सोमाली चाचांची चौधरीगिरी अन् हतबल महाशक्ती!
By रवी टाले | Published: January 17, 2024 09:44 AM2024-01-17T09:44:07+5:302024-01-17T09:48:16+5:30
इस्रायल-हमास संघर्ष उफाळताच, तांबड्या समुद्रात हुती बंडखोर आणि एडनच्या आखातात सोमाली चाच्यांनी उचल खाणे, हा योगायोग नव्हे!
- रवी टाले
(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी हॉलिवूडमध्ये एका नव्या चित्रपट मालिकेला प्रारंभ झाला. ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ हे त्या मालिकेचे शीर्षक. कॅरिबियन क्षेत्रातील चाचेगिरीच्या सुरस कथांवर आधारित या मालिकेतील एकूण पाच चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले असून, सर्वच जगभर प्रचंड यशस्वी ठरले आहेत. समुद्री चाचांचे विश्व सर्वसामान्यांच्या दृष्टीने किती कुतूहलाचा विषय आहे, हे त्यावरून दिसते. सध्या एडनच्या आखातात सोमाली चाचांनी घातलेल्या धुडगुसाच्या बातम्याही मोठ्या चवीने वाचल्या, बघितल्या जात आहेत. भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी अलीकडेच त्या भागात चाच्यांविरुद्ध कारवाई करून एक व्यापारी जहाज आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना वाचविल्याने, भारतातही ‘चाचेगिरी’विषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
समुद्रात व्यापारी जहाजांना घेरून त्यावरील माल लुटणे किंवा खंडणी उकळणे, हे चाचांचे काम! चाचेगिरीचा पहिला कागदोपत्री पुरावा चौदाव्या शतकातील आहे; पण, सतराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात चाचेगिरी शिखरावर पोहोचली होती. युरोपियन महासत्तांच्या साम्राज्य विस्ताराचा तो सुवर्णकाळ होता. जगातील अधिकाधिक भूभाग साम्राज्यात समाविष्ट करून, त्यांचे शोषण करीत, स्वतःच्या वैभवात भर घालण्यासाठी, गळेकापू स्पर्धा सुरू होती. त्यातूनच खोल समुद्रातील चाचेगिरीचा उदय झाला. युरोपियन सागरी महासत्तांनी वसाहतींमधील संपत्ती समुद्रमार्गे मायदेशी नेण्याचा अव्यापारेषू व्यापार सुरू केला. इतरांची अशी जहाजे लुटण्यासाठी सर्वच महासत्तांनी खासगी नौदलांच्या उभारणीस चालना दिली. त्यांना ‘प्रायव्हेटिअर्स’ संबोधले जात असे; पण, ते सरकारमान्य ‘पायरेट्स’च (चाचे) होते.
युरोपियन साम्राज्यांचा अस्त, तंत्रज्ञान विकासामुळे सुगम झालेले दळणवळण, संपर्क-संवादाची साधने, हवाई वाहतुकीचा प्रसार यामुळे विसाव्या शतकात चाचेगिरीला बव्हंशी आळा बसला; परंतु, ती पूर्णतः नामशेष झाली नाही. अलीकडे एडनचे आखात आणि अरबी समुद्रातील सोमाली चाच्यांची चाचेगिरी बातम्यांमध्ये झळकत असते. इस्रायल-हमास संघर्ष उफाळल्यापासून तर सोमाली चाच्यांना जोर चढला आहे. त्यांच्या चाचेगिरीचे मूळ सोमालियातील अनागोंदीत दडलेले आहे. आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आणि एडनच्या आखाताच्या तोंडावर वसलेल्या सोमालियात १९९१ मध्ये मध्यवर्ती सरकार कोसळले आणि यादवी उफाळली. प्रचंड गरिबी, त्यात अनागोंदी! अवैध विदेशी ट्रॉलर्सनी प्रमाणाबाहेर मासेमारी केल्याने समुद्रातील माशांचे प्रमाणही प्रचंड घटलेले!
हातातोंडाची गाठ पडण्याचे संकट उभे ठाकलेल्या किनारपट्टीवरील सोमाली युवकांनी मग जहाजे लुटण्याचा मार्ग पत्करला. सोमालिया आशिया-युरोप तसेच आशिया-आफ्रिका सागरी मार्गावर असल्याने व्यापारी जहाजांची ये-जा रोजचीच! वेगवान स्पीडबोटी आणि शस्त्रे मिळवून त्यांनी व्यापारी जहाजांचे अपहरण करून मोठ्या रकमा उकळण्यास प्रारंभ केला. जसे १६५० ते १७२६ हे मध्ययुगीन कालखंडातील चाचेगिरीचे सुवर्णयुग समजले जाते, तसे २००८ ते २०११ हे सोमाली चाचेगिरीचे सुवर्णयुग होते. त्यांनी शेकडो जहाजे लुटली. सुपरटँकर्ससारख्या भव्य जहाजांचे अपहरण करून त्यावरील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले, अब्जावधी डॉलर्सची खंडणी उकळली. त्यातूनच शस्त्र वितरक, वित्त पुरवठादार आणि वाटाघाटी करणारे यांची मोठी ‘इको सिस्टीम’च निर्माण झाली.
पुढे या समस्येचे गांभीर्य आंतरराष्ट्रीय समुदायाच्या ध्यानात आले आणि त्या भागात नौदलांची गस्त वाढविणे, व्यापारी जहाजांवर सशस्त्र रक्षक तैनात करणे, चाचेगिरीला जन्म देणारी सामाजिक-आर्थिक कारणे नष्ट करण्यासाठी पावले उचलणे आदी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे २०१२ पासून सोमाली चाचेगिरीत लक्षणीय घट झाली होती; पण, अलीकडे इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. पसोमाली चाचेगिरीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा सक्रिय व्हावे लागले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली दहा देशांच्या नौदलांनी ‘ऑपरेशन प्रॉस्परिटी गार्डियन’ या नावाने गस्त सुरू केली आहे, तर भारतीय नौदलानेही दहापेक्षा जास्त जहाजे तैनात केली आहेत.
यामुळे काही काळ चाचांची चौधरीगिरी बंद राहीलही; पण, गस्तीमध्ये थोडीही शिथिलता आल्यास, महाशक्तींना पुन्हा हतबल व्हावे लागेल! सोमालिया सरकारला बळ देणे, त्या देशाच्या किनारपट्टीवरील समुदायांसाठी आर्थिक उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे, अवैध मासेमारीस आळा घालून शाश्वत मासेमारीसाठी वातावरण निर्मिती करणे आणि चाच्यांना साहाय्य्यभूत ‘इको सिस्टीम’ ध्वस्त करण्यासारख्या उपाययोजना आवश्यक आहेत.
अलीकडे काही बंडखोर गटांनी सोमाली चाच्यांसोबत हातमिळवणी केल्याचीही शंका येत आहे. इस्रायल-हमास संघर्ष उफाळताच, तांबड्या समुद्रात हुती बंडखोरांनी व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि त्याचवेळी एडनच्या आखातात सोमाली चाच्यांनी पुन्हा उचल खाणे, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय राजकारणातील उट्टे काढण्यासाठी काही देशही त्यांना मदत करीत आहेत. या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींशी माझा काय संबंध, असे ज्या सर्वसामान्यांना वाटते, त्यांनाच अंततः त्याची किंमत चुकवावी लागणार आहे; कारण, चाच्यांच्या भयाने जहाजांना लांबचे मार्ग पत्करावे लागल्याने, मालवाहतूक महागणार आहे!