चित्ता भारतात येतो आहे, तो इथे रमेल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:25 AM2022-07-28T10:25:21+5:302022-07-28T10:26:15+5:30
अपुरी गवती कुरणे, खाद्याची कमतरता, मानव-वन्यप्राणी संघर्षासह अनेक प्रश्न आपल्या देशातील चित्ता संवर्धन प्रकल्पाला आडकाठी आणणारे आहेत.
संजय करकरे
जगातील अत्यंत रुबाबदार प्राण्यांत गणला गेलेला अतिवेगवान म्हणून लौकिक मिळवलेला चित्ता पुन्हा भारत भूमीवर पाऊल ठेवत आहे. येत्या काही महिन्यांत आफ्रिकेतून आठ चित्ते भारतात दाखल होणार असल्याच्या बातमीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.इतिहासात डोकावले, तर मुगल साम्राजात- खास करून अकबराच्या शिकारखान्यात- हजारो चित्ते होते. त्यांचा उपयोग काळविटांची शिकार करण्यासाठी केला जात असे. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधील संग्रहालयातही महाराजांनी पाळलेल्या चित्तेखान्याची छायाचित्रे आहेत.
भारतातून १९५२ साली शेवटचा चित्ता नष्ट झाला. नष्ट झालेला चित्ता पाळलेल्या चित्त्यांपैकी होता की नैसर्गिक अधिवासातील होता याबाबतही तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर नष्ट झालेल्या मोठ्या सस्तन प्राण्यांत आशियाई चित्त्याचा समावेश आहे. १९७० च्या सुमारास इराणमधून आशियाई चित्ता भारतात आणण्याचा प्रयत्न झाला; पण तो प्रयोग तेथील अस्थिर वातावरणाने फसला. आशियाई चित्ते भारतासह इराण, पाकिस्तानच्या भूमीत होते; पण आता या चित्त्याची प्रजाती केवळ इराणमध्येच असून, त्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली आहे. सन २००० मध्ये हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी इराणमधील आशियाई चित्त्यांचे क्लोन करण्याचा प्रस्ताव मांडला होता; पण इराणने हे करण्यास मनाई केल्यामुळे हा प्रयत्नही फसला. २००९ मध्ये वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांना आफ्रिकेतून चित्ता भारतात कसा येऊ शकेल यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सूचना केली. यावेळी देशातील अनेक ठिकाणी भेटी देऊन चित्त्याला पोषक असा अधिवास शोधला गेला. यात मध्य प्रदेशातील कुनो पालपूर या राष्ट्रीय उद्यानाचे नाव पुढे आले. ते या प्राण्याच्या पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे निश्चित झाले.
देशाबाहेरील प्रजाती देशात पुनर्वसित करू नये अशा भूमिकेतून या निर्णयाला यावेळी विरोध झाला आणि २०१२ मध्ये हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. या वादाला राजकीय किनारही होती. त्यानंतर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला भारतात चित्ता ‘सुरक्षित स्थळी’ सोडण्यास संमती दिली. प्रायोगिक तत्त्वावर चित्त्याचे पुनर्वसन केले जावे असेही न्यायालयाने सांगितले. यानंतर चित्ता पुनर्वसनाला गती आली. गेल्या दोन वर्षांत आफ्रिकेतील काही देशांतून चित्ता आणण्याच्या हालचाली झाल्या आणि आता नामिबियामधून आठ चित्ते भारतात दाखल होण्याच्या प्रक्रियेवर गेल्या आठवड्यात दिल्लीत स्वाक्षऱ्या झाल्या.
-पण भारतातील या अनोख्या पुनर्वसनाकडे काहीशा शंकेने पाहिले जात आहे. अपुरी गवती कुरणे, खाद्याची कमतरता, मानव-वन्यप्राणी संघर्षासह अनेक प्रश्न आपल्या देशातील चित्ता संवर्धन प्रकल्पाला आडकाठी आणणारे आहेत. भारतातील अनेक दुर्मीळ होऊ घातलेले पक्षी, लांडग्यासह माळरानांवरील प्राण्यांकडे दुर्लक्ष करून चित्ता भारतात आणण्याचा अट्टहास कशाला, असा सवाल या प्राण्यांच्या पुनर्वसनाला विरोध करणाऱ्यांचा आहे.
भारताने व्याघ्र संवर्धन यशस्वी करून दाखवले आहे. त्यामुळे चित्त्याचे पुनर्वसन किती यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल.
(लेखक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक आहेत)
s.karkare@bnhs.org