चंद्रकांतदादांचे माहेरपण

By admin | Published: January 14, 2017 01:04 AM2017-01-14T01:04:53+5:302017-01-14T01:04:53+5:30

सार्वजनिक जीवनाची सुरुवात ज्या जिल्ह्यापासून केली तेथेच पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेले महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री

Chandrakant Dad's motherhood | चंद्रकांतदादांचे माहेरपण

चंद्रकांतदादांचे माहेरपण

Next

सार्वजनिक जीवनाची सुरुवात ज्या जिल्ह्यापासून केली तेथेच पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेले महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावच्या पहिल्या दौऱ्याचे वर्णन माहेरपण या शब्दात केले. स्वाभाविकपणे पहिल्या दौऱ्यावर पूर्वाश्रमीच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा प्रभाव होता. ३५ वर्षांपूर्वी विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाच्या स्मृती जागवत असतानाच वास्तवातील सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत मतभेदांचे दर्शन त्यांना या दौऱ्यात झाले.
एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगावचे पालकमंत्रिपद रिक्त झाले. गिरीश महाजन हे जिल्ह्यातील दुसरे मंत्री. परंतु त्यांच्याकडे नाशिक आणि नंदुरबारच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने शेजारील बुलढाणा जिल्ह्याचे पांडुरंग फुंडकर यांच्याकडे पालकत्व सोपविण्यात आले. फुंडकर हे नव्याने मंत्री झाले असल्याने त्यांचा जळगावपेक्षा बुलढाण्याकडे अधिक कल होता. शिवाय खडसे-महाजन वादात पडण्याचे त्यांनी सोयीस्करपणे टाळले. सहा महिन्यात त्यांनी केवळ एकदा जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक घेतली. नंदुरबारची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपविल्यानंतर महाजन यांच्याकडे जळगावची जबाबदारी सोपवली जाईल, असा कयास व्यक्त होत होता. परंतु महाजन यांच्या नावाला खडसे व त्यांच्या समर्थकांचा तीव्र विरोध होईल, अशी शक्यता पक्षश्रेष्ठींना वाटल्याने अखेर दोन्ही गटांमध्ये समन्वय राखण्याचे कौशल्य असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले.
पाटील यांना पहिल्याच दौऱ्यात खडसे-महाजन यांच्यातील वादाची पुरेशी कल्पना आली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पाटील यांना या दौऱ्यात शासकीय बैठका घेता आल्या नाही. विधान परिषद व जि.प.-पं.स.निवडणुकांच्या तयारीसाठी बैठका घेतल्या. जळगावच्या बैठकीला खडसे-महाजन दोन्ही नेते उपस्थित होते. गैरव्यवहाराच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागल्याची नाराजी खडसे यांनी या बैठकीतही व्यक्त केली. जिल्ह्याचे निर्णय स्थानिक पातळीवर घेत होतो, पक्षाकडे जात नव्हतो, म्हणून मी घरी बसलो या शब्दात त्यांनी व्यथा मांडली. पक्षाबाहेरील मैत्री सांभाळताना पक्षाचे नुकसान होऊ देऊ नका, असा टोमणा त्यांनी महाजनांना मारला. नवीन प्रकल्प आणा, पण मंजूर प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी पाटील यांना केले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती तोडण्याचे खापर फुटल्याने जि.प.निवडणुकीत सेनेशी युती करण्याला प्राधान्य द्या, अशी गुगली खडसे यांनी टाकली. चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना ‘महाराष्ट्राचे पालक’असे संबोधून भाजपा वाढविण्यात अग्रभागी असलेल्या मोजक्या चार-पाच जणांमध्ये खडसे यांचा समावेश आहे, ते आमचे श्रध्दास्थान आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करीत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. खडसे-महाजन यांच्यात मतभेद आहेत, हे कबूल करीत असताना प्रत्येक घरात मतभेद असतात. पण मनभेद नाहीत. मतभेद दूर करायला पक्षश्रेष्ठी सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची पाळेमुळे रुजविणाऱ्या पाटील यांना जळगावात विषम स्थितीला सामोरे जावे लागणार असल्याचे पहिल्या दौऱ्यात लक्षात आले असेल. खासदार, आमदार, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था याठिकाणी भाजपाचा दबदबा असला तरी एकसंधपणा नाही. विकास कामांचा झपाटा नाही. अनेक प्रकल्प रखडले आहेत. केंद्र व राज्यात सत्ता असूनही सत्ताधारी खासदार-आमदार निवेदने, मागण्यांवर समाधान मानीत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, पाडळसरेसह रखडलेले सिंचन प्रकल्प, उड्डाणपूल व भुयारी बोगदे, जळगाव महापालिकेची शासनाकडे प्रलंबित कामे अशी मोठी यादी आहे. त्याचा प्राधान्यक्रम ठरवून ती मार्गी लावण्याची आणि दर आठवड्याला दौरा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. माहेरपणाचा अनुभव घेत असतानाच पक्षातील मतभेद आणि जनतेच्या अपेक्षांचे ओझेदेखील पाटील यांना जाणवले असणार. संघटनकौशल्य, निर्णयक्षमता या गुणांच्या बळावर ते मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Chandrakant Dad's motherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.