ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्याचाच विरोधी पक्षनेता! कोर्टात जाण्याऐवजी गिनीज बुकच्या ऑफिसात जायला हवं

By अतुल कुलकर्णी | Published: August 21, 2022 05:44 AM2022-08-21T05:44:42+5:302022-08-21T05:45:24+5:30

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई  साहेब नमस्कार,  आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळालं. अभिनंदन..! पण विरोधी पक्षनेतेपद देखील आपल्याच पक्षाला मिळालंय... एकाच ...

Chief Minister and leader of the opposition from same party maharashtra shiv sena | ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्याचाच विरोधी पक्षनेता! कोर्टात जाण्याऐवजी गिनीज बुकच्या ऑफिसात जायला हवं

ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्याचाच विरोधी पक्षनेता! कोर्टात जाण्याऐवजी गिनीज बुकच्या ऑफिसात जायला हवं

Next

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

साहेब नमस्कार, 
आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळालं. अभिनंदन..! पण विरोधी पक्षनेतेपद देखील आपल्याच पक्षाला मिळालंय... एकाच पक्षाला ही दोन्ही पदं कशी काय मिळू शकतात...? डोकं पार भंजाळून गेलंय. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता हे कसं काय घडू शकतं...? देशात असं एखादं तरी उदाहरण आहे का...? असेल तर नक्की सांगा... नसेल तर गिनीज बुकात नोंद करायला तरी पाठवा...  शिंदे गट का ठाकरे गट...? या वादापेक्षा एकदम भारी मुद्दा... हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे..! तेव्हा तो गिनीज बुकात नोंदवलाच पाहिजे... याची कागदपत्र गोळा करायला सांगा आणि कोर्टात पाठवायच्या ऐवजी गिनीज बुकात पाठवा... कायमची नोंद तरी होईल..! कारण असा विक्रम पुन्हा होणे नाही..., असं नाही वाटत साहेब तुम्हाला...?
शिवसेना कोणाची..? या वादाचा निकाल लागायचा तेव्हा लागेल... त्यात काही वर्षे जातील... त्यापेक्षा गिनीज बुकात पटकन नोंद होऊन जाईल...! पोरांना, नातवंडांना गोष्टी सांगताना हे रेकॉर्ड कामाला येईल...! आपला पक्ष भारी... आपले नेते भारी.... आयला, आपलं सगळंच लई भारी...! मराठी माणूस उगाच नाही म्हणत साहेब आपल्याला...

मागे देखील आपल्या पक्षानं असाच एक रेकॉर्ड केला होता... पंधरा-वीस दिवस आपले आमदार विरोधी पक्ष म्हणून सभागृहात बसले...  त्या पंधरा दिवसांत किती मागण्या केल्या...! कर्जमाफी झाली पाहिजे, वीजमाफी झाली पाहिजे... आणि पंधरा दिवसानंतर आपले लोक सत्ताधारी पक्षात गेले...! विरोधी पक्षात बसून आपण केलेल्या मागण्यांचं पुढे काय झालं? हे विचारण्याची कोणाची मजाल झाली नाही पुढं पाच वर्षे...! त्यानंतर पाच वर्षे आपण राजीनामे खिशात घेऊन फिरत राहिलो... सरकारमध्ये राहून सरकारला ठोकत राहिलो... हे असं इतर कोणत्या पक्षाला आजपर्यंत जमलंय का साहेब..! आपला पक्ष म्हणजे जोक नाही साहेब..? 

आपला तो पण एक विक्रमच होता... पण तो कुठे ना कुठे झाला असेल. हल्ली कुठे काय घडेल सांगता येत नाही. तिकडे नितीशकुमारचंच बघा ना... आदल्या दिवशी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्याचा पदर धरून मुख्यमंत्री झाले...! (आपला तर आदर्श घेतला नाही ना साहेब त्यांनी... हे असं काही करण्याचे कॉपीराईट तातडीनं आपण आपल्याकडे घेतले पाहिजेत) आपण जे पंधरा-वीस दिवसांत केलं ते नितीश कुमार यांनी काही वर्षांनी एक दिवसात केलं. पण ज्याचा मुख्यमंत्री, त्याचाच विरोधी पक्षनेता, असा आपल्या पक्षाचा विक्रम त्यांनाही मोडता आलेला नाही...! आपल्यासारखा पक्ष देशातच काय जगात कंदील लावून शोधला तरी सापडणार नाही...! तेव्हा जमवून आणा आणि कोर्टात जाण्याऐवजी गिनीज बुकच्या ऑफिसात जायला सांगा... या विक्रमाची नोंद पक्की करून घ्यायला लावा...

इतका आपुलकीने, आत्मियतेने आपल्याला कोणीही सल्ला देणार नाही बरं का साहेब... मी म्हणून देतोय..! ते जमतच नसेल तर एक आयडिया देऊ का..? तुम्ही आपले म्हणून तुम्हाला आयडिया देतो, हळूच सांगतो. कोणाला कळायच्या आत आपणच एक गिनीज बुकाची शाखा आपल्या शाखेजवळ काढून टाकू...! नाहीतरी दादरला दोन-दोन शाखा सुरू झाल्याच आहेत... त्यात तिसरी गिनीज बुकाची शाखा काढू... आपणच आपला विक्रम, आपल्याच गिनीज बुकात नोंदवून टाकू.... कोर्ट कचेऱ्या ज्याला करायच्या त्याला करू द्या... आहे की नाही भन्नाट आयडिया..? तेव्हा साहेब, कोणाला तरी कामाला लावा, आणि हे करून टाका. बाकी बरे आहात ना...?
-  तुमचाच, बाबूराव

Web Title: Chief Minister and leader of the opposition from same party maharashtra shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.