बदललेला मान्सून पॅटर्न हेच शेतीसमोरचे मोठे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 04:14 AM2019-11-20T04:14:14+5:302019-11-20T04:15:13+5:30

२00२ पासून भारतात मान्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे.

changing monsoon pattern is the biggest challenge for agriculture | बदललेला मान्सून पॅटर्न हेच शेतीसमोरचे मोठे आव्हान!

बदललेला मान्सून पॅटर्न हेच शेतीसमोरचे मोठे आव्हान!

Next

- किरणकुमार जोहर, हवामानतज्ज्ञ

ठरावीक हंगामात निश्चितपणे जमीन आणि समुद्र यांचे सूर्याच्या उष्णतेने तापणे आणि थंड होणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबातील फरकामुळे समुद्राच्या पाण्याची होणारी वाफ जमिनीकडे वाहून आणून त्यातून ढगनिर्मिती होऊन होणारा निश्चित हंगामातील पाऊस म्हणजेच ‘मान्सून’ होय. २00२ पासून मात्र भारतात मान्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे.

मान्सूनचे आगमन आणि मान्सूनच्या परतीचा प्रवास याच्या सर्वसाधारण तारखा निश्चित आहेत, असेच आतापर्यंत मानले जायचे. यंदा मान्सूनचा प्रवास महाराष्ट्रात १५ जुलैनंतर सुरू झाला तर चार महिन्यांत म्हणजे १५ नोव्हेंबरपर्यंत त्याला परतायला कालावधी लागला आहे. पावसाचे वितरण बदलत असून अचानक कमी वेळात ढगफुटी होत जास्त पाऊस पडणे तसेच खंड पडणे हे त्याचे लक्षण आहे. देशातील पर्जन्यमानाबाबत विचार केल्यास विभागनिहाय पावसाचे प्रमाण बदलते आहे. उन्हाळ्यातील पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच पावसाचे एकूण दिवस कमी होत आहेत. अशात अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात येत आहेत. धुक्यामुळेही पिकावर रोग-किडींचे प्रमाण वाढले आहे. तसेच गेल्या काही वर्षांत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते ते कृषिक्षेत्र. जे जीडीपीमध्ये सुमारे १७ टक्के भर घालते. पण भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५३ टक्के हिस्सा शेतीक्षेत्रात गुंतलेला आहे. भारतातील शेतजमीन क्षेत्र १५९.७ दशलक्ष हेक्टर आहे. अमेरिकेनंतर जगातील हे दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे शेतीक्षेत्र आहे. ८२.६ दशलक्ष हेक्टर इतके सिंचनाखाली असलेले भारतीय शेती हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील ५४.२२ लाख हेक्टरवरील खरीप पिके उद्ध्वस्त झाली. कमी कालावधीत काढणीस येणाऱ्या, अतिपावसात, दुष्काळात तग धरू शकतील अशा जाती विकसित करणे गरजेचे आहे.



तापमानातील चढउतार, अनियमित पाऊस, हवेतील आर्द्रतेचा अचानक चढ-उतार अशा अनेक बाबींचा विचार करत यापुढे हवामानातील बदलांचा अभ्यास करूनच शेतकºयांना शेती करावी लाणार आहे. शेतीसाठी योग्य वाणांची निवड करताना बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाºया वाणांच्या निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. हवामानानुसार पीक पेरणीतील वेळेत बदल, पीक व्यवस्थापन, पीक पद्धती, जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढविणे, जल व मृद्संधारणाच्या विविध उपचारांतून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासारखे उपाय शेतीसाठी फायदेशीर ठरतील. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनीची सुपीकता वेगवेगळी असते आणि त्यानुसार योग्य पिकाची निवड केल्यास अनावश्यक खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य आहे. जमिनीची पोषणक्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे.



वाढती लोकसंख्या, बदलत्या हवामानाची अचूक माहिती शेतकºयांना न मिळाल्याने चुकणारे नियोजन व घटणारे उत्पादन, उपलब्धतेच्या तुलनेत अन्नधान्याची होत असलेली मागणी, रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने नापीक होत असलेली शेतजमीन व पिकांना तसेच पिकांपासून मानवाला मिळणारी पोषणक्षमताही घटत चालली आहे. अचूक हवामान माहितीअभावी चुकीची पीकपद्धती अवलंबणे, अयोग्य वेळी पेरणी केल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवणे याच्याशी शेतकऱ्यांना सामना करावा लागतो आहे. भारतीय नागरिकांना उत्तम दर्जात्मक अन्न मिळविण्यासाठी तसेच अन्न सुरक्षा योजना यशस्वी करण्यासाठी सरकारला भारतीय शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यात सिंचनाच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ, स्वस्त कृषी आदानांचा पुरवठा, विजेचा अखंडित पुरवठा, अधिक उत्पादन देणाºया बियाणांचा जास्त वापर, अन्नधान्याची दरडोई उपलब्धता, शेतमालाला योग्य किमती अशा सर्व बाबींवर देखरेख करणारी कार्यक्षम यंत्रणा वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.



दुर्दैवाने देशात कृषी क्षेत्रातील संशोधन जवळपास बंद आहे. सरकारी संस्थांमधील संशोधन निधीअभावी पूर्णपणे ढेपाळले आहे. भारतीय कंपन्याही नवीन वाण विकसित करण्यासाठी गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. अनियमित तसेच अपुरा वीजपुरवठा, पीक विमा योजना राबवण्यातील अपयश, बाजारभावाची अनिश्चितता आणि सरकारी मानसिकता या बाबीही शेतकऱ्यांना सातत्याने त्रासदायक ठरतात. शेतकºयांना प्रगत तंत्रज्ञानाचा आधार दिल्यासच बदलत्या वातावरणात शेतकरी तग धरू शकतील ही वस्तुस्थिती आहे.

Web Title: changing monsoon pattern is the biggest challenge for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.