नाव-आडनाव बदला, गोंयकार व्हा? - गेले ते दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 11:24 AM2022-08-02T11:24:44+5:302022-08-02T11:26:19+5:30

जमीन-घर खरेदी, शासकीय योजनांचे लाभ आणि मुख्यतः पोर्तुगीज पासपोर्टसाठी नावे बदलून ‘गोंयकार’ होणे पूर्वी सहज सोपे होते, आता हे चित्र बदलते आहे... 

change name and surname be honest gone are the days in the state goa | नाव-आडनाव बदला, गोंयकार व्हा? - गेले ते दिवस!

नाव-आडनाव बदला, गोंयकार व्हा? - गेले ते दिवस!

Next

- सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा

गोव्याच्या सौंदर्यामुळे प्रत्येक भारतीयाला गोव्याचे आकर्षण वाटते. उत्तर व दक्षिण गोव्याच्या काही भागांमध्ये युरोपियन संस्कृतीची छाप असलेली हजारो पोर्तुगीजकालीन घरे लक्ष वेधून घेतात. ती वास्तूरचना फिल्म निर्मात्यांनाही भुरळ पाडते. गोव्यात ७० च्या दशकात हिप्पी संस्कृतीचे आकर्षण होते. नंतर हिप्पी गेले; ९० च्या दशकापासून गोवा मेट्रोपॉलिटन होऊ लागला.  आतातर गोवा हे धनाढ्यांचे सेकंड होम झाले आहे. 

सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात तीन लाख परप्रांतीय मजूर राहतात. ते गोव्याचे मतदार आहेत. गोमंतकीयांनाही त्यांची गरज आहे. कारण वाढत्या पर्यटनासाठी स्थानिक मनुष्यबळ मिळत नाही. घरकामगार म्हणूनही ओरिसा व कर्नाटकमधील मुली येतात. कंत्राटदार केरळाचे आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये ५० टक्के मनुष्यबळ झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकातील आहे. मिठाई, हार्डवेअरचा व्यापार राजस्थानी लोक करतात. केस कापण्याचा व्यवसाय तामिळ लोकांच्या ताब्यात आहे. 

मात्र आता गोवा जरा पुढच्या टप्प्यावर निघाला आहे. गोव्यात स्थायिक झालेले किंवा होऊ पाहणारे परप्रांतीय लोक आपली आडनावे बदलून ती गोमंतकीय आडनावांमध्ये रुपांतरित करू पाहतात. उदाहरणार्थ नायर आडनावाची व्यक्ती नायक असे आडनाव करून घेते.  गोव्याबाहेरील मूळ नाईक आडनावाच्याच व्यक्ती नायक असे नामकरण करून घेण्यासाठी कायदेशीर सोपस्कार पार पाडतात. अशा प्रकारे आडनावे बदलण्याचे पेवच फुटले. पूर्वी परप्रांतीयांमध्ये गोव्यात फक्त येण्यासाठी स्पर्धा होती. आता गोंयकार होण्यासाठी स्पर्धा आहे. 

प्रक्रिया फार सोपी असल्याने हजारो परप्रांतीय नाव बदलून गोंयकार होतात. यासाठी  विधानसभा अधिवेशनात ‘गोवा चेंज ऑफ नेम ॲण्ड सरनेम (दुरुस्ती) कायदा २०१९’ मध्ये सरकारने दुरुस्ती केली. आता नाव बदलायचे झाले तर त्या व्यक्तीचा तसेच आई-वडील किंवा आजोबा यापैकी एखाद्याचा जन्म गोव्यात झालेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय नाव बदलासाठीचा अर्ज आता प्रथमच दिवाणी न्यायालयास सादर करावा लागेल. 

अधिकृतरित्या नाव बदलून गोंयकार होण्यात काही खास लाभ आहेत. विशेषत: कमी उत्पन्न  गटातील लोक आपली आडनावे बदलून घेतात, कारण सरकारी योजनांचा लाभ मिळविणे हा मुख्य हेतू असतो. गोव्याचे वाटेल अशा नाव-आडनावाने कागदपत्रे सादर केली की- सरकारी यंत्रणेला  संशय येत नाही. गोव्यात सरकारी नोकरी व अन्य कामांसाठी पंधरा वर्षे निवासी दाखल्याची अट आहे. डोमीसाईल कलम असले तरी, पंधरा वर्षे होताच जर आडनावही बदलून मिळाले तर कोणतीच अडचण येत नाही. शिवाय अनेकजण ग्रामपंचायती, पालिका  निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. पणजीपासून जवळच्याच गावात एक नाईक आडनावाचे सरपंच होते. प्रत्यक्षात ते नायर; पण  नाव बदलून गोंयकार होऊन  आरामात निवडून येत असत.

पोर्तुगीज काळापासून रिकाम्या भूखंडांवर कब्जा मिळवणारी टोळी गोव्यात आहे हे मुख्यमंत्र्यांनी उघडकीस आणले. यासाठी जमिनींची कागदपत्रे बदलली जातात. त्यासाठीही परप्रांतीय व्यक्ती स्वत:ची आडनावे बदलतात. अनेकजण आपले मूळ नाव व आडनाव बदलून ख्रिस्ती नावही धारण करतात. पोर्तुगीज पासपोर्ट तथा पोर्तुगीज नागरिकत्व मिळविणे सोपे व्हावे हा त्यामागचा हेतू. या पासपोर्टमुळे युरोपात कुठेही राहता येते. दरवर्षी किमान पाचेक हजार गोमंतकीय पोर्तुगीज पासपोर्ट प्राप्त करतात. गोवा बदलतो आहे. सरसकट नावे-आडनावे बदलणे सरकारने कठीण केले आहे, आता  नजीकच्या भविष्यात गोव्यात सेकंड होम खरेदीची प्रक्रियाही किचकट होऊ शकते. sadguru.patil@lokmat.com
 

Web Title: change name and surname be honest gone are the days in the state goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.