आजचा अग्रलेख: उत्सवापल्याडचे शिवराय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 07:36 AM2023-06-06T07:36:33+5:302023-06-06T07:36:57+5:30
मराठ्यांची राजधानी किल्ले रायगडावर मंगळवारचा सूर्योदय नवी ऊर्जा घेऊन येईल.
मराठ्यांची राजधानी किल्ले रायगडावर मंगळवारचा सूर्योदय नवी ऊर्जा घेऊन येईल. सनई-चौघडे वाजतील. साहसी खेळांची प्रात्यक्षिके होतील. मराठी माणसांच्या जगण्याचा श्वास, पराक्रमाचा ध्यास असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून जाईल. शिवरायांचा हा साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन. याच दिवशी शिवरायांच्या मस्तकावर पहिल्यांदा छत्र विराजमान झाले. आपला शिवबा छत्रपती झाल्याचा आनंद अवघ्या स्वराज्याला झाला. जाज्वल्य इतिहासात सोनेरी पान लिहिले गेले. महाराष्ट्रासाठी हा खऱ्या अर्थाने स्फूर्तिदिन.
चार दिवसांपूर्वी, राज्य सरकारच्या वतीने तिथीनुसार हा दिवस साजरा झाला. त्याला जोडून हिंदुत्ववादी संघटनांनी हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला. जन्म ते राज्याभिषेक अशा शिवरायांच्या कर्तबगारीला कायम चिकटलेला तिथी की तारीख हा वाद पुन्हा काहीसा चर्चेतही आला. शिवरायांनी ६ जून १६७४ला राज्याभिषेक करवून घेतला असल्याने साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन यंदा की पुढच्या वर्षी, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो आधीच साजरा होतोय का, असे प्रश्न उपस्थित झाले. ही मतमतांतरे, वाद टाळायला हवेत. नजर पोहाेचू शकणार नाही, इतक्या उत्तुंग कर्तबगारीच्या एका महान राजाच्या कर्तृत्त्वाला या वादांमुळे गालबोट लागते, याचा विचार करायला हवा.
छत्रपती शिवराय हे धर्म किंवा जातीत बांधता येणार नाहीत, असे अलौकिक राजे होते. तेच गेली चारशे वर्षे महाराष्ट्र धर्माचा पाया आहेत. अठरापगड मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या शिवरायांच्या सैन्यातील लढवय्ये व निष्ठावंत मुस्लीम सेनापती, सैनिकांची यादी मोठी आहे. त्याच बळावर शेकडो गडकिल्ल्यांची मजबूत तटबंदी त्यांनी स्वराज्याभोवती उभी केली. रणांगणातील शत्रूत्व त्यांनी धर्माच्या आधारावर निभावले नाही. रायगडावर मुस्लीम सैनिकांसाठी मशीद किंवा अफजलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर ही शिवरायांच्या धार्मिक औदार्याची प्रतीके आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्वप्नातले रयतेचे राज्य हा गेली साडेतीनशे वर्षे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या भारतातील लोकराज्य, लोकप्रशासन व सुशासनाचा आदर्श मानला जातो. हे स्वराज्य आपल्याच माणसांविरूद्ध, अगदी नात्यागोत्यातल्या लोकांविरूद्ध लढून त्यांनी उभे केले होते. परक्या शत्रूंविरूद्ध लढण्याआधी त्यांना मराठी मुलुखातल्या प्रस्थापितांविरूद्ध लढावे लागले. अगदी फंदफितुरीचाही सामना करावा लागला.
तथापि, या अंतर्गत लढाया लढतानाच वर्षातील सहा महिने हातात नांगर व उरलेले सहा महिने तलवार घेऊन मुलुखगिरी करणाऱ्या लढवय्या समाजाला शिवरायांनी आत्मभान दिले. परक्या राजवटीतील मुलुखाची लूट, जाळपोळ, सामान्यांच्या कत्तली, मुली-बाळींवर अत्याचार म्हणजेच सैनिकी स्वाऱ्या असे मानल्या जाणाऱ्या तत्कालिन काळात हा असा एक राजा, की ज्याने सामान्य माणसांच्या जीविताचे मोल जाणले, ते प्रत्यक्ष आचरणात आणले. पाश्चात्य जगात युटोपिया ही आदर्श राज्याची, सुशासनाची संकल्पना मानली जाते. आपल्याकडे तिला रामराज्य म्हणतात. तिचे प्रत्यक्ष प्रतिबिंब छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जनतेला दिसले. कारण, त्याचा पाया राष्ट्रमाता जिजाऊंच्या शिकवणीचा व संत परंपरेचा होता. प्रचंड धाडसी असलेल्या शिवरायांनी शत्रूंच्या मनात धाक निर्माण केला तो गोरगरिबांवरील अत्याचाराच्या नव्हे तर तलवारीच्या जोरावर. स्वराज्यातील रयतेची मुलांप्रमाणे काळजी घेणारा हा राजा सैनिकांनी सामान्यांच्या गवताच्या काडीला हात लावणेही खपवून घेत नव्हता.
अशा या महान राजाचा साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा धूमधडाक्यात साजरा होणारच. परंतु, असा केवळ उत्सव साजरा करणे म्हणजे शिवरायांना खरे अभिवादन नव्हे. विशेषत: राज्यकर्त्यांच्या मनात सामान्य जनता, त्यातही महिला, मुले, वृद्ध अशा दुबळ्या वर्गासाठी कणव, करूणा आणि कृतीत कल्याण असायला हवे. सर्वधर्मसमभाव, शेतकरी, कष्टकरी समाजाची काळजी, एकूणच अंत्योदयाचा विचार, अशा कल्याणकारी गोष्टींचा आदर्श वस्तुपाठ शिवरायांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्याचे या निमित्ताने स्मरण करायला हवे. तो कृतीत यावा. स्त्रिया व मुलांना जगण्यासाठी, स्वप्ने साकारण्यासाठी सुरक्षित, अनुकूल वातावरणाचा विचार समाजाने करावा, तर जगावर राज्य करण्याची जिद्द बाळगताना शिवरायांचे संघटनकौशल्य, साहसी वृत्ती, रणांगणावरील पराक्रम, विविधांगी व्यवस्थापनाचा अभ्यास नव्या पिढीची शिदोरी ठरेल. शिवराज्याभिषेकाचा विचार उत्सवापलीकडे व्हायला हवा.