चराति चरतो भग:
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:09 AM2020-12-12T04:09:56+5:302020-12-12T04:10:30+5:30
शरदरावांच्या रक्तातच चुंबकाचे गुण असावेत, असं वाटतं. याचं कारण शिक्षण, कला, साहित्य, अधिवेशन अशा समारंभांना त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे, तर विरोधकांनाही शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून असावेत, असं वाटतं. असं चुंबकीय व्यक्तिमत्त्व फार थोड्यांना मिळतं.
- शां. ब. मुजुमदार
(संस्थापक व अध्यक्ष, सिंबॉयसिस)
यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्राने जर कुणाचं नेतृत्व निर्विवादपणे मान्य केलं असेल, तर ते शरद पवार यांचं. यशवंतरावांचा वैचारिक वारसा त्यांनी घेतलाच, पण त्याचबरोबर त्यांचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व इतकं बहुआयामी आहे की, त्यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचा व्यासंग, त्यांची अभ्यासू वृत्ती, महाराष्ट्राच्या समस्यांची आणि त्याचबरोबर आधुनिक राहणी, विचारप्रवाह यांचीही सखोल जाण, अखिल भारतीय पातळीवरही स्वत:ची छाप पाडण्याजोगं कर्तृत्व आणि समाजाच्या विविध स्तरावरील व्यक्तीमध्ये-प्राध्यापक, लेखक, कलाकार, खेळाडू, शेतकरी, राजकीय कार्यकर्ते आणि सामान्यातला सामान्य माणूस यांच्यात सहजतेने वावरण्याचं विलक्षण संभाषण कौशल्य इत्यादी गुणामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व उठावदार व प्रभावी झालं आहे. महाराष्ट्रात एकही खेडं असे नसेल की, जिथे शरदराव गेलेले नाहीत. तिथल्या दोन-चार जणांना तरी शरदराव हे पहिल्या नावाने हाक मारतात, मारू शकतात, हे अनेकदा दिसून येतं. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव हटकून येतं.
१९९० हे साल डॉ.आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून जाहीर झाले. डॉ. आंबेडकराच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाने जागा दिली, पण त्याला सुरुवातीपासूनच पर्यावरणवादी संस्थेकडून तीव्र विरोध झाला. प्रकरण न्यायालयात गेले आणि शेवटी निकाल सिंबॉयसिसच्या बाजूने लागला. सिंबॉयसिसच्या डॉ.आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ
शरद पवारांच्या हस्ते करावा, असे ठरवले. मी
त्यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. डॉ.आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना नागपूरची दीक्षान्त भूमी, मुंबईची चैत्यभूमी आणि इतर अनेक संस्थांची आमंत्रणं येणार हे मलाही कळत होतं, त्यामुळेच मी आमंत्रण दिलं, तरीही त्यांना ते स्वीकारणं शक्य होईल का, याविषयी मी साशंक होतो, पण आश्चर्य म्हणजे त्यांनी आमंत्रण स्वीकारलं. त्याप्रमाणे ते आले.
डॉ.आंबेडकर स्मारकाच्या जागेवरून निर्माण झालेले वादंग, त्याला करण्यात आलेला तीव्र विरोध आणि शेवटी सिंबॉयसिसला द्यावा लागलेला न्यायालयीन लढा याची त्यांना कल्पना होती. आपल्या भाषणांत त्यांनी याचा मुद्दाम उल्लेख केला आणि या सर्व विरोधाला, संघर्षाला मी तोंड देत उभा राहिलो, माघार घेतली नाही, याबद्दल माझे कौतुकही केले. याचवेळेस त्यांनी डॉ.आंबेडकर स्मारकासाठी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
शरद पवारांचे झंजावाती दौरे हा एक कुतूहलाचा व कौतुकाचा विषय आहे. चराति चरतो भग: ही उक्ती शरदरावांच्या बाबतीत अक्षरश: खरी आहे. लातूरचा भूकंप, बाबरी पाडल्यानंतर मुंबईत झालेली दंगल. कोल्हापूर-सांगलीमध्ये पुराने केलेला विध्वंस, मराठवाड्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या आणि अशा आपत्तीच्या वेळी स्वत:च्या प्रकृतीची फिकीर न करता, शरदराव सतत मोटारीने, हेलीकॉप्टरने फिरत राहिले. शरीरात उद्भवलेला कर्करोग असो वा पायाला झालेला अपघात असो, त्याची पर्वा न करता विधवांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी, शेतकऱ्यांना धीर देण्याकरिता, पावसाची तमा न बाळगता भरपावसात निवडणुकीचा प्रचार हा माणूस कसा करू शकतो, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. मीही अचंबित होतो, पण शरदरावांची दुर्दम्य इच्छाशक्ती हेच याचं उत्तर आहे. केवळ यामुळेच शरदरावांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
माझ्याबाबतीत एक सुखद योगायोग जुळून आला आहे. पुणे महापालिकेने केलेला माझा सत्कार, ७५ व ८०व्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी केलेला सत्कार, पद्मश्री व पद्माभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर माझे झालेले सत्कार अशा प्रत्येक समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. त्यांनी केलेल्या कौतुकाचा ठेवा माझ्या अजन्म लक्षात राहील.
शरदराव आज वयाची ८० वर्षे पूर्ण करून सहस्त्र चंद्रदर्शनात प्रवेश करत आहेत. या प्रसंगी मी त्यांच्यापेक्षा केवळ वयाने मोठा असल्यामुळे त्यांना मनापासून शुभेच्छा व आशीर्वाद देतो.
जिवेत् शरद: शतम् ॥