मुख्यमंत्री पास, शिक्षणमंत्री नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:34 AM2018-06-30T05:34:53+5:302018-06-30T05:34:57+5:30

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला धूळ चारून आपण व्याजाची परतफेड केली आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांचा पराभव करून मुद्दलाची परतफेड करायची आहे,

Chief Minister passes away; | मुख्यमंत्री पास, शिक्षणमंत्री नापास

मुख्यमंत्री पास, शिक्षणमंत्री नापास

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला धूळ चारून आपण व्याजाची परतफेड केली आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांचा पराभव करून मुद्दलाची परतफेड करायची आहे, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराला प्रारंभ करताना केली होती. त्यामुळे मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा कोकण पदवीधर मतदारसंघात पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेल्या डावखरे यांना पराभूत करून जुन्या दुष्मनीचे मुद्दल व व्याज याची परतफेड करण्याचा विडा जितेंद्र आव्हाड यांनी उचलला होता. मात्र त्यांच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेनेला भाजपाचे नाक कापायचे असल्याने त्यांनी संजय मोरे यांना रिंगणात उतरवले होते. शिवसेनेची संघटनात्मक फळी मजबूत असल्याने मोरे यांनी बरीच मते घेतली. त्यामुळे डावखरे यांना पसंतीक्रमाची मते घेऊन विजय संपादन करायला लागला. कोकण पदवीधर मतदारसंघ हा मुळात भाजपाचा तर मुंबई पदवीधर ही शिवसेनेची मिरासदारी. परंतु मागीलवेळी शिवसेनेने डावखरे यांना साथ दिल्याने तो राष्ट्रवादीकडे गेला होता. त्यामुळे भाजपाने तो पुन्हा काबीज करुन आपले ‘डाव’खरे केले. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झालेल्या डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने विलास पोतनीस या सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली होती. डॉ. सावंत यांच्या कार्यशैलीवर शिवसैनिक नाराज असल्याने शिवसेना नेतृत्वाने पोतनीस यांच्यासारख्या कार्यकर्त्याला थेट आमदार करून सर्वसामान्य शिवसैनिकापासून शिवसेना दूर गेलेली नाही, हाच संदेश दिला आहे. कोकण पदवीधरमध्ये शिवसेना जोमाने उतरल्याने मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपाने अमितकुमार मेहता यांना रिंगणात उतरवले होते. मात्र भाजपाकडे शिवसेनेच्या तोडीचे संघटनात्मक बळ नसल्याने जेमतेम मते घेऊन मेहता धापा टाकत पिछाडीवर राहिले. मुंबई शिक्षक मतदारसंघात पूर्वाश्रमीचे पत्रकार कपिल पाटील यांनी हॅट्ट्रिक करून आपण मुरब्बी राजकारणी असल्याची ग्वाही दिली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कपिल पाटील यांच्यात वरचे वर संघर्ष सुरू होता. शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध हेच दोघांमधील मतभेदाचे मुख्य कारण आहे. शिक्षकांची नोंदणी करताना आडकाठी करण्यापासून रात्रशाळा बंद करण्यापर्यंत अनेक मार्गानी पाटील यांना पराभूत करण्याकरिता डावपेच खेळले गेले, असे आरोप खुद्द पाटील यांनी केले आहेत. शिक्षक व पदवीधर हे दोन्ही मतदारसंघ सुशिक्षितांचे. मात्र या दोन्ही मतदारसंघात पैशाचा पडलेला पाऊस व प्रचारात आरोप-प्रत्यारोपांनी गाठलेली पातळी ही लज्जास्पद होती. पदवीधरांचे रोजगार व उच्च शिक्षणाशी संबंधित प्रश्न किंवा शिक्षकांचे शोषण, अन्याय अशा प्रश्नांची झालेली चर्चा लिंबूलोणच्या इतपतच होती. नाशिक शिक्षक मतदारसंघात पैठणीसह लक्ष्मीदर्शन कार्यक्रम पाहून सारेच अवाक् झाले. या मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी दोन्ही काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा पराभव केला. नोटाबंदीच्या काळात नाशिक जिल्हा बँकेचे व्यवहार संशयाच्या भोवºयात सापडले होते. त्यावेळी शिक्षकांना त्या गैरव्यवहाराचा फटका बसला होता. त्या बँकेवर दराडे यांचा वरचष्मा आहे. मात्र तात्कालीक लाभापुढे शिक्षकांनाही त्याचा विसर पडला. नाशिकमधील कवी के. आर. सावंत यांची एक कविता सध्या व्हॉटसअ‍ॅपवर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याच्या ओळी अशा आहेत.
कुठं भरकटली जात आमुची गुरुजनांची
निष्ठा आम्ही धनावर विकली
मध्येच का रे भुरळ पडोनी
पैठणी नेसला.

Web Title: Chief Minister passes away;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.