स्वस्त मरणाचे सापळे, अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:51 AM2021-02-18T05:51:49+5:302021-02-18T05:52:04+5:30

accidents : या अपघातांमध्ये कोणाचा मुलगा वा मुलगी, कोणाची आई किंवा वडील, काका, मामा, मित्र-मैत्रीण मरण पावले आहेत. अपघातांत अशा प्रकारे अंत कोणाचाही होऊ  शकतो. त्यामुळे रोजच्या रोज होणारे हे अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे.

Cheap death traps, accidents are everyone's concern | स्वस्त मरणाचे सापळे, अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय

स्वस्त मरणाचे सापळे, अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय

Next

गेल्या चार दिवसांत देशात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातांनी कोणाचेही मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यात आपले कुटुंबीय, नातेवाईक वा परिचित नाहीत, म्हणून कदाचित काही जण त्याकडे दुर्लक्षही करतील. पण, या अपघातांमध्ये कोणाचा मुलगा वा मुलगी, कोणाची आई किंवा वडील, काका, मामा, मित्र-मैत्रीण मरण पावले आहेत. अपघातांत अशा प्रकारे अंत कोणाचाही होऊ  शकतो. त्यामुळे रोजच्या रोज होणारे हे अपघात सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे.

मध्य प्रदेशात मंगळवारी झालेल्या अपघातात ५३ जण मरण पावले. त्यात बहुसंख्य विद्यार्थी होते. त्याआधी जळगावमध्येही अपघात झाला आणि त्यात १६ मजूर, त्यांची मुले यांचा जीव गेला. त्याआधी गुजरातमध्ये झालेल्या एका अपघातात राजस्थानमधील १० मजूर ठार झाले, तर आंध्र प्रदेशातील रस्ते अपघातात १४ जणांना जीव गमवावा लागला. म्हणजेच चार दिवसांत झालेल्या या अपघातांत तब्बल १०० जण मरण पावले. जणू देशात अपघातांची मालिका सुरू झाली की काय असेच वाटू लागले. याशिवाय रोजच्या रोज लहानसहान अपघात वाढत आहेत आणि त्यातही काहींना जीव गमवावा लागतो, काही जण गंभीर जखमी होत आहेत, तर काहींचे हातपायच निकामी होत आहेत.

वाहनांची वाढती संख्या, वाहनांचा वेग, रात्री-अपरात्री प्रवास करणे, वाहनांत खच्चून प्रवासी भरणे, दारू पिऊन वाहन चालविणे, बेदरकारी आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणचे सदोष रस्ते, वळणांच्या खुणा नसणे हीच अपघातांची कारणे आहेत. देशात सर्वाधिक अपघात होणारी जी तीन राज्ये आहेत, त्यात महाराष्ट्र आहे. ही नक्कीच भूषणावह बाब नाही. जगामध्ये सर्वाधिक अपघात होणारा भारत हाच देश आहे. जगातील एकूण वाहनसंख्येच्या जेमतेम १ टक्का वाहनेच भारतात आहेत आणि देशातील अपघातांचे प्रमाण मात्र जगाच्या ११ टक्के आहे. म्हणजे जगात अपघातात १०० लोक मरण पावले, तर त्यापैकी ११ जण आपल्या देशातील असतात.

दरवर्षी देशाच्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचा आकडा प्रचंड म्हणजे साडेचार लाख आहे आणि त्यात सुमारे दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. म्हणजे दर तासाला ५३ अपघात होतात आणि दर चार मिनिटांत भारतातील एक जण अपघातात मरण पावतो. त्यातही अपघातांत मरण पावलेले ७६ टक्के लोक हे तरुण म्हणजेच १८ ते ४५ वयोगटातील असतात. त्यातही पुरुषांचे प्रमाण अधिक. म्हणजे जेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्य सुरू होते, नोकरी मिळू शकते, संसार स्थिरस्थावर होत असतो, मुले शाळा-महाविद्यालयांत शिकत असतात, वृद्ध आई-बाप मुलांवर अवलंबून असतात, तेव्हा मरण येणे हे फारच दुर्दैवी.

अपघातांमध्ये मरण पावणाऱ्यांमध्ये गरीब, मजूर आणि वाहनचालक यांचे प्रमाण मोठे आहे. ज्यांच्यावर घर अवलंबून आहे, त्यांचा असा मृत्यू झाल्याने पुढे घर चालविणे किती अवघड होत असेल? केंद्र सरकार, राज्य सरकार अशा मोठ्या अपघातांनंतर कुटुंबीयांना अर्थसाह्य देते. त्यातून संबंधित कुटुंबांना मदत होते, हे खरे; पण गेलेली व्यक्ती परत येत नाही. अशा मृत्यूंबाबत आपण फार बेदरकार, असंवेदनशील होत चाललो आहोत, असेच वाटू लागले आहे. जगभर कोरोना विषाणूने कहर माजविला आहे. देशात या आजाराने दीड लाखाहून काहीसे अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे आपण सर्वच जण हादरून गेलो आहोत. मात्र दरवर्षी भारतात तितकेच लोक अपघातांमध्ये मरण पावतात.

गेल्या काही वर्षांत शहरी व काही प्रमाणात ग्रामीण भागांतही हाती पैसा येऊ  लागला आहे. घरात दुचाकी वा चारचाकी वाहन येऊ  लागले आहे. पण, सुसाट वेगाने वाहने हाकली जातात, चुकीच्या पद्धतीने लेन बदलली जाते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात अनेकांना बहुधा लाजच वाटते. त्यातच काही रस्त्यांवर, वळणांवर हमखास अपघात होतात. तिथे खूण असूनही वाहने बेदरकारपणे हाकली जातात. शिवाय रस्त्यांची सदोष बांधणी हेही अनेक अपघातांचे महत्त्वाचे कारण आहे.

भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच त्यावर बोट ठेवून, संबंधित अधिकाऱ्यांचे कानही पिळले आहेत. त्याचे काय करायचे, ते सरकार पाहीलच, पण  अपरात्री वा अंधाऱ्या पहाटे अनेकांना प्रवासाला निघण्याची सवय लागली आहे. दिवसा ठरावीक ठिकाणी पोहोचायच्या हव्यासापोटी अंधार तसेच झोप पुरेशी न झाल्याने अपघाताची शक्यता वाढते. असले प्रकार टाळायला हवेत,  आपल्या जीवाची काळजी आपणच घेतली पाहिजे हे खरेतर कोणी कोणाला सांगण्याचीही गरज नाही. पण, गेल्या चार दिवसांतील अपघात पाहता, सर्वांनीच याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Cheap death traps, accidents are everyone's concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात