चौकटबध्द ग्रंथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:46 PM2019-01-08T21:46:52+5:302019-01-08T21:47:47+5:30
मिलिंद कुलकर्णी दैनंदिन जीवन जगत असताना निरसपणा, तोचतोपणा जाणवतो. मात्र आयुष्यात कला, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंतर्भाव झाला, तर तेच ...
मिलिंद कुलकर्णी
दैनंदिन जीवन जगत असताना निरसपणा, तोचतोपणा जाणवतो. मात्र आयुष्यात कला, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंतर्भाव झाला, तर तेच आयुष्य समृध्द, श्रीमंत होतं. कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांना प्रत्येक देशाच्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वीचे राजेरजवाडे सुध्दा या कलांना प्रोत्साहन देत असत. तीच परंपरा पुढे लोकशाही व्यवस्थेत आली. सरकारांनी भाषा विभाग, सांस्कृतिक विभाग तयार केले. पूर्वीच्या राजांच्या आणि आताच्या सरकारांच्या मदतीने राजाश्रय मिळून कला, साहित्य क्षेत्र भरीव कामगिरी करीत असते. लेखक, कलावंतांना पारितोषिके देणे, संगीत सभा, साहित्य संमेलने भरविणे, पुस्तकांच्या प्रकाशनासाठी अर्थसहाय्य करणे अशा माध्यमातून सरकार या क्षेत्राला बळ देण्याचे कार्य करीत असते.
ग्रंथोत्सव हा याच श्रृंखलेतील उपक्रम आहे. प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव आयोजित करुन लेखक आणि वाचकांना एकत्रित आणण्याचा चांगला उपक्रम राज्य शासनाने सुरु केला. पूर्वी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत त्याचे आयोजन होत असे, पुढे जिल्हा गं्रथालय अधिकाऱ्याकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हा खांदेपालट चांगला उद्देश ठेवून करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकाºयाचे गं्रथालयांशी नियमित संपर्क असतो. एकप्रकारे वाचकांशी संवाद, संपर्क प्रस्थापित झालेला असतो. वाचकांना काय हवे, त्यांची अभिरुची काय, कल कोणत्या साहित्याकडे आहे याविषयी माहिती संबंधित ग्रंथपाल, ग्रंथालय अधिकाºयाला असणे अपेक्षित असते. त्यामुळे वार्षिक ग्रंथोत्सवात साहित्य क्षेत्रातील नवे प्रवाह, नवे बदल यांना समाविष्ट केल्यास लेखक, वाचकांच्यादृष्टीने तो आनंदोत्सव ठरतो. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रयोग होत आहे. त्याचे स्वागत करायलाच हवे.
परंतु, बहुसंख्य शासनपुरस्कृत उपक्रमांचे जे घडते, तसेच आता या ग्रंथोत्सवाचे होऊ लागले आहे. ठराविक प्रशासकीय अधिकारी, प्रकाशन संस्था, प्रशासनाच्या मर्जीतील साहित्यिक मंडळी यांच्या गोतावळ्यापुरता हा महोत्सव होऊ लागला आहे.
सार्वजनिक स्वरुप असलेल्या या महोत्सवाला ‘प्रायव्हेट लिमिटेड’ असे स्वरुप येऊ लागल्याने आणि साहित्य क्षेत्रातील गटबाजीत हा महोत्सव अडकू लागल्याने ‘तेच ते चेहरे’ महोत्सवात दरवर्षी झळकू लागले आहेत. परिणामी नवे-जुने लेखक, प्रकाशन संस्था, वाचक दूर जाऊ लागले आहेत. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही ग्रंथोत्सवात यंदा हा बदल दिसून येऊ लागला आहे. ग्रंथप्रदर्शनात ७-८ स्टॉल, चर्चासत्रांना १५-२० श्रोत्यांची उपस्थिती, ग्रंथदिंडी, उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमात साहित्यिक मंडळींपेक्षा लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाºयांची गर्दी दिसून आली. संमेलन आणि राजकीय व्यक्ती यांच्यासंबंधीचा वाद जुना असला तरी राजकीय मंडळींना इतर क्षेत्रे मोकळी असताना ‘ग्रंथोत्सवा’सारख्या साहित्यिक उपक्रमात तरी साहित्यिकांना मानाचे स्थान मिळायला हवे.
‘ग्रंथोत्सवा’च्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी लक्षात घेता काही उपाययोजना निश्चित करायला हव्यात. जिल्हा ग्रंथालय अधिकाºयांनी या महोत्सवाची पुरेशी प्रचार आणि प्रसिध्दी करायला हवी. त्यांच्या अधिपत्याखालील ग्रंथालयांपैकी एखाद्या ग्रंथालयाला आयोजकत्व दिल्यास ग्रंथालय अधिकारी कार्यालयावर येणारा भार कमी होऊ शकेल. जिल्हा मुख्यालयी हा उपक्रम आयोजित करण्याचा नियम न करता तालुका वा छोट्या गावी चांगल्या संस्थेने आयोजकत्व स्विकारल्यास तेथे ग्रंथोत्सव घ्यावा. सर्व ग्रंथालये, साहित्य संस्था, वाचन कट्टा, नवोदित, ज्येष्ठ साहित्यिक यांच्यापर्यंत ग्रंथोत्सवाची माहिती व निमंत्रण जाईल, याची काळजी घ्यायला हवी.
अशा छोट्या छोट्या उपक्रमांमुळे कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्र प्रवाही आणि गतीशील राहणार आहे. सरकारच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी निश्चितच काही अंशी बदल करणे आवश्यक आहे.