सुमित्रा मावशीच्या जाण्यानंतरचं पोरकेपण..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:07 AM2021-04-20T05:07:05+5:302021-04-20T05:07:42+5:30
मराठी चित्रपटांचा बाज, मांडणी, विषय, आशय बदलण्यात अलीकडील काळात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो सुमित्रा भावे यांचाच !
- प्रसाद ओक
हल्ली सतत वाईट, नको त्या बातम्याच कानावर पडतात. ओळखीतले कोणी तरी आजारी पडले आहे, कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, कोणाचे त्यामुळे निधन...त्यामुळे आपण सारेच सतत तणावाखाली वावरत आहोत. त्यात आज सकाळी उठल्याउठल्या सुमित्रा भावे यांच्या निधनाची बातमी. मी आणि माझ्या वयाचे बहुतेक सर्वजण त्यांना मावशी म्हणायचो. या बाईंमध्ये कमालीची ऊर्जा होती. अगदी वयाच्या ७८व्या वर्षीही नवीन काही करण्याची उर्मी होती. अलीकडेच माझ्याकडे एक दक्षिण भारतीय चित्रपटाची संहिता आली होती. मला ती आवडली. संजय मेमाणीशी मी बोललो. त्यालाही ती आवडली. त्याचं सुमित्रा भावे यांच्याशी बोलणं झालं. लगेच त्यांनी मूळ चित्रपट, त्याची कथा मागविली. त्यांनाही ती खूप भावली. तो चित्रपट करणारच होत्या त्या !
मराठी चित्रपटांचा बाज, मांडणी, विषय, आशय बदलण्यात अलीकडील काळात सर्वांत मोठा वाटा कोणाचा असेल तर सुमित्रा भावे यांचा. त्यांचे टाटा समाज विज्ञान संस्थेतून शिक्षण झाले होते. कदाचित त्यामुळे असेल, त्या सतत सामाजिक प्रश्नांचा विचार करीत, तोच त्यांच्या चित्रपटांचा विषय असे. दहावी फ, नितळ, बाधा, वास्तुपुरुष, देवराई, अस्तु, दोघी, संहिता, एक कप च्या... किती नावं घ्यावीत. त्या पटकथाकार होत्या, दिग्दर्शक होत्या आणि कॅमेराही त्यांच्याकडेच असायचा. आपल्याला जे सांगायचे आहे, ते कॅमेऱ्यातूनच. त्यामुळे नेमके ते आणि तसेच दिसायला हवे, यावर त्यांचा भर असे. मुळात मराठी चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शक कमीच. त्यात हा असा वेगळा विचार करणाऱ्या आणि आशयघन चित्रपट देणाऱ्या सुमित्रा भावे बहुधा एकट्याच.
सुमित्रा मावशींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या नेहमी तरुणांच्या संपर्कात असायच्या. या वयोगटात काय चर्चा होत असते, कोणते विषय त्यांना महत्त्वाचे वाटतात, हे त्या जाणून घेत. मी दिग्दर्शित केलेला कच्चा लिंबू हा चित्रपट त्यांना खूप आवडला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण सुमित्रा भावे यांनी केलेलं कौतुक हाच माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार होता. वेगवेगळ्या भाषेत चित्रपटांमध्ये काय सुरू आहे, हे त्या नेहमी बारकाईने पाहत. चित्रपट महोत्सवात सर्व भाषांतील चित्रपट त्या पाहत. दिवसभर त्या तिथेच असत. संबंधित दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरामन, संगीतकार यांच्याशी चर्चा करीत. ती सर्व मंडळीही सुमित्रा भावे यांच्याशी अत्यंत आदराने बोलत, त्यांनी यांचे मराठी चित्रपट पाहिल्याचा तो परिणाम असावा.
सुमित्रा भावे यांचे चित्रपट हा वेगळ्या लेखाचा विषय होईल. खरे तर त्यांच्या चित्रपटांचा एकत्र आढावा शक्य नाही. प्रत्येक चित्रपट वेगळा, मांडणी वेगळी. वास्तुपुरुष, देवराई, दहावी फ, दोघी, नितळ या चित्रपटांची मांडणी पाहिली तरी ते जाणवते. त्या कॅमेऱ्याचा उपयोग ज्या पद्धतीने करीत, त्यामुळे चित्रपट जिवंत होई. अमूक एक फ्रेम अशीच हवी, हे त्यांनी मनाशी ठरवलेले असायचे. त्यात तडजोड नसायची. तथाकथित लोकप्रिय चित्रपट बनवण्याच्या वा स्वतः लोकप्रिय होण्याच्या भानगडीत त्या पडल्या नाहीत. तो त्यांचा पिंडच नव्हता. पण त्यांच्या अनेक चित्रपटांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळाले. कधी कथेसाठी, कधी दिग्दर्शनासाठी, तर कधी संपूर्ण चित्रपटासाठी. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी त्यांच्या चित्रपटांची निवड झाली, त्यावर चर्चा झडल्या. पण मराठी प्रेक्षकांनी मात्र त्यांच्या चित्रपटांची हवी तशी व तितकी दखल घेतली नाही. अर्थात त्यामुळे सुमित्रा भावे थांबल्या नाहीत. विविध सामाजिक विषय त्या चित्रपटांतून मांडत राहिल्या... आता तो प्रवास थांबला आहे !