गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल!

By रवी ताले | Published: December 19, 2017 12:44 AM2017-12-19T00:44:49+5:302017-12-19T00:45:20+5:30

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेले आव्हान आणि दुस-याच दिवशी शेजारच्या गुजरातने दिलेला कौल यांचा निश्चितपणे संबंध आहे.

 Challenges of Gadkari and Gujarat's Kaul! | गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल!

गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल!

Next

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेले आव्हान आणि दुस-याच दिवशी शेजारच्या गुजरातने दिलेला कौल यांचा निश्चितपणे संबंध आहे.
फडणवीस-गडकरी जोडगोळीने पश्चिम विदर्भात एकूण तीन ठिकाणी विविध विकास प्रकल्पांच्या कार्यान्वयन समारंभांमध्ये हजेरी लावली. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन प्रकल्पांचा समावेश होता. त्यापैकी अनेक प्रकल्प गत अनेक वर्षांपासून रखडले आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद, केंद्रीय जल संधारण मंत्री या नात्याने गडकरींनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमास संबोधित करताना, आणखी पैसा लागला तरी उपलब्ध करून देऊ; पण मंजूर प्रकल्पांची कामे तीन वर्षांऐवजी एका वर्षात पूर्ण करून दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. घोषणा केलेली कामे सरकारच्या उरलेल्या कालखंडात पूर्णत्वास नेण्याची निकडच गडकरींच्या आव्हानातून जाणवत होती.
गुजरातच्या जनतेने भाजपाला कौल दिला असला तरी, आम्हाला गृहित धरू नका, असा सज्जड इशाराही भाजपाच्या जागा कमी करून दिला आहे. सोबतच जातीय समीकरणांच्या आधारे भाजपाला घेरण्याचा हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकोर या त्रिकुटाचा प्रयत्नही गुजराती मतदारांनी हाणून पाडला आहे. विकास, आश्वासनांची पूर्तता आणि स्वच्छ कारभार या निकषांवरच मतदान करण्याचा देशभरातील मतदारांचा कल गत काही काळापासून दिसून येत आहे.
या पाशर््वभूमीवर, दीड-दोन वर्षात दोन निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या महाराष्ट्रातील भाजपा सरकारला, यापुढे आश्वासनपूर्तीकडे प्रामुख्याने लक्ष पुरवावे लागणार आहे. विदर्भापुरते बोलायचे २झाल्यास, केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक विकास प्रकल्पांची घोषणा झाली. प्रत्यक्षात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका खुणावू लागल्या असतानाही, अनेक प्रकल्पांच्या कामांना साधा प्रारंभही झालेला नाही, तर कामांना प्रारंभ झालेले प्रकल्प रखडले आहेत. रस्ते हा गडकरींचा खूप आवडीचा विषय; पण त्यांनी घोषणा केलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. कृषी कर्जमाफीचा फडणवीस सरकारने खूप गाजावाजा केला; पण अंमलबजावणीत घालण्यात आलेल्या घोळामुळे ‘शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड’ अशी गत झाली आहे. सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपाने खूप रान उठविले होते; पण भाजपाच्या कार्यकाळातही सिंचन प्रकल्प रखडलेलेच आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
ही परिस्थिती बदलली नाही, घोषणा प्रत्यक्षात उतरत असल्याचे जनतेला दिसले नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये फटका बसण्याचा धोका, आता फडणवीस-गडकरी जोडगोळीला जाणवू लागला आहे. त्याचेच प्रतिबिंब गिरीश महाजनांना दिलेल्या आव्हानात उमटले आहे.
-रवी टाले
ravi.tale@lokmat.com 

Web Title:  Challenges of Gadkari and Gujarat's Kaul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.