चीनला घरचा अहेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:40 AM2017-08-04T00:40:53+5:302017-08-04T00:41:16+5:30
डोकलाम मुद्यावरून भारत व चीनदरम्यान सुरू असलेला वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे, यासाठी गत दीड महिन्यापासून रोजच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भारताला धमकावत असलेल्या चीनने, बुधवारी पुन्हा एकदा धमकी दिली. भारताने सैन्य मागे न घेतल्यास, कठोर पावले उचलल्या जातील, असा इशारा चीनने दिला. डोकलाममधील विवाद हा चीन व भूतानदरम्यानचा विवाद असून, भारताचे त्या विवादाशी काहीही देणे-घेणे नाही, अशी भूमिका चीनने घेतली आहे. भारत आणि भूतानला मात्र ती भूमिका मान्य नाही. भारत आणि भूतानदरम्यानच्या करारानुसार भूतानचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे आणि त्या अनुषंगानेच भारतीय सैन्य भूतानच्या भूमीवर आहे, अशी भूमिका उभय देशांनी घेतली आहे. या विवादासंदर्भात भारताने अत्यंत संयंत भूमिका घेतली असताना, चीन मात्र दररोज आक्रस्ताळेपणा करीत आहे. स्वत:ला अमेरिकेच्या बरोबरीची महाशक्ती समजू लागलेल्या चीनसारख्या सामर्थ्यशाली राष्ट्रासाठी हे शोभादायक नाही, अशा वर्तणुकीमुळे आपण आपल्या देशाला उत्तर कोरियासारख्या बेजबाबदार देशाच्या पंगतीत नेऊन बसवित आहोत, याचेही भान चिनी प्रसार माध्यमांना राहिलेले दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, बुधवारी चीनमधील एका तज्ज्ञाने चीनला घरचा अहेर दिला. विशेष म्हणजे एका चिनी प्रसार माध्यमामध्येच त्या संदर्भातील बातमी उमटली आहे. मकाऊस्थित लष्करी तज्ज्ञ अँटनी वाँग डाँग यांनी ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाशी संवाद साधताना असे वक्तव्य केले, की जमिनीवरील लढाईत चीन भारताला मात देईलही; पण भारतीय नौदलाला हिंद महासागरात पराभूत करणे चिनी नौदलासाठी अशक्यप्राय आहे आणि त्या स्थितीत चीनचा इंधन पुरवठा बंद होऊ शकतो. चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, चीनचा ८० टक्के इंधन पुरवठा हिंद महासागरातील जलमार्गाने होतो. त्याचे स्मरणही डाँग यांनी करवून दिले. मलाक्काच्या समुद्रधुनीतील ज्या चिंचोळ्या मार्गाने चीन खनिज तेलाची आयात करतो, तो मार्ग अंदमान-निकोबार द्वीपसमूहावरील भारतीय नौदलाच्या तळाच्या अगदी आवाक्यात आहे, हेच डाँग यांना सूचित करायचे होते. चिनी राज्यकर्त्यांनाही त्याची जाणीव आहे आणि बहुधा त्यामुळेच चीन रणमैदानात उतरण्याऐवजी मनोवैज्ञानिक युद्ध खेळू बघत आहे.