आव्हानात घेरलेले राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:07 AM2019-05-25T05:07:34+5:302019-05-25T05:07:39+5:30

नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांना मिळालेले मोठे यश पाहता, काँग्रेस या देशातील दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष व सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून राहुल गांधी यांची जबाबदारी वाढली आहे.

Challenged Rahul Gandhi | आव्हानात घेरलेले राहुल गांधी

आव्हानात घेरलेले राहुल गांधी

Next

नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांना मिळालेले मोठे यश पाहता, काँग्रेस या देशातील दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष व सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून राहुल गांधी यांची जबाबदारी वाढली आहे. आपला पक्ष संघटित ठेवण्यासोबतच, देशातील अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेणे आणि त्यांच्यात किमान राष्ट्रीय प्रश्नांबाबत एकमत घडवून आणणे हे आता त्यांचे काम आहे.

हे काम मुलायमसिंग यादव किंवा मायावती, ममता बॅनर्जी किंवा अखिलेश, तसेच चंद्राबाबू नायडू वा शरद पवार करू शकणार नाहीत. त्यांच्यात ती क्षमताही शिल्लक राहिली नाही. प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यासारखे तरुणच यापुढे राहुल गांधींचे खरे व महत्त्वाचे सहकारी ठरू शकतील. कमलनाथ आहेत, गहलोत आहेत, कॅ. अमरिंदरसिंगही आहेत. त्यांच्यासोबत लोक आहेत आणि त्यांनी आपला पक्ष आपल्या राज्यात मजबूत ठेवला आहे. विशेषत: अमरिंदरसिंग यांनी ज्या सामर्थ्याने पंजाबात मोदींच्या पक्षाला रोखले, तो प्रकार महत्त्वाचा व गांभीर्याने घ्यावा असा आहे. फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल काँग्रेस पक्ष पुन्हा एकवार काश्मिरात विजयी झाला आहे आणि तो काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. द्रमुकची काँग्रेसला साथ आहे, ही साथ सांभाळून व नवे सहकारी आणि संघटना जोडून घेऊन राहुल गांधींना त्यांचा पक्ष यापुढच्या काळात जपायचा आणि वाढवायचा आहे. त्याच वेळी जुने व वठलेले पुढारी बाजूला सारण्याचे कठोर कामही त्यांना करायचे आहे.

जुन्यांची प्रतिष्ठा व मान कायम राखून त्यांना हे करणे भाग आहे. राहुल गांधी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत आणि ज्येष्ठांना त्यांचे कौतुक आहे. त्यामुळे त्यांनी वा त्यांच्या पक्षाने परवाच्या पराभवामुळे खचण्याचे कारण नाही. इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात दर पाच ते आठ वर्षांनी सत्ताबदल होतो, पण तेथील पक्ष तुटत नाहीत. माणसे दूर जात नाहीत. विचार, कार्यक्रम व नेतृत्वावरील विश्वास हेच पक्षाचे बळ असते. ते संघटित करणे ही आता काँग्रेसची गरज आहे. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारा विखे पाटलांसारखा पुढारी पक्ष सोडतो आणि भाजपचा प्रचार करतो, तेव्हा ती बेशरमपणाची कमाल असते. अशी माणसे विजयी झाली, तरी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. विखेंसारखे अनेक जण या वेळी देशाला पाहाता आले. मात्र, जोपर्यंत सोनिया व राहुल आहेत, तोवर काँग्रेसचे अखिल भारतीय स्वरूप कायम राहणार आहे.

सोनिया किंवा राहुल या आता केवळ व्यक्ती राहिल्या नाहीत, त्या प्रतिमा बनल्या आहेत. काँग्रेस पक्ष ज्या मूल्यांसाठी निर्माण झाला, जी मूल्ये त्याने गेली शंभर वर्षे जपली आणि ज्यासाठी त्याचा लढा अजूनही चालू आहे, त्या मूल्यांची ती प्रतीके आहेत. तसे स्थान आज देशातील दुसºया कोणत्याही नेत्याला नाही. काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, हा आरोप त्याचमुळे चुकीचा व खोटाही ठरणारा आहे. एका मूल्यप्रवाहावर निष्ठा ठेवणारे नेतृत्व व त्याच मूल्यांना वाहून घेतलेली प्रामाणिक माणसे यांची ती संघटना आहे. अशी संघटना एक वा दोन पराभवांनी खचत नाही व संपतही नाही. ती पुन्हा नव्याने उभी राहते. व्यक्ती बदलतात, समाजमनही बदलते, पण मूल्ये कायम राहतात. गांधीजींचा खून करता येतो, पण त्यांच्या प्रतिमेचा विनाश करता येत नाही. काँग्रेस हा विचारप्रवाह आहे, तो थांबणारा नाही, त्याला नवे प्रवाह मिळत राहणार व तो पुढे जातच राहणार.

राहुल गांधींची प्रतिमा अल्पावधीतच राष्ट्रीय बनली. प्रियंकांनाही तो मान मिळाला. लोक व्यक्तींसोबतच राहात नाही, ते विचारांसोबतही राहतात. काँग्रेस हा असा विचार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांवर श्रद्धा ठेवणारा व देश म्हणजे सर्वसमावेशकता असे समजणारा हा विचार आहे. त्याला शेवट नाही आणि त्याला संपविताही येत नाही. इतिहासाच्या पुढे जाणारे, वर्तमानात कायम राहणारे आणि भविष्यालाही मार्गदर्शन करणारे काही विषय असतात. काँग्रेस व त्याचा मूल्यविचार हा असा विषय आहे.

Web Title: Challenged Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.