चेन्नई : निसर्गाचा प्रकोप, मानवाचे अपयश

By admin | Published: December 6, 2015 10:22 PM2015-12-06T22:22:32+5:302015-12-06T22:22:32+5:30

भारतातील चौथ्या क्रमांकाचे महानगर असलेल्या चेन्नईमधील जनजीवन पूर्णत: ठप्प झाले होते. विमानांचे उड्डाण नाही, रेल्वे तसेच टेलिफोन सेवा पूर्णपणे बंद, वीजपुरवठाही थांबलेला परिणामी हॉस्पिटलमधीेल

Chennai: Nature's Rampage, Human Failure | चेन्नई : निसर्गाचा प्रकोप, मानवाचे अपयश

चेन्नई : निसर्गाचा प्रकोप, मानवाचे अपयश

Next

-विजय दर्डा , (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
भारतातील चौथ्या क्रमांकाचे महानगर असलेल्या चेन्नईमधील जनजीवन पूर्णत: ठप्प झाले होते. विमानांचे उड्डाण नाही, रेल्वे तसेच टेलिफोन सेवा पूर्णपणे बंद, वीजपुरवठाही थांबलेला परिणामी हॉस्पिटलमधीेल जनरेटरर्सनेही काम करणे थांबविल्याने रुग्ण दगावत होते. असा प्रकार सतत काही दिवस चेन्नईमध्ये घडला. कोणतीही मदत पूर्णपणे पोहचू शकत नव्हती. या प्रकाराला स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केंद्र सरकारपर्यंत सर्वच यंत्रणा जबाबदार मानाव्या लागतील. आपत्ती व्यवस्थापनाचे आपले सगळे आराखडे या आपत्तीपुढे कोसळून पडले असेच म्हणावे लागेल.
चेन्नईवर निसर्गाचा प्रकोप झाला आणि या वर्षाचा नोव्हेंबर महिना हा चेन्नईच्या इतिहासातील सर्वाधिक पावसाचा महिना ठरला. या महिन्यात ४७ इंच एवढा प्रचंड पाऊस झाला. यामुळे नागरिकांचे होणारे हाल डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खूपच वाढले. त्यातच बुधवारी ११ इंच पाऊस पडल्याने सर्वात ओल्या बुधवारची नोंद झाली. (या दिवशी पडलेला पाऊस हा नेहमीच्या पावसापेक्षा ३४ पट जास्त आहे.) मात्र हे सर्व एकदम घडलेले नव्हते. चेन्नईच्या विभागीय हवामान केंद्रातील संचालक एस. आर. रामानन यांनी वेळोवेळी योग्य असा इशारा दिलेला होता. या इशाऱ्यामुळे शहरातील नागरिक आणि किनाऱ्यावरील मच्छीमारांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरेसा साठा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ते गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध होते. असे असले तरी सरकारी यंत्रणा मात्र झोपी गेलेल्या दिसून होत्या. त्यामुळे या बहुआयामी संकटात सुमारे ४५० व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. तसेच या महानगराचे जनजीवन ठप्प झालेले दिसून आले.
चेन्नईला अशा प्रकारचे पूर काही नवीन नाहीत. यापृूर्वी सन १९०३, १९४३, १९७८, १९८५, २००२ आणि २००५ मध्ये या शहराने मोठे पूर अनुभवले आहेत. यंदा मात्र संपूर्ण दळणवळण यंत्रणा ठप्प झालेली दिसून आली. शहरातील सर्व लँडलाइन व मोबाइल फोन बंद पडले होते. हवामानतज्ज्ञांच्या मते हे संकट ईशान्य मान्सून मोठ्या प्रमाणावर बरसल्यामुळे तसेच पॅसिफिक महासागरात अधिक प्रबळ झालेल्या अल-निनो तसेच अधिक उष्ण झालेल्या हिंदी महासागरामुळे उद्भवले आहे. काही तज्ज्ञ या आपत्तीला हवामानातील बदल कारणीभूत नसल्याचे सांगत असले तरी वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन वाढत असून, त्याचाच परिणाम म्हणून हा पाऊस पडला असावा. मात्र हे संकट मानवामुळे ओढावलेले आहे याबाबत कोणाचेही दुमत दिसत नाही.
अनेक विकसनशील देशांमधील मोठ्या शहरांप्रमाणे चेन्नईलाही नागरी नियोजनाच्या चुकलेल्या जुनाट दुखण्यामुळेच हा फटका बसला आहे. शहरात कोणत्याही नियोजनाशिवाय उभारण्यात आलेले उड्डाणपूल तसेच बांधण्यात आलेले रस्ते आणि इमारती यामुळे हे संकट आणखी वाढले आहे. शहरातील दलदलीचे प्रदेश मोठ्या प्रमाणावर आकुंचन पावत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर पल्लीकर्नाई हा दलदलीचा प्रदेश सन २००१ मध्ये ५० चौरस किलोमीटरचा होता, तो आज अवघा ४.३ चौरस किलोमीटरचा राहिला आहे. अशी अवस्था मदुरावोयल तळ्याचीही झालेली आहे. शहरातील सुमारे २०० तळी बुजवून तेथे शासकीय, निमशासकीय व खासगी इमारती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याची नैसर्गिक व्यवस्था लोप पावली. थोड्या पावसानेही रस्त्यांना नदीचे स्वरूप येऊ लागले. या पुराचे पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढले यावरून या प्रश्नाची तीव्रता दिसून येते. याशिवाय रसायनांच्या मोठ्या वापरामुळे मातीची सच्छिद्रता कमी होत असून, पाण्याचा निचरा होत नाही. मलनिस्सारणाची कमी व्यवस्था, तुंबलेली गटारे अशा परिस्थितीमुळे मानवी लालसेमुळे निसर्गाचा प्रकोप वाढलेला दिसून येतो.
सन २०१० मध्ये चेन्नई महानगर विकास क्षेत्र (सीएमडीए)च्या अधिकाऱ्यांनी पुरामुळे मोठे नुकसान होण्याचा अंदाज देत उपाय सुचविले होते. त्यामध्ये साठवण क्षमता वाढविणे, नद्यांची पात्रे विस्तृत करणे, तळ्यांचा विकास करणे आणि नियोजन करताना नद्यांच्या खोऱ्यांचा विचार करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र असे काहीही झालेले दिसून येत नाही, तर या सूचनांच्या विपरीतच घडलेले दिसून येत आहे.
मानवाने निसर्गामध्ये ढवळाढवळ केल्याने उद्भवलेल्या या परिस्थितीचा फटका केवळ चेन्नईमध्ये बसलेला नाही. उत्तराखंड, काश्मीर आणि मुंबईमध्येही असा फटका यापूर्वी बसला आहे. मात्र निसर्गाच्या या इशाऱ्याकडे आपण दुर्लक्षच केले आहे. जोरदार पाऊस, अचानक येणारे पूर अथवा भूकंप अशा प्रकारचा निसर्गाचा प्रकोप कोठेही होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पायाभूत यंत्रणा हवी. नवीन स्मार्ट सिटीसाठी सुविधा देताना आपली शहरे ही दुर्घटनांपासून सुरक्षित करण्याची गरज आहे.
संकटामध्ये सापडलेल्यांच्या मदतीला सर्वजण धावून येतात, हा अनुभव काही नवा नाही. या संकटातही याचे दर्शन घडले. यावेळी सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढे आले आहेत. असे असले तरी वैयक्तिक मदत ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कामापेक्षा महत्त्वाची ठरू शकत नाही. ही संस्था कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये मदतीसाठी तत्पर असलेली दिसते. देशात कोठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास अत्यंत कमी वेळात ही संस्था मदतीसाठी पोहोचते हे विशेष.
अशा आपत्तीप्रसंगी एक वाईट बाजुही दिसून येते. या आपत्तींचा लाभ चमकोगिरी करणारे घेतात. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीच्या वस्तू मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह देतात. केंद्रानेही मोठे पॅकेज जाहीर केले पण ते मिळणार केव्हा हा प्रश्न आहे. एखाद्या आपत्तीप्रसंगी जाहीर केलेली मदत आपत्तीचा जोर कमी होताच मागे पडते आणि आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी खेटे मारावे लागतात हा अनुभव आहे. जाहीर झालेली मदत एकतर वेळेत पोहोचत नाही वा अत्यंत कमी प्रमाणात मिळते. चेन्नईच्या संकटापासून आपण धडा घेऊ आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये कमीत कमी नुकसान होण्याचा प्रयत्न करू, अशी अपेक्षा आ हे.
हे लिखाण थांबविण्यापूर्वी...
कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकवणाऱ्या मानकऱ्यांच्या यादीत मुंबईच्या अजिंक्य रहाणेचा समावेश झाला आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने हा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणाऱ्यांमध्ये याआधीच विजय हजारे, लिटल मास्टर सुनील गावस्कर, मिस्टर डिपेण्डेबल, राहुल द्रविड, कप्तान विराट कोहली यांचा समावेश झालेला आहे. सनीने तीनदा, तर राहुलने दोन वेळा हा पराक्रम केला. रहाणेचे पहिले नाव अजिंक्य आहे. तो देशासाठी ते नाव सार्थ ठरविणार असे दिसते.

Web Title: Chennai: Nature's Rampage, Human Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.