जीव मुलांचा जाईल अन् मरण आपण साेसत राहू !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:26 AM2024-03-06T11:26:26+5:302024-03-06T11:26:57+5:30

मुलांच्या भविष्याची चिंता करताना ‘प्लॅन बी’ची तयारीही हवीच. केवळ ‘परीक्षा अन् पर्सेंटेज’ची झापडं बांधून मुलांना शर्यतीत ढकलणे बंद करायला हवे.

Children's lives will go and we will continue to suffer death | जीव मुलांचा जाईल अन् मरण आपण साेसत राहू !

जीव मुलांचा जाईल अन् मरण आपण साेसत राहू !

राजेश शेगोकार, वृत्तसंपादक लोकमत, नागपूर -

काल परवा बारावी अन् दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पाठाेपाठ, वर्धा व यवतमाळातही आणखी दाेघींची भर पडली. महिना-दाेन महिन्यांपूर्वी काेटामध्ये शिकत असलेल्या अशाच काही विद्यार्थ्यांनी आयुष्य संपविले. अजून नीट, जेईई, विविध सीईटी अशा अनेक परीक्षा बाकीच आहेत. विद्यार्थी आत्महत्यांच्या अशा घटना प्रत्येक वर्षी घडतात. अलीकडच्या काळात त्यात झालेली वाढ काळजाला चटका लावणारी आहे. खरे तर या आत्महत्या नाहीत तर सक्सेस या शब्दाची बदललेली व्याख्या अन् स्टेटस यामुळे निर्माण झालेल्या अपेक्षांच्या राक्षसाने घेतलेले बळी आहेत. अपेक्षांचा हा राक्षस आज घराघरांत वाढताे आहे. हे आपण आतातरी समजून घेणार आहाेत की नाही?

बालवाडीपासून अपेक्षांच्या ओझ्याखाली बालपणच एवढे दबून गेले आहे की, दहावी अन् बारावी या दाेन परीक्षांचा घाट पार केल्यावरही नीट, सीईटीसारख्या वळणमार्गावर मुलांची दमछाक हाेत आहे. डाॅक्टर, इंजिनिअर, एमपीएससी, यूपीएससीसारख्या परीक्षांमधून अधिकारी हाेण्याची सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, ‘तुला चांगले करिअर करायचे असेल तर तू फक्त  पर्सेंटेज कमव’ हे पालकांचे ‘मनाचे श्लाेक’ ऐकून  परीक्षा म्हणजेच सर्व काही आहे, हेच आयुष्य आहे अशी मुलांची धारणा होते. मुलांचे मन अशा अपेक्षांच्या ओझ्याखाली वाकतेच; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामध्ये भीती निर्माण हाेते. ही भीती परीक्षेची कमी अन् पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलाे नाही तर..? याची अधिक असते. त्यातूनच मग अपयश आल्यावर ते हतबल होतात.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (NCRB)  आकडेवारीनुसार गेल्या दशकात भारतातील आत्महत्यांमध्ये विद्यार्थ्यांचा वाटा ७० टक्के वाढला आहे. मुलांच्या आत्महत्यांचा हा वाढता टक्का भयावह आहे. मुले इतकी टाेकाची भूमिका कशी घेऊ शकतात, त्यांना मरणाची भीती वाटत नाही का याचा कुटुंबाने, शिक्षण व्यवस्थेने अन् समाजानेही विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांत आधी स्पर्धेची आंधळी काेशिंबीर थांबवून डाेळसपणे  भविष्य  घडविण्याचा  विचार  पालकांनी केला पाहिजे. मुलांच्या भविष्याची चिंता करताना आपण ‘प्लॅन बी’ ची चर्चा कधीच करत नाही. त्यामुळे ‘परीक्षा अन् पर्सेंटेज’ अशी दाेन झापडं बांधून मुलांना शर्यतीत ढकलणे बंद करायला हवे. वर्षभरापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुलांची पावले आत्महत्यांच्या मार्गावर जाऊ नयेत म्हणून काही शिफारसी सुचविल्या हाेत्या, त्यामध्येही समवयस्क मुलांशी तुलना टाळावी, शैक्षणिक कामगिरी हेच यशाचे एकमेव गमक समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली हाेती; मात्र शैक्षणिक संस्थांसह पालकांपर्यंतही या शिफारसी काेणी गांभीर्याने घेतलेल्या दिसल्या नाहीत. 

अपेक्षांचे ओझे पालकांचे जसे असते, तसेच शाळेचेही असते. काेचिंग क्लासेसच्या शिक्षणाचा पायाच मुळी ‘पर्सेंटेज’ हा आहे. आकड्यांच्या या खेळात आपण अपयशी ठरलाे तर?.. ही माेठी भीती अशा घटनांच्या मागे आहे. काेणत्याही आत्महत्यांचा निर्णय तडकाफडकी हाेत नाही. त्या अवस्थेपर्यंत पाेहोचण्यासाठी मनावर हाेणारे आघात लक्षात आले पाहिजेत.  क्लासेसच्या नियमित परीक्षांमधील गुणांवरूनही आपण मुलांना समजून घेताे की फैलावर घेताे? मुलांची बाैद्धिक क्षमता, कल, आवड पाहून त्यांच्या शिक्षण शाखेची निवड आपण करताे का? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांशी आपला संवाद आहे का? मुलांसोबत बाेलतानाही  पालकांचे विषय करिअर, परीक्षा, अभ्यास, पुस्तके, सिलॅबस हेच असतील तर मुलांचे भावविश्व समजून घेणे कठीण हाेईल. नेमके त्याकडेच दुर्लक्ष हाेत असल्याने काेवळी पानगळ सुरू झाली आहे. 

एक संधी गेली तर दुसऱ्या हजाराे  संधी  उभ्या  असतात याची  जाणीव  मुलांना करून देणे गरजेचे आहे, तेवढा आत्मविश्वास मुलांमध्ये रुजविता आला तरच आपण मुलांना वाचवू शकू, अन्यथा ‘साॅरी’ म्हणून निराेप घेणाऱ्या चिठ्ठ्या वाचत आपण सारेच ‘मरण’ साेसत राहू !..

Web Title: Children's lives will go and we will continue to suffer death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.