वेदनेचे फोटो काढणारा कॅमेरा करुणेकडे झुकला आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 01:25 PM2021-12-25T13:25:22+5:302021-12-25T13:28:05+5:30
जे भोगतात त्यांच्या दु:खाशी माझं नातं आहे. मी त्यांच्या बाजूने उभं राहण्याचं ठरवलं आहे. मी बाजू घेतो, ती माझ्या फोटोंमध्येही दिसते!
सुधारक ओलवे
कोविडच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुमचं काम आव्हानात्मक होतं?
सुरुवातीला कुणी बाहेरच पडत नव्हतं, कलावंत-लेखक भीतीनं दडून बसले होते, मोजकेच लोक बाहेर पडून काय चाललंय याचा अंदाज घेत होते. एक नवी अस्पृश्यता समाजजीवनात परतली होती. लोक ओळखींच्यापासून तोंड लपवायचे, लांब चालायचे, टाळायचे. मी शूट करायला जायचो तेव्हा लोकांना वाटायचं, हा कोण अपरिचित माणूस आपल्यात घुसतोय, फोटो का काढायचेत याला? हा मदत घेऊन आला असेल का? आम्ही काहींनी त्यावेळची ही अस्वस्थता टिपायला सुरुवात केली. मी मुंबई व आसपासच्या भागात नांदेड, सोलापूर, कोल्हापूर व लहान गावांमधून आलेल्या कामगारांना भेटलो. मुंबईतून आपल्या गावी चालत गेलेला कामगारवर्ग कुणाला दिसत नव्हता. तो मजलदरमजल चालतोय, रेल्वे त्याच्या अंगावरून जातेय, कामगार गावी पोहोचल्यावर त्याच्या घरावर मार्किंग होतंय, गावातल्या घरात त्याला प्रवेश नाकारला जातोय, त्यांच्या जेवणखाण्याचे प्रश्न आहेत, ही भयावह अवस्था आम्ही बाहेर पोहोचवत होतो. आपल्या देशातील माणसांशी आपण असा व्यवहार करतो का? दोन-तीन आठवड्यांनी जागं होऊन रस्त्यांवर माणसांनी लंगर लावले, पण देशात हे व्हायला नको होतं. ‘आपत्ती कुणावरही येऊ शकते’ हा धडा माणसं अजूनही शिकलेली नाहीत.
तुम्हाला भीती नाही वाटली?
भीती होतीच, पण या अस्वस्थ काळाची नोंद घेणं ही जबाबदारीही होती. परिघावरच्या समूहाकडे अन्नपाणी नाही, काम नाही, त्यांचं काय? मूलभूत गरजा पूर्ण करण्यापायी भविष्याची तरतूद संपते तेव्हा माणूस कुठल्या प्रेरणेवर जगेल याबद्दल काही शोध घेणं या प्राधान्यक्रमात भीती टिकणार नव्हती. ती ओलांडून गेलो म्हणूनच कळलं की दोन वर्षांनी जग पुन्हा चालू झालं आहे. कामगार आणि प्रस्थापितांमधली दरी आणखी रुंद झाली आहे. गावाकडं परतलेल्या सगळ्यांना पुन्हा शहराला शरण येणं भाग आहे. शहरात किमान हाताला कुठलं ना कुठलं काम, रात्र काढायला गटाराचा शेजार आणि सार्वजनिक स्वच्छतागृह असेल, याचा दिलासा आहे. कोविडच्या पहिल्या टप्प्यात रस्ताभर लावून ठेवलेल्या उबर टॅक्सीज नि धारावीतले बंद दरवाजे यांचे फोटो काढताना कळवळत होतो. हे बघताना निराशा येतेच. काही पत्रकार व मी; ही कामं करून परतायचो तेव्हा दोन-तीन आठवडे एकमेकांशी काय, घरातही आम्ही गप्प बसत असू. माणसांच्या गोष्टी खांद्यावर वाहून आणण्याचा हा परिणाम व प्रतिसाद होता.
हे काम करूच नये, असं कधी वाटतं का?
मानसिक तणावातून कधीतरी ते वाटतं, पण माझ्या फोटोंनी लोक विचार करू लागतात, देशातलं वास्तव बघतात हे महत्त्वाचं वाटतं. कुणाच्या तरी तोंडचं पाणी ओढून आपण वापरतो हे त्यांना कळतं. वास्तव समोर आणण्यानं धोरणकर्त्यांच्या पातळीवर काही बदल होतात, असा माझा विश्वास व अनुभव आहे. बदल ही नंतरची गोष्ट, त्याहून महत्त्वाचं प्रश्न दिसणं, दाखवून देणं!
फोटोजर्नालिस्टनी संवेदना बाळगाव्यात की काय करावं?
हार्ड फोटो जर्नालिझम आणि सेन्सिटिव्ह फोटो जर्नालिझम यामधली धूसर रेघ कळली की झालं! ज्याच्यावर संकट कोसळलंय त्याच्या पुढ्यात जाऊन ‘आपको कैसा लगता है?’ हे विचारायचं धाडस मग होणार नाही. अडीच दशकांपूर्वी पत्रकार छायाचित्रकार पीडित माणसांपासून विशिष्ट मानसिक अंतर राखायचे. त्यांच्या दु:खाची पत राखायचे. मी ती परंपरा सांभाळतो. स्पॉटवर गेलो तरी उड्या मारत फोटो काढत नाही. मलाही फोटो हवेच असतात, पण समोरच्याचा खाजगीपणा, आदर आणि संवेदनशील वागणारा कॅमेरा यातून तुमचं म्हणणं प्रभावी होतं. जे भोगतात त्यांच्या दु:खाशी माझं नातं आहे. मी त्यांच्या बाजूने उभं राहण्याचं ठरवलं आहे. नवखा होतो तेव्हा ऊर्मी वेगळी होती. बॉम्बस्फोटाचे फोटो केवढे चांगले काढलेत म्हणून स्वत:वर खुश व्हायचो. आता ती ऊर्जा करुणेकडे झुकली आहे. माणसांच्या आयुष्यांचे, वेदनेचे फोटो काढता काढता त्यांच्यासाठी उभं राहण्याची ताकद देते आहे.
मुलाखत : सोनाली नवांगुळ