आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:11 AM2024-09-03T09:11:27+5:302024-09-03T09:16:32+5:30

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: Today's Editorial: Jode vs Khetere | आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील. २०१९ च्या निकालानंतर चमत्कारिक राजकीय घटनांचा सिलसिला सुरू झाला. दोस्त दुश्मन झाले आणि दुश्मन दोस्त होताना आपण बघितले. सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची खिचडी करून ठेवली आहे. आता छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. अर्थात त्याला विधानसभा निवडणुकीची किनार  आहेच. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती; पण, त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या राजकारणाचे समर्थन कसे करणार? छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक आम्हीच असे भासविण्याचे प्रयत्न दोन्हीकडे सुरू आहेत. मुळात गेल्या पाच वर्षांत आताच्या सहा आणि पूर्वीच्या चार प्रमुख पक्षांनी जे काही दगाफटक्याचे राजकारण केले ते छत्रपती शिवरायांच्या कोणत्या विचारांमध्ये बसणारे होते याचे प्रामाणिक उत्तर ज्याचे त्याने द्यावे.

आतापर्यंतच्या वाक‌्युद्धात  वापरलेली भाषा सभ्यतेच्या चौकटीत बसणारी नव्हतीच. सकाळपासून रात्रीपर्यंत कोण कोणापेक्षा खालच्या दर्जाचे बोलतो याची स्पर्धा महाराष्ट्रात दरदिवशी बघायला मिळते. खासगीमध्येही पूर्वीचे राजकारणी एकमेकांबद्दल ज्या भाषेत बोलत नसत, त्याहीपेक्षा खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर जाहीररीत्या केला जात आहे. ‘आमचेच शिवप्रेम कसे जाज्वल्य आणि तुमचे कसे बेगडी’ हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. इतिहासातील संदर्भ देत एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. दर्जाहीन शब्दसंपदा आता संपत चालली म्हणून की काय आता ‘जोडे मारो विरुद्ध खेटर मारो’ असे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांच्याकडून शहाणपणाची अपेक्षा आहे असे बडेबडे नेते एकमेकांच्या फोटोंना जोडे-चपलांनी बडवत आहेत. पायातील वहाणा या पायातच चांगल्या असतात, त्याचा अन्य कारणांसाठी असा गैरवापर करू नये एवढेही शहाणपण कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडे राहिलेले नाही असा त्याचा अर्थ! एक दिवस सांकेतिक आंदोलन करून विषय संपविता आला असता; पण नाही, आता राज्यभर हे आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. राज्यभर ‘जोडे मारो, खेटर मारो’ करत फिरण्याचे समर्थन कसे करणार?

सणासुदीचे दिवस आहेत. गणरायांचे आगमन चार दिवसांवर आले आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे सगळे उत्सवी आणि उत्साही वातावरण असेल. कोणाच्या राजकारणामुळे या वातावरणाला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वपक्षीय नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. ही भूमिका मांडल्यानंतर, ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतरही आंदोलन करायचे नाही काय?’ आणि ‘‘या आंदोलनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही काय?’ असे प्रश्न साहजिकच विचारले जाऊ शकतात. आंदोलन करण्यास काहीही विरोध नाही, फक्त त्यानिमित्ताने एकमेकांना शिवीगाळ करणे, एकमेकांना वहाणांनी मारणे असे प्रकार टाळले तर सामाजिक साैहार्द टिकेल. महाराष्ट्र निवडणुकीकडे जात असताना मध्ये रांगेने सण येणार आहेत. आपल्याकडे राजकारण आणि धार्मिक भावनांची सरमिसळ लगेच होते, हे संवेदनशीलपणे लक्षात घेण्याची गरज आहे. ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पडूनही दंगली कशा घडत नाहीत?’ असे विधान करणे किंवा दररोज वातावरण चिघळेल अशी भडकाऊ भाषा उद्धवसेना, शिंदेसेना किंवा भाजपच्या ‘लाउडस्पीकर’ नेत्यांनी वापरणे तातडीने बंद केले पाहिजे. अशी भाषा प्रत्येक पक्षातील ‘शाउटिंग ब्रिगेड’ वापरतच असते, किंबहुना अशा काही नेत्यांना प्रत्येकच पक्षाने त्यासाठी सोडून दिलेले असते. पण, आता ज्येष्ठ मानले जाणारे नेतेही अशी भाषा वापरू लागले आहेत ही अधिक चिंतेची बाब! एकमेकांविरुद्ध तुम्ही कितीही गरळ ओका, फैसला जनतेच्या दरबारातच होणार आहे. हा दरबारच कोणाला सत्तेत बसवायचे ते ठरविणार आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जाण्याची संधी जनताजनार्दनाकडे मागताना तरी या वहाणा बाहेर ठेेवा. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे सर्वपक्षीय अवमूल्यन झाले, त्याला लोक कंटाळले आहेत. विकास, राजकीय संस्कृती, सभ्यता याबाबत देशाला मार्गदर्शक ठरणारा पूर्वीचा महाराष्ट्र लोकांना हवा आहे. तो असे जोडे, खेटरे एकमेकांवर उगारून नेतेमंडळी देऊ शकणार नाहीत. बिहारच्या राजकारणाला आपण आजवर नावे ठेवत होतो; पण आपण तर त्याच्याहीपेक्षा खालची पातळी गाठत आहोत. हे वेळेत थांबले नाही, तर संत तुकाराम यांच्या भाषेत जनताच राजकारण्यांना ‘मोजोनी माराव्या पैजारा’ असे म्हणेल; ती वेळ येऊ नये एवढेच!

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: Today's Editorial: Jode vs Khetere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.