आव्हान : दहशतवादाचे व असहिष्णुतेचेही

By admin | Published: January 11, 2016 02:57 AM2016-01-11T02:57:07+5:302016-01-11T02:57:07+5:30

इसिस किंवा आयसीस (इस्लामिक स्टेट आॅफ सिरीया अ‍ॅण्ड इराक) या सर्वाधिक क्रूर दहशतवादी संघटनेस काही माध्यमे ‘आयएस’ म्हणजे इस्लामिक स्टेट असेही

Challenge: Terrorism and Intolerance | आव्हान : दहशतवादाचे व असहिष्णुतेचेही

आव्हान : दहशतवादाचे व असहिष्णुतेचेही

Next

इसिस किंवा आयसीस (इस्लामिक स्टेट आॅफ सिरीया अ‍ॅण्ड इराक) या सर्वाधिक क्रूर दहशतवादी संघटनेस काही माध्यमे ‘आयएस’ म्हणजे इस्लामिक स्टेट असेही संबोधतात कारण ही संघटना आता सारे जगच पादाक्रांत करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. तिचे म्होरके अधूनमधून साऱ्या जगाला उद्देशून ज्या धमक्या देत असतात, त्या लक्षात घेता आता त्यांचे लक्ष्य केवळ इराक, सिरीया आणि त्या परिसरापुरते मर्यादित राहिलेले नाही. परिणामी संपूर्ण जगासमोरच नव्या वर्षातील हे एक फार मोठे आव्हान ठरणार आहे. आजवर अल कायदा ही दहशतवादी संघटनाच केवळ सर्वाधिक क्रूर मानली जात होती. पण इसिसची कृत्ये तिच्यावरही मात करणारी ठरत आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास इसिसच्या रडारवर भारत तर आहेच पण भारतातील काही मुस्लीम तरुणांना त्या संघटनेचे आकर्षण वाटू लागल्याची व काही तरुण तर इराकला रवानाही झाल्याची वृत्ते प्रकाशित होऊ लागली आहेत. सामाजिक माध्यमांपायी हे तरुण तिकडे आकर्षित होऊ लागल्याचे काहींचे अनुमान आहे, तर काहींच्या मते धार्मिक आकर्षण हा घटक प्रभावी ठरतो आहे. त्याशिवाय भारतातील बेरोजगारी आणि मुस्लीम समाजमनात आजही साचून राहिलेली परकेपणाची भावना याला कारणीभूत आहे. काही विचारवंतांनी परकेपणाच्या भावनेमागे किंवा ती दृढ होण्यामागे बाबरी मशिदीचे पतन हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटनेच्या घोषणापत्रातील ‘सेक्युलर’ या शब्दाच्या योजनेवरून जो वाद अधूनमधून उफाळून येत असतो, त्याची चर्चा होणे क्रमप्राप्त ठरते. सेक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभावी, निधर्मी की धर्मनिरपेक्ष? ढोबळमानाने धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर असे मानले आणि सांगितले जाते आणि खुद्द सरकारची भूमिका मात्र निधर्मी असेल असे भासवले जाते. भासवले जाते याचसाठी म्हणायचे कारण तसे प्रत्यक्षात कधीही प्रतीत होत नाही. जर संपूर्ण समाजासाठी सर्वधर्मसमभाव हेच तत्त्व योग्य आणि आचरणीय व आदरणीय असल्याचे राज्यघटनेला अभिप्रेत असेल व परधर्माचा साऱ्यांनी आदर करावा असेही अपेक्षित असेल तर तसे तरी होताना दिसते का? परधर्माचा आदर म्हणजे केवळ त्या धर्मातील आदरणीय ग्रंथांचा आणि विभूतींचा आदर इतका त्याचा मर्यादित अर्थ नाही. त्या धर्मातील चालीरिती, श्रद्धा आणि अगदी अंधश्रद्धा यांचाही आदर त्यात अभिप्रेत असला पाहिजे. अन्यथा धार्मिक सद्भाव निर्माण होऊच शकत नाही. साहजिकच जेव्हा असा आदरभाव दाखविला जात नाही वा तो न दाखविण्याची वृत्ती बळावते तेव्हा त्यातून समान नागरी कायद्यासारखे विवादास्पद मुद्दे समोर येतात. जगाच्या पाठीवरील प्रत्येक धर्माच्या काही परंपरा असतात, घट्ट श्रद्धा असतात आणि तितक्याच घट्ट अंधश्रद्धाही असतात. परंतु जेव्हा कोणी तिसराच वा त्यांच्यातलाच अशा श्रद्धा किंवा अंधश्रद्धांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून संघर्ष निर्माण होणे अटळ असते. स्वाभाविकच परधर्माविषयी आदर बाळगला किंवा त्याच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करण्याचे टाळले गेले तर संघर्षाचा प्रश्न निर्माण होतच नाही; शिवाय एकटे पडण्याची किंवा पाडले जाण्याची भावनाही उत्पन्न होत नाही. जे श्रद्धांचे तेच चालीरितींचे. प्रचलित उदाहरण घेऊन सांगायचे झाल्यास मदर तेरेसा यांचे उदाहरण घेता येईल. ख्रिश्चनांच्या रोमन कॅथलिक पंथाच्या एका परंपरेनुसार त्या पंथाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला संतपद बहाल करण्याची प्राचीन परंपरा आहे. अर्थात त्यात एक पूर्वशर्त आहे. संबंधित व्यक्तीने तिच्या आयुष्यात किमान दोन चमत्कार केलेले असणे अनिवार्य समजले जाते. मदर तेरेसा यांनीदेखील असाध्य व्याधींनी ग्रस्त असलेल्या दोन व्यक्तींना बरे करून आपल्या आयुष्यात दोन चमत्कार घडविले आणि म्हणूनच म्हणे ‘व्हॅटिकन’ने त्यांना संतपद बहाल करण्याचा निर्णय जाहीर केला. हा विषय आणि त्याचा निर्णय सर्वस्वी रोमन कॅथलिक पंथापुरता मर्यादित. मरणोत्तर संतपद बहाल करण्याची या पंथाची परंपराही तशी प्राचीनच. विज्ञानाच्या अत्यंत कठोर कसोटीवर घासून पाहायचे ठरले तर जे विज्ञानसंमत तो चमत्कार नसतो व कोणताही तथाकथित चमत्कार विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही. लौकिक शिक्षणाच्या बाबतीत कितीतरी पटींनी अग्रेसर असलेल्या रोमन कॅथलिक पंथीयांना हे ज्ञात नाही असे नाही. पण ज्ञात असूनही ते अशा चमत्काराला जेव्हा मान्यता देतात तेव्हा अन्य धर्मीयांनी त्याची चिकित्सा करावी का, हा खरा यातील महत्त्वाचा प्रश्न. जोवर आम्ही आमच्या श्रद्धा तुमच्यावर थोपविण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न करीत नाही तोवर तुम्ही त्यांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करू नये, हा यातला साधा व्यवहार. बुद्धिप्रामाण्यवाद केव्हाही सरसच असला तरी तो प्रत्येकाला झेपेलच आणि झेपतोच असे नाही. यावर मग सतीची प्रथा चालू ठेवायची का असा एक वेडगळ प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मुद्दा इतकाच की संबंधित समाजाच्या अंतर्गत व्यवहारात इतरांनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला की संघर्ष सुरू होतो. आणि तसेही सहिष्णुता म्हणजे तरी वेगळे काय असते? परिणामी जितके दहशतवादाने तितकेच असहिष्णुतेनेही मोठे आव्हान आज उभे केले आहे.

Web Title: Challenge: Terrorism and Intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.