बालक, छे वेठबिगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:04 PM2018-11-14T22:04:09+5:302018-11-14T22:05:23+5:30

शासन, प्रशासन आणि समाजाचा बालकांविषयीचा दृष्टीकोन बदलत गेला

Child, six siege | बालक, छे वेठबिगार

बालक, छे वेठबिगार

Next

मिलिंद कुलकर्णी
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीदिनी देशभर ‘बालदिन’ साजरा होत आहे. चाचा नेहरु म्हणून बालकांशी त्यांचे नाते होते, त्याला यादिवशी उजाळा दिला जातो. नेहरु किती दूरदृष्टीचे नेते होते, हे बालकांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा, प्रेम यातून दिसून येते. महात्मा गांधी, सानेगुरुजी या थोर स्वातंत्र्यसेनानींचे बालकांशी वेगळे नाते होते. देशाचे भवितव्य असलेल्या बालकांवर विशेष लक्ष देण्याची या नेत्यांची तळमळ, कळकळ त्यांच्या छोट्या कृतीतून दिसून येत असे.
काळ लोटला, तसा शासन, प्रशासन आणि समाजाचा बालकांविषयीचा दृष्टीकोन बदलत गेला, असे म्हणावे लागेल. आता बालकांची स्थिती काय आहे, याचा विचार आम्ही करणार आहोत काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. बालकांना आम्ही वेठबिगार बनविले आहे. आमीर खान अभिनित ‘थ्री इडियटस्’ चित्रपटात मुलांना लहानपणापासूनच डॉक्टर, इंजिनीयर बन असे जे बिंबविण्यात येते, त्यावर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील हे भाष्य आम्हाला भावते. परंतु वास्तवात आम्ही पुन्हा पारंपरिक पालकच बनतो. पुन्हा आमीर खानचाच ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आठवतो. प्रत्येक मुलात वेगळेपण आहे. त्याचे वेगळेपण, कल, आवड लक्षात घेऊन पालकांनी अभ्यासक्रमाची निवड करायला हवी. पण तसे होत नाही. नर्सरीपासून आम्ही मुलांना शिकवण्या लावतो. कोवळ्या हातात पेन, पेन्सिली देऊन लिखाणाचे वळण लावण्याची सक्ती करतो. दिवाळी आणि उन्हाळी सुट्यांमध्ये किती पालक आपल्या पाल्यांना विचारात घेऊन नियोजन करतात. मुले घरी रहायला नको आणि त्याला ‘सगळं’ आलं पाहिजे म्हणून अ‍ॅथलेटिक्स, नृत्य, व्यक्तीमत्व विकास अशा शिबिरांमध्ये कोंबले जाते.
शाळांमध्ये दुसरे काय होते? नामांकित शाळांमध्ये एका वर्गात ७०-८० विद्यार्थी असतात. एवढी संख्या असताना शिक्षक तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे कसे लक्ष देणार? आणि अभ्यासक्रमातील अडचण, शंका असली तरी विद्यार्थी ती विचारु शकेल काय? शकतो काय? याचा विचार केला जाणार आहे काय? राज्य शासन शिक्षणाच्या नावे मूल्यमापन, मूल्यशिक्षण, कलचाचणी, शिष्यवृत्ती, खिचडी, खेलकूद, क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या वक्तृत्व, वादविवाद, बालनाट्य अशा स्पर्धा, उपक्रम घेत असताना त्यात खरोखर बालकांचा सर्वांगीण विकास होत आहे का, याची खातरजमा कोण करणार?
कोपर्डी घटनेच्या निमित्ताने विद्यार्थिनी, त्यांच्या अपडाऊनसाठी बसची सुविधा, सुरक्षा असे विषय ऐरणीवर आले होते. त्यावर पुढे काहीही झाले नाही. राज्य शासन आणि एस.टी.महामंडळाने हिरकणी, मानव मिशन अशा उपक्रमांमधून विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र गाड्या उपलब्ध करुन दिल्या. परंतु, त्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. आजही अनेक खेड्यांमध्ये विद्यार्थी खाजगी वाहनांमधून शाळेत ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेचा विषय तर दूरच राहिला.
शाळा, सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलने यात बालकांच्या सहभागाविषयी काहीही नियम नसल्याने उपस्थिती वाढविण्यासाठी हमखास विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते. मध्यंतरी जळगावातील एका शिक्षणसंस्थेने विक्रमासाठी एक कलाकृती साकारली, पण त्यासाठी पुन्हा शाळेतील मुलांनाच कामाला जुंपण्यात आले. गणेश विसर्जनानंतर मिरवणूक मार्ग आणि तलावाची स्वच्छता करण्यासाठी एका संस्थेनेही शाळकरी मुलांनाच जुंपले. हे सगळे करताना मुलांना श्रमानुभवाची शिकवण देण्याचा प्रयत्न असल्याचा तात्विक मुलामा देण्यात येतो. आंदोलनातही मुलांना सहभागी करुन उपस्थिती वाढविण्याचे दोन प्रकार मध्यंतरी घडले. त्यासाठी समर्थन असे करण्यात आले की, मुलांना ही समस्या भेडसावते म्हणून त्यांचा सहभाग घेतला. बालपणापासून त्यांच्यात देशप्रेमाची आवड निर्माण व्हावी, म्हणून त्यांना आंदोलनात सहभागी करुन घेण्यात आले. आता या लंगड्या समर्थनावर विश्वास कसा ठेवायचा?
खान्देशात कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. दिवाळीच्या सुट्या असल्याने बहुसंख्य विद्यार्थी शेतात कापूस वेचणी करतात आणि कुटुंबाला अर्थसहाय्य करत असल्याचे चित्र आहे. शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती, मोफत शिक्षण, खिचडी, मोफत धान्य, मोफत घरकूल अशा मोठमोठ्या योजना असताना बालकांना कुटुंबासाठी आर्थिक योगदान द्यावे लागते, ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब नाही काय? त्यांचे बालपण करपते, कोमेजते याचा विचार किमान बालदिनाचे निमित्त साधून आम्ही करणार आहोत की नाही? केवळ उपचार म्हणून हा दिन साजरा करणार आहोत?

Web Title: Child, six siege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.