पर्यावरण संस्कृती जाणीवपूर्वक विकसित करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:28 AM2017-11-23T00:28:34+5:302017-11-23T00:28:56+5:30

विकास विळख्यातून सुटका करून घेण्याचा १९७२ साली क्लब आॅफ रोमच्या ‘लिमिटस् टू ग्रोथ’ (वाढवृद्धीच्या मर्यादा) अहवालाने जगाला परखड इशारा दिला

Challenging the development of environmentally conscious environment | पर्यावरण संस्कृती जाणीवपूर्वक विकसित करण्याचे आव्हान

पर्यावरण संस्कृती जाणीवपूर्वक विकसित करण्याचे आव्हान

Next

- प्रा. एच.एम. देसरडा

विकास विळख्यातून सुटका करून घेण्याचा १९७२ साली क्लब आॅफ रोमच्या ‘लिमिटस् टू ग्रोथ’ (वाढवृद्धीच्या मर्यादा) अहवालाने जगाला परखड इशारा दिला, की जीवाश्म इंधन (फॉसिल फ्युएल) तसेच अन्य खनिजे लोह, तांबे व अन्य धातू यांचा ज्ञात साठा फार काळ पुरणारा नाही. गत शंभर-सव्वाशे वर्षांत जगात ज्या प्रमाणात व वेगाने ही नूतनीकरण न होऊ शकणारी साधने वापरली जात आहेत, त्यामुळे ही संसाधने तर संपुष्टात येतीलच. मात्र, तेवढाच गंभीर प्रश्न म्हणजे या संसाधनांचा वापर व त्यावर आधारित उत्पादने नि प्रक्रियेमुळे जे निर्माल्य (वेस्ट) बाहेर पडले व वेगाने पडत आहे त्याला सामावण्यासाठी अवकाशात जागा नाही. कर्ब व अन्य विषारी वायूंच्या उत्सर्जनामुळे वातावरणात प्रचंड भार झाला आहे.
तात्पर्य, संसाधनांचे साठे, वापराखाली उपलब्धता याला तर मर्यादा आहेच आहेत. मात्र, तेवढीच चिंतेची बाब म्हणजे आता निर्माल्य टाकायला अवकाश उरले नाही. परिणामी, पृथ्वीचे तापमान, वातावरणातील कर्बवायू प्रमाण प्रत्येक दहा लाख घटकांमध्ये (पार्ट पर मिलियन) ४०० च्या पुढे गेले आहे. खचित ती धोक्याची पातळी असताना तात्काळ त्याला आवर घालण्याची नितांत गरज आहे.
भल्या माणसा ऐकशील का?
१९८० च्या दशकातील संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण व विकास अहवालाने जगाला नि:संदिग्ध शब्दांत बजावले आहे की, वाढवृद्धीला ‘आता आणि येथे’ (हीअर अँड नाऊ) थांबवले पाहिजे. हा अहवाल ज्या ब्रुस्टलँड आयोगाने तयार केला त्यांनी शाश्वत विकासाची केलेली व्याख्या फार लक्षवेधी आहे. त्यानुसार ‘सध्याच्या पिढीने आपल्या गरजा भागवताना येणाºया पिढ्यांची त्यांच्या गरजा भागविण्याची क्षमता क्षीण न करता स्वत:ची गरज पूर्ण केली पाहिजे.’ त्यावेळी वाढ, विस्ताराबाबत जे अनुमान केले होते त्यांच्या कैकपटीने संसाधने वापरली, संपुष्टात आणली जात आहेत. निश्चितच ही मोठी जोखीम, भयानक धोका आहे. १९७२ पासून होत असलेल्या पर्यावरण परिषदा, विशेषत: वसुंधरा शिखर संमेलन (रिओ १९९२) जेथे १५० हून अधिक राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती व पंतप्रधान) हजर होते. त्यांनी पृथ्वीची सनद; अर्थात अर्थ चार्टर संमत केले. वसुंधरेला वाचविण्याच्या आणा-भाका घेतल्यात!
गत चार दशकांत या विषयावर प्रचंड विचारमंथन, शास्त्रज्ञांचा अभ्यास, राज्यकर्ते व समाजधुरीणांच्या आर्त हाका अवघ्या जगाने ऐकल्या. मात्र, त्यावर अंमलबजावणी अपवादानेच होते. हीच खरी शोकांतिका आहे. २०१५ च्या पॅरिस परिषदेतील प्रस्ताव, ठराव घोषणा, कागदावरच आहेत. नव्हे अमेरिकेचे अध्यक्ष तर त्याला चक्क नाकारत आहेत.
विकासाचा कैफ घातक
आज एक महासंकट ‘आ’वासून उभे आहे. खेदाची बाब म्हणजे मोजके अपवाद वगळता जगातील सत्ताधीश नि धनदांडग्यांना याची जाण व भान नाही. उलटपक्षी त्यांचा असा युक्तिवाद आहे की, विकासाचे दुश्मन असलेल्या पर्यावरणवाद्यांचा हा कांगावा आहे. अर्थात, वाढवृद्धी आणि वस्तू सेवांची रेलचेल म्हणजेच विकास (?) मानणाºयांच्या हे गळी उतरण्याची सुतराम शक्यता नाही. ‘हम नहीं तो दुनिया नहीं’ हा ज्यांचा ठाम (!) समज आहे. त्यांना कसे कळणार, वळणार?
जगभराच्या चार हजारांहून शास्त्रज्ञांचा सहभाग असलेल्या (ज्यात कित्येक नोबेल पुरस्कार विजेते आहेत.) सविस्तर गंभीर अभ्यास व निरीक्षण करून तापमान वाढीच्या धोक्याची जगाला जाणीव करून दिली आहे. नुकतेच स्टीफन हॉकीन यांनी नव्याने याकडे लक्ष वेधले आहे. थोडक्यात, विकासाचा कैफ चढवून राज्यकर्ते-धनदांडगे-चैन चंगळवादी वर्ग पर्यावरणाची ऐशीतैशी करण्यात धन्यता मानतात!
या प्रस्थापित विकास तर्काला नीट समजून घेण्याची नितांत गरज आहे. प्रश्न नेमका काय आहे व तो कसा सोडवता येईल हे आपण कुणाच्या दृष्टीने त्याकडे बघतो यावर अवलंबून आहे. वसुंधरेची सुरक्षा व सगळ्या मानवांचे भरणपोषण, योगक्षेम यादृष्टीने त्याकडे बघितल्यास सध्याची वाढवृद्धी अपरिहार्य नक्कीच नाही. खरंतर त्याला स्वस्त, जलद, स्थानिक व सुरक्षित पर्याय आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा. व्यक्तिगत मोटार वाहनाऐवजी सार्वजनिक बस, रेल्वे व जलवाहतूक साधने आहेत; पण त्यात गुंतवणूक तसेच सुधारणा करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. हे अनवधानाने नव्हे तर बुद्ध्या टाळले जाते.
वसुंधरेच्या रक्षणार्थ
प्रचलित विकास विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक पारिस्थितीकी (इकॉलॉजिकल) दिशादृष्टी अखत्यार करणे अत्यावश्यक आहे. सोबतच विकासाची प्रस्थापित संरचना नाकारून पर्यायी संकल्पना समाजात सर्वदूर प्रसृत करावी लागेल. त्या दिशेने जाणीव-जागृती केल्याखेरीज परिवर्तन शक्य नाही. सारांश, जगासमोरील मुख्य आव्हान पारिस्थितीकी संस्कृती (इकॉलॉजिकल सिव्हिलायझेशन) जाणीवपूर्वक विकसित करण्याचे आहे. समस्त मानव समाजाच्या अस्तित्वाच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाबाबत उदासीन अथवा तटस्थ राहणे आत्मघातकी आहे. ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञानाच्या एवढ्या महाविस्तारानंतरदेखील आपण याविषयी बेफिकीर का आहोत? निसर्ग, मानव व समाजाचे परस्परावलंबनाचे मर्म जाणणे नि चैन-चंगळीचा अतिरेक थांबवून ‘खरा तो एकची धर्म, वसुंधरेला जपावे, जोपासावे!’
(नामवंत अर्थतज्ज्ञ, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ)

Web Title: Challenging the development of environmentally conscious environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.