मुख्यमंत्र्यांची ‘हमाली’
By Admin | Published: April 17, 2017 01:04 AM2017-04-17T01:04:28+5:302017-04-17T01:04:28+5:30
काही राजकीय पुढाऱ्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रकाशझोतात राहण्याचा जणू छंदच जडलेला असतो. प्रसिद्धी मिळवून घेण्याच्या नादात मग ते अविश्वसनीय कृत्ये
काही राजकीय पुढाऱ्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रकाशझोतात राहण्याचा जणू छंदच जडलेला असतो. प्रसिद्धी मिळवून घेण्याच्या नादात मग ते अविश्वसनीय कृत्ये अथवा वक्तव्ये करीत असतात. अर्थात, त्यामागे राजकीय लाभ पदरी पाडून घेण्याचा हेतू असतोच. आता हेच बघा ना! केवळ वास्तुदोष असल्याने स्वत:साठी ५० कोटींचा आलिशान बुलेटप्रूफ बंगला बांधून घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांना अचानक मजूरकाम करण्याची उपरती आली आहे म्हणे. दोन दिवस ते चक्क हमाल बनून लोकांची ओझी वाहून नेणार आहेत. विश्वास नाही ना बसत? पण त्यांनी स्वत:च हा विशालहृदयी मनोदय जाहीर केल्याचे समजते. केसीआर यांनी त्यांच्या पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि इतर नेत्यांनाही अंगमेहनतीची कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. यामागील कारणही तेवढेच भावनिक आहे. येत्या २१ एप्रिलला तेलंगणा राष्ट्र समितीचे अधिवेशन आहे. या अधिवेशनासाठी लागणारा खर्च भागवायचा तरी कसा? असा गंभीर प्रश्न पडल्यावर केसीआर यांना ही ‘गुलाबी कुली दिनालु’ अर्थात गुलाबी कामगार दिनाची कल्पना सुचली. यानिमित्ताने एक नवा आदर्श प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे म्हणतात. केसीआर यांचे हे महान विचार ऐकल्यावर राज्यातील जनता भारावून गेली नाही तरच नवल! विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी देवधर्माच्या नावावर शासकीय तिजोरीतून केलेल्या कोट्यवधीच्या उधळपट्टीचाही त्यांना विसर पडला असणार. दोन तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी तिरुमला मंदिरात पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने वाहिले होते. त्यानंतर एका मंदिरात ७०,००० रुपयांची मिशी वाहिली. स्वतंत्र तेलंगणाचे आंदोलन सुरू असताना त्यांनी म्हणे नवस बोलला होता. तो नवस फेडण्यासाठी तब्बल नऊ कोटी रुपये खर्च झाले. स्वत:च्या धार्मिक भावना जपण्यासाठी जनतेचा पैसा लुटण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असा सवाल करीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर त्यांच्याविरुद्ध मोहीमच उघडली आहे. तेलंगणा कर्जात बुडाले असून, राज्यावर सुमारे १.२३ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेतकरी आत्महत्येत हे राज्य आज देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता दोन दिवसांच्या हमालीनंतर तरी केसीआर यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होईल आणि ते आपल्या राज्यातील जनतेच्या उद्धाराकरिता प्रमाणिक प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.