मुख्यमंत्री, जरा इकडेही लक्ष द्या!

By admin | Published: February 15, 2016 03:31 AM2016-02-15T03:31:47+5:302016-02-15T03:31:47+5:30

महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत

Chief Minister, just look at this! | मुख्यमंत्री, जरा इकडेही लक्ष द्या!

मुख्यमंत्री, जरा इकडेही लक्ष द्या!

Next

महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत. चार देशांचे पंतप्रधान, आठ राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. बिझनेस घेऊन येणाऱ्या उद्योजक आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात अनेक सेमिनार आहेत. अशा भव्य दिव्य मेक इन इंडियाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सगळी व्यवस्था नीट होते आहे का हे पाहात आहेत. जगभरातून येणाऱ्या उद्योगविश्वाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झालंय असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मेगा इव्हेंटसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मात्र त्यांना असणारी कळकळ दुर्दैवाने केंद्राच्या आणि राज्याच्या माहिती खात्याकडे दिसत नाही. पीआयबीचे डायरेक्टर मनिष देसाई, आहे त्या परिस्थितीत मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसतात, पण त्यांच्याकडे काम करायला माणसेच नाहीत. तुटपुंजा स्टाफ घेऊन ते हा सगळा तामझाम देशभर कसा पोहोचवणार, याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही.
एकूण किती सेमिनार आहेत, कोणत्या विषयावर आहेत, त्यात कोण भाग घेणार आहे, ते कोठे होणार आहेत याची कोणतीही एकत्रित माहिती कोणाकडेही नाही. पीआयबीच्या अधिकाऱ्यांनाच केंद्राचा उद्योग विभाग पुरेशी माहिती देताना दिसत नाही. हा त्याच्याकडे बोट दाखवतोय, तो त्याचे नाव घेतोय, सगळे काम करताना दिसतात पण नेमकी जबाबदारी कोणाची याबद्दल सगळा सावळा गोंधळ आहे. एकत्रीत सगळी माहिती कोठे मिळणार याविषयी कोणीही ठामपणे काहीही सांगताना दिसत नाही. महाराष्ट्राला मेक इन इंडिया भरवण्याची संधी मिळाली याचा आनंद राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागालाही व्हायला हवा होता. राज्याला प्रमोट करण्याची एवढी चांगली संधी चालून आली, पण पकडून आणल्यासारखे, किंवा या सगळ्याशी आपला काहीच संबंध नाही असे भाव माहिती खात्याच्या चेहऱ्यावर आहेत. महाराष्ट्राच्या सेमिनारपुरती माहिती ते देतात, पण बाकी काही विचारले की माहिती नाही असे सांगतात.
मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मेगा इव्हेन्टची माहिती देण्यासाठी माध्यमाना बोलावले. तेथे माहिती खात्याचा एकही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. जेनसिस नावाच्या पीआर एजन्सीच्या नवख्या मुलींनी प्रवेशद्वारावर पत्रकारानाच प्रश्न विचारुन सळो की पळो केले. त्या मुलीना अनेक माध्यमांची नावे माहिती नव्हती. कोठून आलात असे त्या मुली विचारत होत्या, त्यावर एकाने वैतागून, बाळकृष्ण प्रिंटींग प्रेस... असे सांगितले. त्यावर त्या मुलीने तेही नाव निष्ठेने डायरीत लिहिणे सुरु केले. पीआयबीच्या मर्यादा आहेत. त्यांच्याकडे माणसे नाहीत, मात्र राज्याच्या माहिती खात्याला आपल्या राज्यात होत असलेल्या या मेगा इव्हेन्टकडे आपुलकीने पाहाण्याची गरज वाटत नाही. सरकारचे कौतुक करुन घेण्याच्या चालून आलेल्या संधीचे जर सोने करता येत नसेल तर अन्य वेळी हा विभाग काय करणार? या सगळ्या इव्हेन्टच्या आॅफबीट स्टोरीज, माहिती देऊन कितीतरी चकटफू प्रसिध्दी राज्याला मिळवून घेता आली असती.
जी अवस्था माहिती खात्याची, तीच अन्य विभागांची आहे. आपल्याकडे देशोदेशीचे व अनेक राज्यांचे पाहुणे येत आहेत, अशावेळी माध्यमाना सोबत घेऊन काय सांगू आणि काय नको असे व्हायला हवे होते. त्याउलट हा सगळा सोहळा जास्तीत जास्त सरकारी कसा होईल याकडे सगळ्यांचे जास्त लक्ष लागले आहे. पंतप्रधानांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमात सुंदर भाषण केले तर माहिती खात्याने चार ओळीत त्याची बातमी पाठवली! अशाने मेक इन महाराष्ट्र कसा साकारणार?
पोलिसही तसेच. कुठून ही ब्याद आलीय असा त्यांचा आविर्भाव. यातून ‘अतिथी देवो भव’ कसे साकारणार? एकट्या मुख्यमंत्र्यांना तळमळ असून भागणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आजपासून चार दिवस हातात आहेत. महाराष्ट्राचे ब्रँडींग करण्याची ही सुवर्णसंधी आहे. नुसत्या लामणदिव्याचेच कौतुक करत बसाल तर निराशेच्या अंधाराशिवाय हाती काही लागणार नाही. यापेक्षा जास्त काय सांगावे?
- अतुल कुलकर्णी

Web Title: Chief Minister, just look at this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.