तिची गोष्ट : राजकुमारी पोळ्या लाटते, याचे लोकांना फार अप्रूप वाटले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 08:38 AM2024-07-13T08:38:48+5:302024-07-13T08:38:55+5:30
सर्वपक्षीय महिला नेत्यांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री ! या प्रकल्पात राजस्थानच्या उपमुख्यमंत्री राजकुमारी दियाकुमारी यांच्याशी झालेल्या गप्पा.
शायना एन. सी.
भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या
राजकुमारी असल्याचा तुम्हाला काय फायदा झाला?
माझे वडील लष्करात होते. त्यांचे पोस्टिंग दिल्लीत असताना माझे शालेय शिक्षण तेथेच झाले. तेथे कुठलाही भेदभाव मला आढळला नाही. माझे पुढचे शिक्षण लंडनमध्ये झाले. तिथेही असा अनुभव नाही. एवढे मात्र खरे की, लोकांना माझ्याकडे पाहताना असे वाटायचे की, मला वारशाने बरेच काही मिळालेले आहे; परंतु ते खरे नाही. अनेकदा मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम घ्यावे लागले आहेत.
आपण मंत्री आहात. आपल्या आजी गायत्रीदेवी खासदार होत्या. राजघराणे ते लोकप्रतिनिधी हा प्रवास कसा झाला?
हा प्रवास सोपा नव्हता; परंतु माझ्यासाठी ही मोठी गोष्ट महत्त्वाची ठरली की, भारतीय जनता पक्षाने मला संधी दिली. १३ साली मा. नरेंद्र मोदी जयपूरला आले होते. त्यावेळी मला पक्षात प्रवेश देण्यात आला. तोवर मी राजकारणात नव्हते; पण सामाजिक कामात गुंतले होते. जयपूरमध्ये मी शाळा चालवत होते. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थांशीही माझा संबंध आहे. महिला सबलीकरणासाठी माझी स्वतःची स्वयंसेवी संस्था काम करते. माझे वडील सैन्यात होते. आजी राजकारणात होती आणि आजोबा स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेले होते. संस्थानांच्या विलीनीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जयपूरमध्ये त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. लोकसेवेवर त्यांचा भर होता. हे सगळे मी लहानपणापासून पाहत आले.
एक राजकुमारी रणरणत्या उन्हात प्रचार करते आहे, एका ठिकाणी पोळ्या लाटते आहे, याचा काय परिणाम झाला?
तुम्ही नेता होता तेव्हा सगळे लोक हाच तुमचा परिवार होतो. अशा वेळी एखादी महिला पोळ्या लाटत असेल तर तिला मदत करणे हे स्वाभाविक ठरते. लोकांत तुम्ही मिसळला नाहीत तर तुम्हाला कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी जेव्हा एका महिलेच्या घरी पोळ्या लाटल्या तेव्हा लोकांनाही त्याचे फार अप्रुप वाटले, लोकांशी माझी नाळ आहे, हे पाहून मीही त्यांच्यातलीच आहे, याची लोकांना खात्री पटली. विरोधकांनी मात्र हा ‘देखावा’ असल्याचा प्रचार केला. लोकांना अर्थातच खरे काय ते माहीत होते.
राजकारणातील कोणत्याही महिलेकडे एक स्त्री म्हणूनच पाहिले जाते. तुमचा काय अनुभव?
मतदार अगदी समजून-उमजून निर्णय घेतात. स्त्री असण्याचा नक्कीच फायदा होतो; कारण तुम्ही थेट घरात जाऊन दुसऱ्या महिलेशी बोलू शकता. पुरुष उमेदवार असेल तर महिला त्याच्याशी थेट बोलू शकत नाहीत. महिला उमेदवाराचे तसे होत नाही, हा खूप मोठा फायद्याचा भाग असतो.
खासदार असताना कोणते मुद्दे आपण मांडले?
सर्वांत प्रथम मी रेल्वेचा प्रश्न मांडला. आमच्याकडे मीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे खूप काळ रेंगाळलेले होते. रस्त्यांचे प्रश्न होते. संबंधित मंत्र्यांनी माझ्या मागणीकडे तत्काळ लक्ष दिले. उज्ज्वला योजनेचा सर्वाधिक फायदा माझ्या मतदारसंघात झाला होता. कोट्यवधी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन मिळाले. जलजीवन मिशनचा लाभ अनेक गावांना मिळाला.
ग्रामीण व शहरी समस्या आपण कशा समजून घेता?
दोन्ही भागांतील प्रश्न वेगवेगळे असतात. ते मी समजून घेतले. लोकांमध्ये मिसळले. माध्यमांचीही मी त्यासाठी मदत घेतली. मी माझ्या मतदारसंघातील प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला.
लोकप्रतिनिधी असतानाच आईची भूमिका कशी निभावली?
अतिशय कठीण असते ही गोष्ट; पण तुम्हाला ती कसरत करावीच लागते. दोघांनाही वेळ द्यावा लागतो. तो मी प्रामाणिकपणे दिला. माझ्या परीने मी शिकस्त केली.
बलात्कार, स्त्रीभ्रूण हत्या... याबाबत आपण काय उपाययोजना केल्या?
या संदर्भात आम्ही खूप काम केले. हळूहळू लोकांची मानसिकता बदलते आहे. राजस्थानमध्ये कन्या भ्रूणहत्या एक मोठा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही अनेक प्रयोग केले. झुनझुनूमध्ये आम्ही यासंबंधी एक मोठा कार्यक्रम केला होता. त्याला २.५ लाख लोक आले होते. या जिल्ह्यात हा प्रश्न गंभीर होता. मुलीचा जन्म साजरा झाला पाहिजे यावर आम्ही संपूर्ण राज्यात भर दिला. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. सुरक्षिततेचा प्रश्न असेल त्या भागात आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले.