चंद्रयान-3 विशेष लेख: २० मिनिटे.... अख्ख्या देशाचा श्वास थांबणार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:55 AM2023-08-23T09:55:19+5:302023-08-23T09:55:35+5:30

आज संध्याकाळी चंद्रपृष्ठभागाला स्पर्श होणार आहे सर्व कामे बाजूला ठेवून चंद्रावतरणाचे थरारक क्षण अनुभवा! असा थरार क्वचितच वाट्याला येतो!

Chandrayaan-3 Special Article as for 20 Minutes Entire India Will hold their Breath for soft landing | चंद्रयान-3 विशेष लेख: २० मिनिटे.... अख्ख्या देशाचा श्वास थांबणार!!

चंद्रयान-3 विशेष लेख: २० मिनिटे.... अख्ख्या देशाचा श्वास थांबणार!!

googlenewsNext

डॉ. नंदकुमार कामत,  वैज्ञानिक, गोवा

विक्रम २ या यानाच्या चंद्रावतरणापूर्वीची १५ मिनिटे कशी असतील, हे सांगताना इस्रोचे संचालक सोमनाथ यांनी शब्द वापरले आहेत 'फिफ्टीन मिनिटस् ऑफ टेरर'! हृदयाची धडधड वाढवणारी, उत्कंठेने श्वास रोखून धरायला लावणारी पंधरा मिनिटे ! तब्बल दहा अब्ज डॉलर्स किमतीची महाशक्तीशाली जेम्स वेब अवकाश दुर्बीण नासाने प्रक्षेपित केली तेव्हाही तिथल्या मोहीम नियंत्रकांनी ह्या 'टेरर'चा उल्लेख केला होता! आज संध्याकाळी कोट्यवधी भारतीयांना, पुढे काय होणार. पुढे काय होणार असे म्हणत जवळपास २० मिनिटे श्वास रोखून धरायची वेळ येणार आहे. भारतीय चंद्रयानाच्या चंद्रावतरणासाठी संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटे ही ठरलेली वेळ बदलून इस्रोने ६ वाजून ४ मिनिटे ही नवी वेळ दिलेली आहे.

चंद्रावर मानवविरहित यान उतरवणे तेवढे सोपे नाही. चंद्राचा पृष्ठभाग ओबडधोबड, खडबडीत आहे. आजवर १ ते ८ किलोमीटर्स व्यासाची १ लाख ४० हजार विवरे चंद्रावर मापण्यात व मोजण्यात आली आहेत. काही विवरे १५० किलोमीटर व्यासाची आहेत. चंद्रपृष्ठभागावर लक्षावधी चांद्रपाषाण आहेत. त्यांच्या आजूबाजूला यान उतरवणे कठीण असते. यानावरची संगणक प्रणालीच कुठे उतरायचे हा निर्णय घेते. हा निर्णयसुद्धा काही मिनिटांतच घ्यावा लागतो. त्या वेळेला चंद्र ते पृथ्वीवरचे नियंत्रण केंद्र यामध्ये सतत चांगला संपर्क व परस्परसंदेशांची अचूक देवाणघेवाण व्हावी लागते. विक्रम-१ चे चंद्रावतरण का फसले याची सखोल वैज्ञानिक तपासणी इसोने केली होती. शेवटच्या मिनिटात यानाची उतरण्याची गती अपेक्षेएवढी कमी झाली नाही; कारण, इंजिनाला इंधन पुरवणारी एक झडप योग्य काम करीत नव्हती. ह्या झडपेवर नियंत्रण ठेवणाऱ्या संगणक आज्ञावलीत त्रुटी आढळून आल्या.

या निष्कर्षानंतर चंद्रयान- ३ मोहिमेत सुधारणा करण्यात आल्या. अडथळे ओळखून ते आपोआप टाळू शकणारा शक्तिशाली स्वदेशी कॅमेरा विक्रम २ वर बसविण्यात आला. विक्रम-२ कडून सध्याच्या भ्रमणकक्षेतून मिळालेल्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यावर इस्रो संध्याकाळी ५ पर्यंत काय तो निर्णय घेईल व संभाव्य ठिकाण अंदाजानेच निवडले जाईल. दक्षिण ध्रुवावर उणे २०० सेल्सिअसएवढे अतिशीत तापमान असल्याने तेथे हिमकण सापडण्याची शास्त्रज्ञांना आशा आहे. हिमकण तयार व्हायला द्रवरूपात पाणी पाहिजे. ते पृष्ठभागाच्या वरच्या थरात सूक्ष्म प्रमाणात सापडले तरी चालेल. म्हणून इस्रोची धडपड आहे की इतर सोईस्कर ठिकाणे उपलब्ध असताना थोडी जोखीम घेऊन विक्रम-२ यान दक्षिण ध्रुवानजीकच उतरवायचे. इस्रोने विक्रम-२ वर नवीन व अचूक संगणक सूचनावली वापरली आहे. म्हणजे विक्रम-१ वेगाने आदळण्यापूर्वी जे करता आले नाही ते या वेळेला विक्रम-२ चा वेग कमी करून वा कक्षा पुन्हा वाढवून इस्त्रो करू इच्छीते.

मग २० मिनिटांचा थरार कशासाठी?

ही थरारक वीस मिनिटे आज संध्याकाळी साधारण ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होतील. या वीस मिनिटांत काय होईल? पृथ्वीवरून विक्रमकडे कक्षा बदलण्याचा संदेश जाईल. खूपच उंच असलेली ही कक्षा झपाट्याने कमी होत होत विक्रम-२ हे यान अवघ्या काही किलोमीटर उंचीवर येईल. तोपर्यंत उतरणाऱ्या ठिकाणाची माहिती यानाकडे असेल. पण, सर्वांत मोठा अडथळा असेल तो आडव्या अवस्थेत असलेले विक्रम २ उभे म्हणजे पृष्ठभागावर टेकणारे चार पाय खालच्या बाजूला व इंजीन वरच्या बाजूला असा अचूक बदल साधण्यामध्ये! जर आडव्या अवस्थेतील विक्रम-२ उभे झाले नाही, तर त्याच क्षणी इस्रोला दुसरा दिवस व दुसरे ठिकाण शोधावे लागेल.

अपेक्षेप्रमाणे विक्रम पाय खाली करून उतरत असल्याचा संदेश मिळाला तर अर्धी मोहीम फत्ते झाली म्हणायची. त्यानंतर विक्रमला अत्यंत संथ वेगाने खाली उतरावे लागेल. वेग शेवटच्या पाच मिनिटांत कमी करीत करीत जर मोरपिसाप्रमाणे विक्रम - २ ने थोडीशी धूळ उडवीत चंद्रपृष्ठाला स्पर्श केला व चारही पायांवर हे यान स्थिर झाले तर ही मोहीम यशस्वी होईल व सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होऊन अवघा देश आनंदात न्हाऊन निघेल.

त्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रग्यान या यंत्रमानवासारख्या सुदूरसंचालीत भटक्याचे (रोव्हर) अवतरण. विक्रम-२ उतरल्यावर एका संगणकीय सूचनेने यानाच्या बाहेर गुंडाळलेली छोटीशी शिडी उघडली जाईल. त्या उतरंडीवरून प्रश्यान खाली येईल व चंद्रपृष्ठभागाला स्पर्श करेल. भारताच्या संपूर्ण इतिहासातील हा सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्यासारखा देदीप्यमान क्षण असेल.

आज संध्याकाळी हातातली सगळी कामे बाजूला ठेवा आणि हे थरारक क्षण अनुभवा! असा थरार आयुष्यात क्वचितच अनुभवता येतो!

Web Title: Chandrayaan-3 Special Article as for 20 Minutes Entire India Will hold their Breath for soft landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.