तैवानला गिळणे चीनला सध्या परवडणारे नाही, कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:03 AM2022-11-07T08:03:31+5:302022-11-07T08:13:17+5:30
चीनने तैवानवर आक्रमण केले आणि तेथील इको-सिस्टीम विस्कळीत झाली तर ताे चीन आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर फार माेठा आघात असेल.
विनायक पंडित
उद्योजक,
तैवान आणि भारत
चीनने तैवानवर आक्रमण केले आणि तेथील इको-सिस्टीम विस्कळीत झाली तर ताे चीन आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर फार माेठा आघात असेल.
तैवान हे एक छाेटेसे बेट! हा कधीकाळी आपल्याच देशाचा भाग हाेता, असा चीनचा दावा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तैवान जपानच्या अधिपत्याखाली हाेता. त्यावेळेस बीजिंगवर चांग काय शेकच्या कुमिंगतांग (KMT) चे शासन हाेते. त्या दरम्यानच्या काळात चीनमध्ये माओ झेडांगच्या नेतृत्वाखाली साम्यवादाची चळवळ सुरू झाली आणि बघता बघता प्रचंड वेगाने त्याचा विस्तार हाेऊ लागला. चांग कायच्या लक्षात आले की, ताे माओच्या साम्यवादाच्या चळवळीसमाेर टिकाव धरू शकणार नाही, तेव्हा ताे बीजिंग साेडून तैवानला पळून गेला.
जपानी लाेकांना हुसकावून त्याने तैवानमध्ये Republica of China (ROC) ची स्थापना केली. चांग काय शेकचे जगभरातील विविध नेत्यांबराेबर सलाेख्याचे संबंध असल्यामुळे त्यांनी ROC ला मान्यता दिली आणि आश्चर्याची बाब म्हणजे १९७१ सालापर्यंत तैवान हा संयुक्त राष्ट्रांचा भाग होता. हळूहळू चीनमध्ये माओच्या नेतृत्वाची पकड मजबूत हाेत गेली आणि जगभरात तैवानची स्वतंत्र देश म्हणून मान्यता संपुष्टात येऊ लागली. आता जगभरात बाेटांवर माेजण्याएवढे देशच तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देतात. भारताने चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला खूप अगाेदरच मान्यता दिली आहे. त्यामुळे भारत आणि तैवानमध्ये राजनैतिक संबंध नाहीत.
भविष्यात तंत्रज्ञान जगावर कसे राज्य करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तैवान आणि तैवानचे चीनबराेबर असलेले संबंध. ‘मेड इन अमेरिका’, ‘मेड इन जपान’नंतर ‘मेड इन तैवान’चा उदय हाेऊ लागला. बघता बघता तैवान इलेक्ट्राॅनिक्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात एक अग्रगण्य ‘इकोसिस्टीम पार्टनर’ म्हणून उदयास आला. १९८० च्या दशकात चीनमध्ये परकीय गुंतवणुकीला सुरुवात झाली आणि तैवानी लाेकांनी या संधीचा फायदा घेत चीनमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. चीननेसुद्धा आपले अधिकारी तैवानला पाठवून अतिमहत्त्वाच्या कंपन्यांना पायघड्या घातल्या. सर्व तऱ्हेचे परवाने तैवानी कंपन्यांना हातात मिळू लागले आणि आतापर्यंत जवळपास नऊ हजार कंपन्यांनी एकूण २०० बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक चीनमध्ये केली आहे. हा व्यापार ३०० बिलियन डाॅलर्स एवढा आहे.
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची जोडणी आणि प्रक्रिया उद्योगात चीन सध्या जवळपास १ ट्रिलियन डाॅलर्सची निर्यात करतो. या प्रक्रियेत चीनमध्ये २ काेटींपेक्षा जास्त प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राेजगारांची निर्मिती झालेली आहे. यातील महत्त्वाच्या सेमी कंडक्टर्सचे उत्पादन फक्त तैवानमध्ये हाेते. सेमी कंडक्टर उत्पादनात तैवानचा वाटा तब्बल ९२% आहे. तैवानची लाेकसंख्या चीनपेक्षा ७० पटीने कमी आहे. पण GDP फक्त १० पटीने कमी आहे. सेमी कंडक्टर उत्पादनाचा एक प्लँट उभा करणे ही प्रक्रिया अत्यंत खर्चीक, क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. ५००० कामगार जेव्हा ४ वर्षे राेज काम करतील, तेव्हा हा प्लँट उभा राहील आणि या प्लँटमधून निर्मित वस्तू बाजारात यायला सहावे वर्ष उजाडेल. जगाचा एकूण व्यवहारात इलेक्ट्रॉनिक्सचा वाटा आता ५०% आहे, ताे ७५% पर्यंत जायला फार वेळ लागणार नाही.
या परिस्थितीत चीनने तैवानवर आक्रमण केले आणि तेथील इको-सिस्टीम विस्कळीत झाली तर ताे चीन आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर फार माेठा आघात असेल. त्यामुळेच सद्यस्थितीमध्ये जगातील सर्व बलाढ्य देश तैवानच्या बाजूने उभे असलेले दिसतात. चीनकडे क्षेत्रफळाची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे अत्यंत लहान क्षेत्रफळाच्या तैवानसाठी चीन आपल्या अर्थव्यवस्थेचे नुकसान हाेईल, असे कृत्य करणार नाही. खरेतर तैवानची अर्थव्यवस्थाच चीनला आपल्या अधिपत्याखाली घ्यायची आहे आणि जगातील बलाढ्य देशांना असे हाेऊ द्यायचे नाही.