+5:302019-08-31T05:31:59+5:30
पुतीन हे जागतिक कीर्तीचे मुक्केबाज आहेत आणि त्यांना जराही विरोध खपणारा नाही. या स्थितीत मॉस्कोत त्यांच्याविरुद्ध होत असलेली प्रचंड ...
पुतीन हे जागतिक कीर्तीचे मुक्केबाज आहेत आणि त्यांना जराही विरोध खपणारा नाही. या स्थितीत मॉस्कोत त्यांच्याविरुद्ध होत असलेली प्रचंड निदर्शने त्यांच्या सत्तेला आव्हान उभे होत असल्याचे सांगणारी आहेत.
रशियाच्या अध्यक्षपदी आपणच तहहयात राहू अशी घटनादुरुस्ती अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी करून घेतली असली तरी त्यांचा यापुढचा अध्यक्षीय कार्यकाळ सुखासमाधानाचा राहील अशी चिन्हे नाहीत. रशियात विरोधी पक्ष आहेत. पण ते कायमचे दुबळे व कमकुवत राहतील अशी व्यवस्था आहे. जुना कम्युनिस्ट पक्ष इतिहासजमा आहे आणि पुतीन यांचाच एक पक्ष सर्वंकष व सर्वशक्तिमान आहे. स्वत: पुतीन हे जागतिक कीर्तीचे मुक्केबाज आहेत आणि त्यांना जराही विरोध खपणारा नाही. या स्थितीत मॉस्कोमध्ये त्यांच्याविरुद्ध होत असलेली प्रचंड निदर्शने त्यांच्या सत्तेला आव्हान उभे होत असल्याचे सांगणारी आहेत. मॉस्को महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्या निवडणुकीत विशिष्ट संख्येएवढ्या मतदारांच्या सह्यांनिशी पाठिंबा मिळवू शकणाऱ्यालाच तेथे उमेदवार होता येते ही स्थिती आहे. तेवढ्या सह्या फक्त पुतीनचा पक्ष मिळवू शकतो. इतरांना त्या मिळत नाहीत. जे देतील ते लगेच सरकारच्या नजरेत संशयितही होतात. त्यामुळे निवडणूक एकतर्फी व एकपक्षीय होण्याचीच शक्यता तिथे मोठी आहे. या अवस्थेला विरोध करण्यासाठी मॉस्कोच्या जनतेने निषेधाचे आंदोलन सुरू केले असून त्याने कमालीचे उग्र स्वरूप धारण केले आहे. दर दिवशी पोलीस व इतर संरक्षक यंत्रणा आणि मतदार यांचे लढे मॉस्कोच्या रस्त्यावर होताना दिसत आहेत. शिवाय ते थांबण्याची शक्यताही दिसत नाही.
रशियात आता कम्युनिस्ट हुकूमशाही नाही, पण पुतीन यांची एकहाती राजवटही त्या हुकूमशाहीहून कमी नाही. परिणामी लोक विरुद्ध सरकार असा लढा तेथे सुरू आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाही यांच्या प्रेरणा कमालीच्या शक्तिशाली असतात. या प्रेरणांनी विश्वव्यापी साम्राज्यांनाही पराभूत केल्याचे आपण भारतात अनुभवले आहे. त्यातून रशियन जनता शस्त्रांना सरावलेली आहे. तिने क्रांती अनुभवली आणि दुसरे महायुद्धही अनुभवले आहे. त्यामुळे पुतीन विरुद्ध लोक ही लढाई लवकर संपेल अशी नाही. पुतीन हे वृत्तीने कमालीचे एककल्ली व वाटाघाटी किंवा चर्चा यांना दुबळे मानणारे नेते आहेत. आपल्या मर्जीनुसारच शासन चालेल अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे हा संघर्ष वाढण्याची व त्यात अनेकांचा बळी जाण्याची शक्यताही मोठी आहे. रशियाचा गेल्या १०० वर्षांचा इतिहासही अशांतता व युद्धे यांचाच राहिला आहे. मात्र आताचा लढा सरकार विरुद्ध जनता असा आहे आणि तो नवा व अभूतपूर्व असा आहे. अशा देशात शांततामय चळवळी नसणे किंवा शांतीचा संदेश घेऊन जनता व सरकार यांच्यात मध्यस्थी करणारेही दुसरे कुणी नसते.
१९५० च्या दशकातील बुल्गानिन, ख्रुश्चेव्हनंतरची ब्रेझ्नेव व इतरांची राजवटही कमालीची अशांततामय राहिली. त्यांनी जगालाही सतत धमक्या दिल्या व आपल्या जनतेलाही सातत्याने धाकात ठेवले. पुतीन यांचा आरंभीचा काळ तुलनेने शांततेचा होता. त्याआधी आलेल्या गोर्बाचेव्ह यांनी कम्युनिस्ट पक्ष संपविला व सोव्हिएत युनियन या महासंघराज्याचे १५ घटकांत विभाजन केले. त्यामुळे नंतरचे पुतीन शांत व लोकशाही मार्गाने जाणारे राहतील, अशी आशा अनेकांना वाटत होती. तसे काही काळ ते राहिलेही, परंतु सत्तेला आव्हान उभे झाले की लोकशाहीतील राज्यकर्त्यांमध्येही हुकूमशहा जागे होत असतात. पुतीन यांचा स्वत:चा इतिहासही ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख राहिल्याचा आहे. लोकशाही, चर्चा, सहसंमती या साऱ्यांपेक्षा एकाधिकार, गुप्तता व संशयखोरी यांचाच त्यांच्यावरील संस्कार मोठा आहे. त्यामुळे आताचे आंदोलन ते कसे खपवितात की चिरडून टाकतात याची जगाला चिंता आहे. रशियासारखा अण्वस्त्रधारी देश शांत व सुखरूप असणे ही जागतिक शांततेचीही हमी आहे. पण आताचे आंदोलन लवकर शमले नाही तर तेथील शांतताही टिकायची नाही व अशांत आणि अण्वस्त्रधारी देश मग विश्वासाचेही राहायचे नाहीत.
सबब मॉस्कोतील निवडणुका शांततेने पार पडाव्या व त्यामुळे जगालाही चिंतामुक्त होता यावे ही सदिच्छाच आपण बाळगणे आवश्यक आहे. जे देश वर्षानुवर्षे युद्ध व अशांतता जगत आले त्यांच्या वाट्याला आता तरी समाधान व शांततामय जीवन यावे असेच यासंदर्भात कुणालाही वाटेल.