वाचनीय लेख - बंद शाळांमुळे खुंटली मुलांची कौशल्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 08:23 AM2021-11-18T08:23:57+5:302021-11-18T08:25:27+5:30

साधारणपणे कोणत्या कौशल्यांमध्ये मुलं मागे आहेत याचा हा ढोबळ आढावा...

children's collapse skills due to closed schools in corona lockdown | वाचनीय लेख - बंद शाळांमुळे खुंटली मुलांची कौशल्ये!

वाचनीय लेख - बंद शाळांमुळे खुंटली मुलांची कौशल्ये!

Next
ठळक मुद्देगेली दीड-दोन वर्षे मुलं शाळांपासून दूर होती. त्यामुळे त्यांच्यातली कौशल्ये तर कमी झालीच, अनेक संधीही हुकल्या. त्या पुन्हा मिळायला हव्यात.

डॉ. श्रुती पानसे

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलं  नवीन कौशल्ये अवगत करत असतात किंवा नवीन कौशल्ये त्यांना आपोआप अवगत होत असतात. कारण ती कौशल्ये त्यांना वातावरणातून मिळत असतात, परंतु कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने गेल्या दीड-दोन वर्षात तसे अनुभव अपुऱ्या पद्धतीने मिळालेले आहेत. आता शाळा पुन्हा सुरू होत असताना शिक्षक आणि पालकांनी त्यापद्धतीने अभ्यासक्रमाची आखणी करायला हवी. काही कौशल्ये ही थेट अभ्यासाशी जोडलेली असतात, तर काही व्यक्तिमत्त्वाशी जोडलेली असतात. साधारणपणे कोणत्या कौशल्यांमध्ये मुलं मागे आहेत याचा हा ढोबळ आढावा...

भाषिक कौशल्य
एरवी मुलांच्या कानावर वेगवेगळ्या भाषांमधले शब्द, वाक्य, वाक्प्रचार पडत असतात. परंतु सध्या हे विविधांगी अनुभव अतिशय कमी झालेले आहेत. याचं कारण केवळ घरातली माणसं आणि ते वापरत असलेली शब्दसंपत्ती एवढीच मुलांच्या कानावर गेली आहे. टीव्हीवरून मुलांनी जे ऐकलं असेल त्याही शब्दसंपत्तीची यामध्ये भर पडलेली आहे. परंतु जिवंत अनुभव जे मुलांना सहजपणे दुकानात, बागेत, इतर नातेवाईकांकडे, मित्र - मैत्रिणींबरोबर वावरत असताना किंवा शाळेत असताना जे नवीन शब्द - संकल्पना त्यांच्या कानावर पडायला हव्यात, त्या पडलेल्या नाहीत. त्यामुळे साधारणपणे एखाद्या वयोगटातल्या मुलांची शब्दसंपत्ती जेवढी असायला हवी तेवढी ती असणार नाही, हे शिक्षकांनी आणि पालकांनी लक्षात घ्यावं. ते घेतलं नाही आणि विशिष्ट पातळीवर हे मूल आहे, असं समजून शिकवायला सुरुवात केली तर समस्या निर्माण होऊ शकतात. भाषेचे कमी अनुभव मिळाल्यामुळे अर्थातच गणित - विज्ञान, सामाजिक विज्ञान, परिसर अशा सर्वच विषयांवर त्याचा कमी - अधिक प्रमाणात परिणाम झालेला दिसून येईल. याचं कारण कोणताही विषय समजण्यासाठी भाषेची गरज असते.

आंतर व्यक्ती संबंध
लहान वयातल्या मुलांना इतर त्यांच्या वयाच्या मुलांचे किंवा मोठ्या माणसांचे प्रत्यक्ष अनुभव  फार कमी आलेले आहेत. त्यामुळे इतर माणसांशी कसं बोलायचं असतं, कसं वागायचं असतं, याबाबतीत लहान मुलं कमी पडू शकतात. बालवाडीच्या वयातली मुलं तर अजूनही इतर माणसांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्यावर विश्वास ठेवायला घाबरत आहेत. त्यामुळे मुलांना अनेक मुलं एकत्र भेटल्यावर एक प्रकारची भीती वाटू शकते. असुरक्षितता त्यांच्या मनात येऊ शकते, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पावलं उचलावी लागतील..
मुलं एकमेकांकडून खूप काही शिकत असतात. यामध्ये जसे ते शब्द, भाषा शिकत असतात तसेच एकमेकांशी पटवून घेणं, एकमेकांसाठी प्रेमाने काही करणं, आपला मुद्दा पटवून देताना आवाज चढवून बोलणं, आपला मुद्दा चुकीचा असेल तर मान्य करणं, शिक्षकांचं ऐकणं, असे जे परस्परांशी संबंधित कौशल्य आहेत त्या कौशल्यविकासनाला संधीच न मिळाल्यामुळे ही कौशल्ये त्यांच्यामध्ये निर्माण कशी होतील, याच्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. शाळेने जाणीवपूर्वक उपक्रम आखले तर मुलं लवकरच ते आत्मसात करतील.

दिव्यांग मुलांचा विशेष विचार
या मुलांच्या संदर्भात बोलत असतानाच विविध पद्धतीच्या दिव्यांग मुलांबद्दल वेगळा विचार करावा लागेल. त्यांनी मोकळेपणाने पुढे यावं, त्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळावी, यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवून वेगळे खेळ, वेगळे उपक्रम राबवून त्यांना सहभागी करून घ्यावे लागेल.

एकाग्रता आणि श्रवण कौशल्य
बहुतांश मुलं विविध पद्धतीच्या गॅझेट्सना चिकटून असल्यामुळे श्रवण कौशल्यसुद्धा कमी झालेलं असू शकतं. त्यामुळे श्रवण कौशल्य वाढवण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल. अनेक ठिकाणी असं दिसून आलं की, मुलं दिवसभर मोबाईलवर होती. परस्परांमधला घरातला संवादसुद्धा या काळामध्ये कमी झालेला असल्यामुळे श्रवणक्षमता कमी झालेली आहे. घरामध्ये फार फार तर एकावेळी ७ - ८ वाक्यांचा संवाद असतो. मुलांचा सार्वत्रिक संवाद आपल्याला वाढवावा लागेल. एक सलग विषय जर आपल्याला ऐकायचा असेल तर त्यासाठी किमान अर्धा-पाऊण तास एकाग्रता असावी लागते. ती एकाग्रताही कमी झालेली असू शकते. त्यामुळे  विषयाचे तुकडे करून शिकवणं, मुलांचा प्रत्यक्ष सहभाग - त्यामध्ये भाषिक सहभाग अभिप्रेत आहे - असा सहभाग घेऊन शिकवणं, अशा काही गोष्टी शिक्षकांनी केल्या तर ते मुलांसाठी आणि त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी योग्य राहील. 

शारीरिक कौशल्य
दीड दोन वर्षाच्या काळात सर्वाधिक दुष्परिणाम जर कोणत्या  गोष्टीवर झालेला असेल तर ते म्हणजे शारीरिक कौशल्य. या काळामध्ये मुलं फार हालचाल करू शकली नाहीत. चालणं, धावणं, जोरात धावणं, जिने चढ-उतार करणे, उड्या मारणं, या सर्व हालचालींवर मर्यादा होत्या आणि त्यामुळे याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक विकासावर झालेला असू शकतो. त्यामुळेच खेळालासुद्धा शाळांमध्ये प्राधान्य द्यावे लागेल.

मनात चाललेल्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे मुलं हालचाल करू शकली नाहीत, जास्त धावली, पळली नाहीत, त्यामुळे त्यांचा भावनिक निचरासुद्धा योग्य प्रकारे झालेला नाही. यामुळे त्यांची चिडचिड होणं किंवा मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता असणं, या गोष्टी या काळात प्रकर्षाने घडून आलेल्या दिसल्या. आता शाळा सुरू झाल्यानंतर सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं आणि त्यांच्या शारीरिक हालचलींकडे लक्ष द्यायचं नाही, असं करून चालणार नाही. त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागेल. शारीरिक कौशल्य हा मुद्दा मुलांच्या ‘मानसिकते’च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ही अशी काही कौशल्य आहेत, की ज्यांचा त्यांच्या सध्याच्या आयुष्यावर - वर्तमानावर परिणाम झालेला आहे आणि भविष्यावर परिणाम होऊ शकतो आणि या  सर्व कौशल्यांवर पालक, शिक्षक, समाज म्हणून काम करणं अतिशय आवश्यक आहे. एकप्रकारे असं म्हणता येईल की, या मुलांमध्ये एक प्रकारची ‘अनुभव वंचितता’ निर्माण झालेली आहे, त्यांच्या या हुकलेल्या अनुभवांच्या संधी त्यांना पुन्हा मिळवून दिल्या, अनुभवांचं खतपाणी मिळालं की, त्यांची विविध कौशल्य पुन्हा नक्कीच बहरतील.

(लेखिका मेंदू अभ्यासतज्ज्ञ आणि करिअर समुपदेशक आहेत)
drshrutipanse@gmail.com

Web Title: children's collapse skills due to closed schools in corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.