‘स्टार्ट अप्स’ समोरील आव्हाने अडचणी आणि संधी

By admin | Published: March 10, 2016 03:19 AM2016-03-10T03:19:33+5:302016-03-10T03:19:33+5:30

भारतातील स्टार्ट-अप कंपन्यांसाठी २०१५ हे वर्ष भरपूर कमाई आणि हुकलेल्या संधी, असे संमिश्र प्रकारचे गेले. या वर्षी भारतामधील ‘व्हेंचर कॅपिटल’ची उभारणी

Challenges of 'Start Ups' Challenges and Opportunities | ‘स्टार्ट अप्स’ समोरील आव्हाने अडचणी आणि संधी

‘स्टार्ट अप्स’ समोरील आव्हाने अडचणी आणि संधी

Next

केशव आर. मुरुगेश (समूह सी.ई.ओ. ग्लोबल सर्व्हिसेस) - भारतातील स्टार्ट-अप कंपन्यांसाठी २०१५ हे वर्ष भरपूर कमाई आणि हुकलेल्या संधी, असे संमिश्र प्रकारचे गेले. या वर्षी भारतामधील ‘व्हेंचर कॅपिटल’ची उभारणी २०१४ च्या तुलनेत ५० टक्क््यांनी वाढावी अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात विरोधाभासात्मक परिस्थिती पाहायला मिळाली. भरपूर निधी उभारल्याच्या आणि कंपन्या विकत घेतल्याच्या बातम्यांप्रमाणेच निधीच्या कमतरतेमुळे उद्योग बंद झाल्याच्या बातम्याही आल्या. या अयशस्वी झालेल्या उद्योगांपैकी अनेक उद्योग ई-कॉमर्स क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित सेवा घेऊन येणार होते. म्हणजे काळजी करण्याचे कारण आहे का व आपण स्टार्ट-अप कंपन्यांसाठी अजून तयार नाही का, या दोन्ही प्रश्नांना माझे उत्तर नाही असेच आहे.
स्टार्ट-अप कंपन्या अयशस्वी होण्याचे प्रमाण नेहमीच मोठे राहिले आहे. दहापैकी आठ किंवा नऊ कंपन्या अयशस्वी होतात. यश मिळविण्यासाठी कोणतेही शॉर्ट-कट नसतात. स्टार्ट अप कंपन्या अयशस्वी होण्याची अनेक कारणे संभवतात. त्यातील पहिले कारण म्हणजे त्यांच्या उत्पादनाला असलेला बाजारपेठेमधील गरजेचा अभाव. अनेक उद्योजक हे नाकारतील. पण सगळ्याच कल्पना किंवा उत्पादने स्वत:साठी स्वत:च बाजारपेठ निर्माण करू शकतातच असे नाही. कधी कधी उद्योजक त्यांना आवडलेल्या एखाद्या अभिनव कल्पनेवर निर्धाराने काम करीत राहतात आणि आशा करतात की ते त्या कल्पनेची किंवा उत्पादनाची गरज ग्राहकांना केव्हा तरी पटवून देऊ शकतील. दुर्दैवाने हे गणित जमत नाही आणि त्यांनी ओतलेला पैसा संपुष्टात येतो.
नेहमी आढळणारे दुसरे कारण म्हणजे, पुरेशा निधीचा अभाव. बाजारपेठेकडून प्रतिसादाचा अभाव किंवा टीममधील अंतर्गत नेतृत्वाविषयीचे प्रश्न यामुळे गुंतवणुकदारांनी पैसा काढून घेतला किंवा नवीन निधी उभारणे कठीण झाले असे होऊ शकते. २०१५मध्ये भारतात स्थापन झालेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ३८८ स्टार्ट-अप कंपन्यांपैकी २१ कंपन्यांना, ४३५किरकोळ विक्र ी स्टार्ट-अप कंपन्यांपैकी १५ कंपन्यांना तर १९२ अर्थ-तंत्रज्ञान क्षेत्रातील
स्टार्ट-अप कंपन्यांपैकी आठ कंपन्यांना निधी मिळाला. कधीकधी अधिक निधी मिळणे हे सुद्धा काळजीचे कारण असते. भारतामध्ये भांडवल सहज उपलब्ध असल्यामुळे असे काही उद्योग सुरू झाले, जे फक्त आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींच्या नकली आवृत्त्या होत्या किंवा ज्यांनी अंमलबजावणीचा अपुरा विचार केलेल्या धोरणाचा अवलंब केला होता.
तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अप कंपन्यांच्या अयशस्वीतेबाबतचे नेहमीचे कारण म्हणजे, एखादे उत्पादन व्यवस्थित चाचण्या न घेताच बाजारात आणणे. अनेक उद्योजक हे नाकारतील आणि अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फोर्ड मोटर्सचे संस्थापक हेन्री फोर्ड यांनी काय म्हटले होते याची आठवण करून देतील. स्टीव्ह जॉब्स म्हणाले होते, ‘अनेक वेळा लोकाना काय हवे असते हे त्यांना तोपर्यंत माहीत नसते, जोपर्यंत तुम्ही त्यांना ते दाखवत नाही.’ १९००च्या सुरु वातीला सामान्य अमेरिकन माणसासाठी वाहन निर्माण करताना फोर्ड म्हणाले होते, ‘मी जर लोकाना विचारले असते की तुम्हाला काय पाहिजे, तर त्यांनी ‘अधिक वेगवान घोडे’ असे उत्तर दिले असते.’
टीम कशी योग्य नव्हती, महत्वाच्या प्रश्नांवर प्रवर्तकांचे कसे एकमत नव्हते किंवा विशिष्ट उत्पादनाच्या बाबतीत किंवा बाजारपेठेमधील अस्तित्वाबाबतीत स्पर्धक कसे कितीतरी पुढे होते, अशाही गोष्टी ऐकू येतात.
आणखी एक कारण आहे, ज्याकडे पुरेसे लक्ष जात नाही ते म्हणजे अपेक्षांचे व्यवस्थापन. अनेकदा संस्थापकांच्या आणि गुंतवणुकदारांच्या अपेक्षा अवास्तव असतात. ५-८ वर्षांमध्ये बाहेर पडणे ही अशीच एक अपेक्षा असते. भारतामधील गुंतवणुकदारांनी हे समजून घेतले पाहिजे, की येथील परिस्थिती पाश्चात्य देशांपेक्षा फार वेगळी आहे. वास्तविक, एखाद्या कंपनीचे उद्योगाचे प्रमाण पुरेसे मोठे होण्यासाठी ८-१० वर्षे लागतात आणि आयपीओ च्या स्थितीपर्यंत येण्यासाठी १०-१५ वर्षे लागतात.
भारताच्या संदर्भात, जेथे अपयश आलेल्यांचा समाजामध्ये तिरस्कार केला जातो, तेथे एखाद्या अपयश आलेल्या उद्योगाला ‘भविष्यामधील यशाची पहिली पायरी’ म्हणून स्वीकारणे सोपे नाही. अपयशामुळे झालेल्या मानसिक नुकसानाचे टीमवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. मात्र आता संस्थापकांनी स्वत: पुढे येऊन आपल्या चुका कबूल करण्याची व त्यांची जबाबदारी स्वीकारण्याची काही उदाहरणे घडली आहेत. भारतीय उद्योजकांनी अपयशाचा गाजावाजा नव्हे, तर अपयशाचे त्रयस्थ भूमिकेमधून विश्लेषण करण्याची गरज आहे.
भारतातील स्टार्ट-अप क्षेत्रामधील वातावरणाला जाग येत आहे आणि नवीन कल्पना अजमावण्यासाठी, निधीसाठी चाचपणी करण्यासाठी आणि एखादे उत्पादन सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पण यशासाठी कोणतेही शॉर्ट-कट असू शकत नाहीत: त्याच्यासाठी काटेकोर योजना, तांत्रिक निपुणता आणि बाजारपेठेचे ज्ञान यांच्यातील समतोल असलेली उत्तम टीम, इतरांपासून खरोखर वेगळेपणाची हमी देणारे उत्पादन आणि निर्वेध प्रवासासाठी सुयोग्य सहयोगी, यांची गरज असते.
अनेक लोक ज्याकडे दुर्लक्ष करतात अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे गुरुची, मार्गदर्शकाची भूमिका. स्टीव्ह जॉब्स यांनी फेसबुकमध्ये मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरुवातीच्या काळात निभावलेली भूमिका आपणा सर्वांना माहीत आहे. मायक्रोेसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी अनेकदा गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा उल्लेख त्यांचे मार्गदर्शक म्हणून केला आहे. गुरु किंवा मार्गदर्शक हा उद्योजकाला गोष्टींकडे तटस्थपणे, नित्याच्या कामांच्या तणावापासून दूर राहून बघायला मदत करतो.
उद्योजकतेकडे - ‘आंत्रप्रेन्युअरशिप’कडे जाण्याचा एक सुरक्षित मार्ग म्हणजे ‘इंट्राप्रेन्युअरशिप’ आहे, ज्यामध्ये, एखादी व्यक्ती ज्या कंपनीमध्ये काम करते, ती कंपनी एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेला साहाय्य करते आणि अंतिम उत्पादनाच्या टप्प्यापर्यंतच्या त्या उद्योजकाच्या प्रवासाला निधी पुरवते.
नॅस्कॉम-झिनोव्ह यांच्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत भारतामध्ये ११,५०० तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अप कंपन्या असतील. आज तंत्रज्ञान क्षेत्रातील ४,२०० हून अधिक स्टार्ट-अप कंपन्या आहेत. भारतीय स्टार्ट-अप क्षेत्रासाठी भविष्यकाळ उज्ज्वल दिसत आहे. एखाद्या देशाच्या स्टार्ट-अप क्षेत्रातील प्रवासामध्ये अपयशी कंपन्या हे अत्यंत महत्वाचे मैलाचे दगड असतात; आपण अपयशी कंपन्यांबाबत जितकी जाहीरपणे चर्चा करू आणि पुन्हा पहिल्यापासून सर्व काही परत सुरू करण्याची क्षमता दाखवू, तितकी आपली जगाचे स्टार्ट-अप क्षेत्रातील अंतिम स्थान बनण्याची शक्यता आणखी वाढेल.

Web Title: Challenges of 'Start Ups' Challenges and Opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.