सैनिकी शाळेमुळे आता चंद्रपूरही संरक्षण खात्याच्या नकाशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:47 AM2019-06-01T03:47:14+5:302019-06-01T03:47:31+5:30

चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंडजवळील हिरव्यागार विस्तीर्ण अशा तब्बल १२३ एकर जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली आहे

Chandrapur is now on the map of the Defense Department due to the Army School | सैनिकी शाळेमुळे आता चंद्रपूरही संरक्षण खात्याच्या नकाशावर

सैनिकी शाळेमुळे आता चंद्रपूरही संरक्षण खात्याच्या नकाशावर

googlenewsNext

राजेंद्र निंभोरकर

आजपर्यंत राज्यात एकमेव असलेल्या सातारा सैनिकी शाळेच्या जोडीला चंद्रपुरामध्ये सैनिकी शाळा उभारली गेली आहे. या सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशसेवेसाठी सज्ज व राष्ट्रभक्तीने ओथंबलेले लष्करी अधिकारी तयार होतील, असा विश्वास आहे. या सैनिकी शाळेच्या संकल्पनेला राज्याचे वने तथा अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण सक्रिय पाठिंबा देऊन या सैनिकी शाळेची दिमाखदार इमारत उभारण्यात मोठे सहकार्य दिले आहे. लवकरच या सैनिकी शाळेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा भारतीय संरक्षण खात्याच्या नकाशावर आला आहे.

चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंडजवळील हिरव्यागार विस्तीर्ण अशा तब्बल १२३ एकर जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली आहे. चार हजारांपेक्षा अधिक कामगारांनी अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत ही सैनिकी शाळा पूर्ण केली आहे. सध्या देशात असलेल्या सर्व सैनिकी शाळांपैकी सर्वात अद्ययावत अशी ही इमारत उभारण्यात आली आहे. या सैनिकी शाळेत भारतातील अद्ययावत सैनिकी संग्रहालय आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय आहे. ताडोबामध्ये पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांसाठी या शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरेल. सैनिकी शाळेच्या भेटीसाठी विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाची संकल्पना मांडण्यात आली आहे.

पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार होणाºया निरीक्षण कक्षातून या शाळेचे कॅम्पस बघता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाºया शहीद वीरांचे स्मरण करण्यासाठी दर्शनी भागांमध्ये त्यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. सभागृहामध्ये कारगिल युद्ध, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकांचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येतील. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू दर्शनी भागात ठेवण्यात आल्या आहेत.

लष्करात महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यांचे प्रभारी असताना महाराष्ट्रात सर्व सोयींनी युक्त अशी सैनिकी शाळा उभारण्याची कल्पना माझ्या मनात आली. त्याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी स्वारस्य दाखवले व अत्यंत वेगाने कामे करून अवघ्या आठवड्याभरात या शाळेसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली. ६ वी मध्ये व ९ वी मध्ये या सैनिकी शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्गात सुमारे ७० विद्यार्थ्यांचा समावेश केला जाईल. येथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे. सध्या या शाळेची क्षमता ४५० विद्यार्थ्यांची आहे. २५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) साठी या ठिकाणी पूर्वतयारी करून घेतली जाईल. जिल्हा सैनिक शाळा व या शाळेमध्ये गुणात्मक फरक आहे. शाळेतील शिक्षण राज्यातील स्थानिक भाषा असलेल्या मराठी व इंग्रजीमध्ये होईल. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. या ठिकाणी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार राज्य सरकार २५ टक्के ते १०० टक्के शिष्यवृत्ती देणार आहे. या शाळेमध्ये लष्कर, नौदल व वायूदल या तिन्ही दलांतील विद्यमान अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ३५० कोटी खर्च आला आहे. राज्य सरकारने पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

या सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे तयार करण्यात आली आहे. येथील मैदान ऑलिम्पिक दर्जाचे असून एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँकपासून सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे असणार आहेत. सैनिकी प्रशिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या घोडेस्वारी संदर्भातही ट्रॅक तयार करण्यात आले असून सैन्यदलाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी घोडेदेखील पुरविले गेले आहेत. मुलांसाठी अद्ययावत वसतिगृह व खानपानाच्या सुविधा असतील. शाळेच्या व्यवस्थापनामधील सर्व पदांसाठी निवासी संकुलेही उभी झाली आहेत. या सैनिकी शाळेच्या बाहेरील भागात नर्सरी ते पाचवीपर्यंतची शाळा उभी करण्यात आली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी व परिसरातील गावांतील मुलांसाठीही शाळा चालू राहील. चंद्रपूरच्या वैभवात या सैनिकी शाळेची भर पडली आहे.

लेखक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आहेत

Web Title: Chandrapur is now on the map of the Defense Department due to the Army School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.