उ. कोरियाच्या हुकूमशहाचे नागवे आव्हान
By admin | Published: July 7, 2017 12:53 AM2017-07-07T00:53:19+5:302017-07-07T00:53:19+5:30
नागव्याला परमेश्वरही भितो, अशा अर्थाची एक म्हण उर्दूत आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाही भीती घालावी असे हे नागवेपण उत्तर कोरियाच्या किम उल सूंग या
नागव्याला परमेश्वरही भितो, अशा अर्थाची एक म्हण उर्दूत आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाही भीती घालावी असे हे नागवेपण उत्तर कोरियाच्या किम उल सूंग या हुकूमशहाने सध्या धारण केले आहे. ४ जुलै या अमेरिकेच्या स्वराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्याने होसांग १४ या नावाचे आपले क्षेपणास्त्र २८०० कि.मी.हून अधिक (१७०० मैल) उंचीवर अंतरिक्षात पोहचवून अमेरिकेसह साऱ्या जगाला दहशत घालून दिली आहे. उत्तर कोरियाच्या प्रवक्त्याच्या मते हे क्षेपणास्त्र ६७०० कि.मी.पर्यंतचे समांतर उड्डाण करू शकते. अमेरिकेसह साऱ्या जगातील क्षेपणास्त्रांचे जाणकार उत्तर कोरियाची ही दहशत आता संशयास्पद ठरवीत नाहीत. एकेकाळी त्या देशाने केलेली अशी वक्तव्ये अनेकांनी हास्यास्पद ठरविली होती. मात्र किम उल सूंगने त्याच्या शस्त्रागारातील शस्त्रे व कमालीची अजस्र दिसावी अशी क्षेपणास्त्रे त्याच्या शासकीय संचलनात जगाला दाखवून आपली शस्त्रक्षमता आता साऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. आताचे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या अलास्का या राज्यावर सरळ हल्ला करू शकेल असे आहे. किमच्या मते त्याची क्षेपणास्त्रे जगाच्या कोणत्याही देशातील कोणत्याही शहरावर हल्ला करू शकतील एवढ्या क्षमतेची आहेत. १० हजार कि.मी.पर्यंत तर काही १४ हजार कि.मी.पर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे आपल्याजवळ तयार असून आपण अजून ती जगाला दाखविली नाहीत असेही याचवेळी या सूंगने साऱ्यांना सांगितले आहे. उत्तर कोरियाची जगावर मारा करण्याची ही क्षमता खरी असेल तर त्या देशापासून जगातले कोणतेही स्थळ आता सुरक्षित राहिले नाही हे स्पष्ट आहे. जाणकारांच्या मते उत्तर कोरियाचे आताचे क्षेपणास्त्र त्याने दोन टप्प्यात उडविले असावे. या क्षेपणास्त्राच्या शिरावर त्याने अण्वस्त्रे लावली नव्हती. मात्र अशी अण्वस्त्रे लावलेले क्षेपणास्त्रे डागण्याची त्या देशाची तयारी कधीचीच झाली असावी असेही या जाणकारांचे म्हणणे आहे. किम उल सूंग याला जगात चीनखेरीज एकही मित्र वा मित्रदेश नाही. त्याच्या हुकूमशाहीला आवर घालू शकेल एवढी क्षमता उत्तर कोरियाच्या जनतेतही नाही. साऱ्या जनतेला अर्धपोटी व अर्धवस्त्रात ठेवून देशाची सारी संपत्ती अण्वस्त्रांच्या व शस्त्रशक्तीच्या उभारणीवर लावू शकणारा तो हुकूमशहा आहे. शिवाय आपल्या जनतेत त्याची दहशत एवढी मोठी की भीतीपोटी का होईना ती जनता त्याला परमेश्वर म्हणूनच भजणारी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या क्षेपणास्त्राबाबतची प्रतिक्रिया उथळ म्हणावी एवढी गंमतीशीर आहे. ‘या इसमाला याखेरीज दुसरा उद्योग नाही काय’ असे ते म्हणाले आहेत. मात्र त्यांच्या देशासह जगाने उत्तर कोरियाची दहशत एवढी हंसण्यावर नेली नाही. उत्तर कोरियाला रशियाचा धाक नाही, अमेरिकेवर तर त्याचा दातच आहे आणि चीन हा त्याचा मित्रदेश असला तरी तो उत्तर कोरियाचा वापर अमेरिकेला आवर घालण्यासाठी करीत असल्याची त्याची व जगाचीही आता खात्री पटली आहे. आपल्या हाती अमेरिकेला धाकात ठेवू शकणारे किम उल सूंगसारखे शस्त्र गमवायला चीनही सहजासहजी तयार होणार नाही. सबब हा सूंग हे जगातले एक मोठे दहशतखोर सत्य आहे. त्याच्यावर जगातील बहुतेक सर्व प्रमुख देशांनी निर्बंध लादले आहेत. कोणताही मोठा देश त्याच्याशी आता व्यापार संबंध राखत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच दिलेल्या अमेरिकाभेटीत भारतही यापुढे उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादेल असे आश्वासन ट्रम्प यांना दिले आहे. भारत हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे ही बाब यासंदर्भात महत्त्वाची ठरावी अशी आहे. मात्र जो हुकूमशहा अमेरिका, रशिया, संयुक्त राष्ट्रसंघटना व जगातील कोणत्याही शक्तिशाली देशाचे दडपण स्वत:वर ठेवत नाही तो भारताच्या नियंत्रणालाही फारसे महत्त्व देणार नाही हे उघड आहे. प्रश्न, उत्तर २कोरियाच्या या दांडगाईला कोण आणि कसे उत्तर देईल हा आहे. आम्ही मनात आणू तर तो देश जगाच्या पाठीवरून एका क्षणात नाहिसा करू असे एकेकाळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन म्हणाल्या होत्या. मात्र अणुयुद्धाचे यश त्यात प्रथम शस्त्र कोण डागतो यावर अधिक अवलंबून असते. प्रत्यक्षात किम उल सूंग म्हणतो तेवढी साऱ्या अमेरिकेला बेचिराख करणारी अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे त्याच्या शस्त्रागारात नसतीलही. मात्र जाणकारांचे असे वाटणे हेही त्यांच्या अंदाजावरच उभे आहे. जगात अण्वस्त्रधारी म्हणून ओळखली जाणारी सहा राष्ट्रे आहेत. त्यात उत्तर कोरियाचा समावेश नाही. अभ्यासकांच्या मते इस्रायल, इराण, सौदी अरेबिया आणि ब्राझील याही देशांजवळ आता अण्वस्त्रे आहेत. मात्र त्यांची माहिती वा दखल जगाने अजून घेतली नाही. कोणताही देश त्याची खरी शस्त्रशक्ती जाहीररीत्या जगाला सांगत नाही. लष्करी संचलनात त्याची थोडीशी चुणूकच तेवढी देशाला व जगाला दाखविली जाते. सूंगने आतापर्यंत ज्या धमक्या जगाला दिल्या त्या त्याने अल्पावधीत खऱ्याही केल्या आहेत. त्यामुळे त्याचे दावे फार हसण्यावारी न्यावे असे नाहीत. कोणाचेही न ऐकणारा हा अण्वस्त्रधारी माणूस कसा आवरायचा हे जगासमोरचे आव्हान आहे. अशी आव्हाने खरी ठरली तर जगाचा विनाश होतो अन्यथा ती आव्हानेच विनाश पावतात. सूंग हे जगाला भेडसावणारे आणि स्वत:ही भीतीच्या छायेत असलेले प्रकरण आहे.